चालू घडामोडी - २९ जुलै २०१८

Date : 29 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आधार कार्ड चॅलेन्जमध्ये TRAI अध्यक्ष स्वतःच फसले, काही मिनिटांतच डेटा झाला लीक :
  • नवी दिल्ली -  देशभरात आधार कार्डआणि डेटा सुरक्षिततेच्या मुद्यावर वारंवार प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहेत. आधार कार्ड आणि डेटा सुरक्षितता हा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. याचसंदर्भातील चर्चेदरम्यान भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार कार्डसंबंधी ट्विटरवर एक आव्हान दिले.

  • आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आपला दावा खरा करण्याच्या प्रयत्नात मात्र शर्माच पूर्णतः फसल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. 

  • ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार कार्ड क्रमांक शेअर केला आणि डेटा हॅक करुन दाखवण्याचं आव्हान दिले. नुकसान किंवा हानी पोहोचेल, अशी कोणतीही माहिती शोधून दाखवावी. शर्मा यांचे आव्हान एलियट एल्डर्सन नावाच्या युजरनं स्वीकारलं. केवळ स्वीकारलंच नाही तर पूर्णदेखील केले. 

  • फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा यावेळी एलियट एल्डर्सन यानं करत शर्मा यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केली. काही मिनिटांतच एलियट एल्डर्सननं शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक आणि त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटोदेखील सार्वजनिक केले. मात्र शर्मा यांच्याबाबतची माहिती शेअर करताना कोणत्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी माहिती व फोटो ब्लर केले. 

देशात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू :
  • भारतात गेल्या सात महिन्यांत तब्बल ५५ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील २६ मृत्यू हे मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेशात झालेले आहेत. देशात दरवर्षी सुमारे १०० वाघांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘क्लॉ’(कन्झर्वेशन, लेन्स आणि वाईल्डलाईफ) या समूहाने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

  • यंदा अवघ्या सात महिन्यांत तब्बल २२ वाघिणींचा मृत्यू झाला आहे. सुमारे १५ पिलांना जन्म देण्याची एका वाघिणीची क्षमता असते. ही बाब लक्षात घेतल्यास झालेली हानी फार मोठी आहे.  महाराष्ट्रात ११ तर मध्यप्रदेशात १५ वाघांचा मृत्यू झाला. 

  • सात महिन्यांच्या कालावधीत भारताने २०१६ मध्ये ६६, २०१७ मध्ये ६२ तर आता २०१८ मध्ये ५५ वाघ गमावले आहेत. मध्य भारतात वीज प्रवाहाचा धक्का हे वाघांच्या मृत्यूचे एक मोठे कारण समोर आले आहे. सुमारे १२ वाघांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला. रस्ते अपघातातील वाघमृत्यूची संख्याही अधिक आहे. ‘बाजीराव’ हा ढाण्या वाघ महाराष्ट्राने अपघातात गमावला होता.

जागतिक व्याघ्र दिन विशेष - या ५५ पैकी १३ वाघांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. १५ वाघांचा मृत्यू अनैसर्गिक तर २७ मृत्यू नैसर्गिक असल्याचे समोर आले आहे. २२ मृत्यू हे एक ते तीन वष्रे वयोगटातील वाघांचे आहेत. जानेवारी महिन्यात १३, फेब्रुवारीमध्ये आठ, मार्चमध्ये दहा, एप्रिलमध्ये १२, मे महिन्यात सात, जूनमध्ये तीन तर जुलैमध्ये दोन वाघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ‘क्लॉ’ या समुहाचे सरोश लोधी यांनी दिली.

४४ लाख कर्मचाऱ्यांच्या ईएसआय सेवेत अडचणी; १२०० पदे रिकामी :
  • नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ४४ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा देण्यात राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडून (ईसआयसी) कुचराई केली होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात ‘ईएसआय’ची १५ रुग्णालये असली तरी शेकडो डॉक्टरांसह एकूण १२00 पदे रिक्त आहेत. राज्य सरकार व ईएसआयच्या वादाचाही सेवेवर परिणाम होत आहे.

  • राज्याच्या २२ जिल्ह्यांतील या योजनेत ४४ लाख कर्मचाºयांचा समावेश आहे. ईएसआयची १५ रुग्णालये व ५६ दवाखाने आहेत. रुग्णालयांत २0६ डॉक्टर, ३७८ परिचारिका, २५४ निमवैद्यक व ३६३ इतर कर्मचाºयांची पदे रिक्त

  • आहेत. अन्य १४ जिल्ह्यांतही ९ रुग्णालये आणि ७५ दवाखाने उघडण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या १५ पैकी ३ ईसआय तर १२ रुग्णालये राज्य सरकार चालविते

रुग्णालयात रिक्त असलेली पदे

  1. पदनाम स्वीकृत नियुक्त्या रिक्त
  2. डॉक्टर ५७१ ३६५ २०६
  3. स्टाफ नर्स ९५६ ५७८ ३७८
  4. निमवैद्यक ५४४ २९० २५४
  5. व्यवस्थापन ८५६ ४९३ ३६३
अवघ्या ३५ चेंडूंत मार्टिन गप्टिलचं शानदार शतक :
  • लंडन : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज मार्टिन गप्टिलने इंग्लंडमधील ट्वेन्टी ट्वेन्टी ब्लास्ट लीग स्पर्धेत धमाका केला आहे. अवघ्या 35 चेंडूंमध्ये गप्टिलने शानदार शतक ठोकलं.

  • वूस्टरशायर संघाकडून खेळताना मार्टिन गप्टिलने ही कामगिरी केली. गप्टिलनं या सामन्यात 38 चेंडूंमध्ये 102 धावांची खेळी साकारली. त्यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

  • गप्टिलच्या खेळीमुळे वूस्टरशायर संघाला नॉर्दम्प्टनशायर संघावर 9 विकेट्सनी विजय मिळवता आला. वूस्टरशायरसमोर या सामन्यात 188 धावांचं मोठं लक्ष्य होतं.

  • टी ट्वेन्टी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत गप्टिल संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. याआधी भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आणि नामिबियाच्या वेस्थुझेननं 35 चेंडूत शतक ठोकलं होतं.

  • ट्वेटी ट्वेन्टीत वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. गेलने आयपीएलमध्ये 30 चेंडूंत शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. भारताचा ऋषभ पंत (32 चेंडू) दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स (34) तिसऱ्या स्थानावर आहे

UPSC मध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्रीयन अधिकारी सरसावले : 
  • नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी राजधानी दिल्लीत येऊन तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यूपीएससीमध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी महाराष्ट्रीय अधिकारी सरसावले आहेक. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी 'पुढचे पाऊल' संस्थेच्या वतीने दिल्लीत एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • नुकत्याच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी संस्थेने उपलब्ध करुन दिली. दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मावळणकर सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • 2016-17 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या 30 विद्यार्थ्यांचे अनुभव एकाच वेळी ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली. या कार्यक्रमाला दिल्लीतल्या यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू, हंसराज अहिर, सुभाष भामरे या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.

  • 'पुढचे पाऊल' संस्थेचे संस्थापक आणि परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह आनंद पाटील आणि इतर मराठी अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

दिनविशेष :
  • विषमता विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय वाघ दिन

महत्वाच्या घटना

  • १८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

  • १८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.

  • १९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

  • १९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.

  • १९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.

  • १९५७: इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

  • १९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

  • १९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.

जन्म

  • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोर आयझॅक राबी यांचा जन्म.

  • १९०४: भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक जे. आर. डी. टाटा यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)

  • १९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

  • १९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

  • १९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.

  • १९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

  • मृत्यू

  • ११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. (जन्म: २३ मे १०५२)

  • १७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)

  • १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८५३)

  • १८९१: बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)

  • १९००: इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन.

  • १९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर१८९४)

  • १९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.

  • १९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९०९)

  • २००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.