चालू घडामोडी - २९ जून २०१८

Date : 29 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींचे प्रयत्न निष्फळ, स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ :
  • झुरिक - विदेशी बँकात असलेला भारतीयांचा काळा पैसा परत आणण्याचे देशवासीयांना आश्वासन देण्याऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदींकडून सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून, स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतीयांच्या स्विस बँकांमधील खात्यांतील रकमेत  सुमारे 50 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे स्वीस बँकेतील भारतीयांच्या  ठेवींचा आकडा सात हजार कोटी रुपयांवर पोहोलचा आहे. 

  • स्विस नॅशनल बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांनी स्वीस बँकेत थेटपणे जमा केलेल्या रकमेचा आकडा 99.9 कोटी स्विस फ्रँक (सुमारे 6 हजार 900 रुपये) आहे. तर इतर माध्यमातून जमा केलेली संपत्तीही (1.6 कोटी स्विस फ्रँकवर (सुमारे 110 कोटी रुपये)  पोहोचली आहे. या आकडेवारीनुसार स्विस बँकांमधील परदेशी नागरिकांच्या ठेवींचा आकडा 1460 स्विस फ्रँक (सुमारे 100 लाख कोटी रुपये) एवढा झाला आहे.

  •  नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यापासून काळ्यापैशाविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेवींमध्ये झालेली वाढ ही धक्कादायक मानली जात आहे. स्विस बँका ह्या आपल्या ग्राहकांच्या ठेवींबाबतची माहिती अत्यंत गोपनीय ठेवतात. त्यामुळे स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या जातात. |

जावडेकरांचा मोठा निर्णय, यूजीसी रद्द, नव्या आयोगाची स्थापना :
  • नवी दिल्ली: केंद्र सरकारने विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (यूजीसी) बंद करण्याची घोषणा केली आहे. त्याजागी उच्च शिक्षण आयोग अर्थात हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया (एचईसीआय) ची स्थापना करण्यात येणार आहे.

  • नवा आयोग केवळ संशोधन आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष देईल. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांना अनुदान किंवा ग्रांन्ट देण्याचं काम मंत्रालयातून होणार आहे. नवा विद्यापीठ आयोग बोगस संस्था आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाईही करु शकणार आहे.

  • त्यासाठी 1951 चा यूजीसी अॅक्ट संपुष्टात आणत, नवा एचईसीआय अॅक्ट 2018 लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी याबाबतचा ड्राफ्ट जारी करत, सूचना आणि हरकती मागवल्या आहेत.

  • लालफितीच्या कारभारात अडकलेल्या आणि सुस्त झालेल्या उच्च शिक्षणाला मुक्त करण्यासाठी विविध समित्यांमार्फत यूजीसीचं अवलोकन सुरु होतं. प्रा. यशपाल समिती, नॅशनल नॉलेज कमिटी आणि हरी गौतम समितीने यूजीसी रद्द करुन, एकच शिक्षण नियामक करण्याची शिफारस केली होती.

  • यूजीसी केवळ ग्रांट्स जारी करण्यातच व्यस्त होती. शिक्षण संस्थांची गुणवत्ता, संशोधन किंवा मार्गदर्शन याकडे दुर्लक्ष होत असे. मात्र आता नवा आयोग केवळ शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनावरच लक्ष देईल. विद्यापीठांना ग्रांट देण्याचं काम आता मंत्रालयातून होईल.

सचिनचं मोदी, विराटसह अनेक खेळाडूंना 'किटअप चॅलेंज' :
  • मुंबई : तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 'किटअप चॅलेंज' नावाची मोहीम सुरु केली आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन सचिननं हे चॅलेंज सर्वांना दिलं आहे. तुमच्या आवडत्या खेळासाठी तयार होऊन हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्याचं आव्हान सचिननं दिलं आहे.

  • क्रिकेटपटू विराट कोहली, फुटबॉलपटू संदेश झिंगन, हॉकीपटू सरदार सिंग, महिला क्रिकेटपटू मिताली राज, बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत, पीव्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंना सचिननं नॉमिनेट केलं आहे. या खेळाडूंनीही सचिनचं चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच हे खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणार आहेत.

  • सचिननं यावेळी स्वत: क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिननं पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केलं आहे. आता हे चॅलेंज नरेंद्र मोदी स्वीकरणार का? आणि सचिननं नॉमिनेट केलेले खेळाडू चॅलेंज पूर्ण करतात का? हे लवकरच समोर येईल.

काय म्हणता? सुशांत सिंग राजपूतने चंद्रावर खरेदी केली जमीन :
  • अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा भविष्यात चंद्रावरचा रहिवासी असेल. होय, सुशांतने चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. ताज्या मुलाखतीत याचा खुलासा झाला. चंद्रावर Mare Muscoviense वा Sea of Muscovy  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मी जमिनीचा तुकडा खरेदी केला असल्याचे खुद्द सुशांतनेच या मुलाखतीत सांगितले. यापूर्वी सुशांतने  Meade 14” LX600 नामक टेलिस्कोप खरेदी केल्याची बातमी आली होती. हा टेलिस्कोप सुशांतच्या चंद्रावर असलेल्या या मालमत्तेवर नजर ठेवण्यास मदत करेल. 

  • ताज्या मुलाखतीत सुशांतने आपल्या आईच्याही आठवणी जागवल्या. माझे आयुष्य मी स्वत: लिहिन, असे माझी मला नेहमी म्हणायची आणि आज तिचे ते शब्द खरे झाले आहेत, असे तो म्हणाला.

  • सुशांतने इंटरनॅशनल लुनार लँड रजिस्ट्रीकडून चंद्रावरची  खरेदी केली आहे. याचसोबत चंद्रावर जमीन खरेदी करणारा सुशांत पहिला बॉलिवूड सेलिब्रिटी बनला आहे. तसे तर किंगखान शाहरूख खान याचीही चंद्रावर जमीन आहे. मात्र त्याने ती स्वत: खरेदी केली नसून एका चाहत्याने त्याला ती भेट म्हणून दिली आहे. सुशांतने गत २५ जूनला ही संपत्ती आपल्या नावे केली. मात्र अनेक आंतरराष्ट्रीय करारानुसार, याला कायदेशीर मालकी हक्क मानला जात नाही. कारण पृथ्वीच्या बाहेरच्या जगावर संपूर्ण मानव जातीचा हक्क आहे. 

  • कुणी एक व्यक्ति त्यावर कब्जा करू शकत नाही. त्यामुळे खरे काय हे माहित नाही. पण एक मात्र खरे चंद्रावर संपत्ती घेतल्याचे जगाला सांगून सुशांत मोठा धमाका केला आहे. कदाचित हा त्याचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. अहो, सुशांतचा ‘चंदा मामा दूर के’ हा चित्रपट जो येतोय.

२०११ ते २०१७ दरम्यान देशात ५२ विमान अपघात :
  • मुंबई : नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २०११ ते २०१७ पर्यंत ५२ विमान अपघात झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ११ अपघात २०११ मध्ये त्याखालोखाल २०१५ मध्ये १० अपघात, २०१२ मध्ये ९ अपघात, २०१३ मध्ये ८ अपघात, २०१६ मध्ये ७ अपघात, २०१४ मध्ये ६ अपघात व २०१७ च्या मार्च महिन्यापर्यंत १ अपघात असे एकूण ५२ अपघात घडले आहेत. या ५२ पैकी ७ अपघात सरकारी एअरलाईन्सचे झाले आहेत. तर खासगी विमान कंपन्यांचे २ अपघात झाले आहेत.

  • विदेशी विमान कंपन्यांचा अवघा एक अपघात झाला होता. विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे ९ अपघात झाले आहेत. २०११ ते २०१६ या कालावधीत विमान प्रवासात सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी उद्भवल्याचे प्रसंग ४५ वेळा घडले.

  • यात सर्वाधिक २३ प्रसंग विमानाच्या अभियांत्रिकीमधील तांत्रिक बिघाडामुळे घडले होते. तर १३ प्रसंग आॅपरेशनल त्रुटीमुळे उद्भवले होते. सर्वाधिक ११ प्रसंग २०११ व २०१६ मध्ये उद्भवले होते. २०१२ मध्ये ७, २०१३ मध्ये ६, २०११ व २०१५ मध्ये प्रत्येकी ५ प्रसंग घडल्याचे समोर आले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली नीचांकी पातळी :
  • मुंबई - अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.  रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरली आहे.  गुरुवारी रुपयाची किंमत 28 पैशांनी घसरुन 68.89 वर झाली.  

  • बुधवारी 37 पैशांनी घसरून रुपया डॉलरच्या तुलनेत 68.61 वर पोहोचला होता. गुरुवारी रुपयाच्या किंमतीची सुरुवातच 68.89 रुपये अशी निचांकी झाली. ही रुपयाची घसरण पाहता गेल्या 19 महिन्यांतली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीमागे कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तसेच, कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

  • दरम्यान, यापूर्वी 24 नोव्हेंबर 2016 ला रुपयाचे मूल्य 68.86 पर्यंत घसरले होते. याशिवाय, अमेरिकेने भारतासह सर्व देशांना 4 नोव्हेंबरपर्यंत ईराणहून कच्च्या तेलाची आयात बंद करण्यास सांगितले आहे. तसे केले नाही तर प्रतिबंध लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. तसेच, लीबिया आणि कॅनाडाहून पुरवठा कमी होण्याच्या शक्यतेनेही दर वाढले आहेत.

मुंबई सर्वात महागडे शहर :
  • मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर हे देशातले सर्वात महागडे शहर ठरले आहे. न्यूयॉर्कच्या इंटरनॅशनल कन्सल्टिंग फर्म मर्सरच्या, कॉस्ट आॅफ लिव्हिंगने २०१८ मध्ये या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यातून ही माहिती पुढे आली आहे. 

  • जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या  सर्वेक्षणामध्ये मुंबईसोबतच दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता या भारतातील अन्य चार शहरांचाही समावेश आहे. जगाच्या पातळीवर राहण्यासाठी महागड्या असणाऱ्या शहरांमध्ये संपूर्ण जगात हाँगकाँग हे शहर सर्वात महागडे शहर ठरले आहे. देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा जगातील यादीत मात्र, ५५ वा क्रमांक आहे. तर दिल्ली १०३, चेन्नई १४४, बंगळुरूचा १७० तर कोलकाता १८२ व्या स्थानावर आहे. 

  • जगातील एकूण २०९ प्रमुख शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक शहरातील २०० वस्तूंच्या दरांची तुलना करून त्याआधारावरच या शहरांची महागडे शहर म्हणून क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय शहरांमध्ये महागाईचा दर अनुक्रमे ५.५७ टक्के नोंदवण्यात आला आहे. हा दर देशात सर्वाधिक ज्या शहरांमध्ये दिसून आला त्या शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • २०० वस्तूंमध्ये प्रामुख्याने शेती उत्पादने, दूध उत्पादने, अवजड उत्पादने या उत्पादनांचे त्या त्या शहरातील असणारे दर तपासून पाहण्यात आले. या उत्पादनांच्या दरात विक्रमी वाढ झाल्यावरच शहरातील कॉस्ट आॅफ लिव्हिंगमध्ये वाढ होते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याच अंदाजानुसार मुंबई हे भारतातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९७४: इसाबेल पेरेन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

  • १९७५: स्टीव्ह वोजनियाक यांनी ऍपल -१ संगणकाचे पहिले प्रोटोटाइप तपासले.

  • १९७६: सेशेल्सला इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८६: आर्जेन्टिना ने १९८६ चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

  • २००१: ज्येष्ठशास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.

  • २००१: पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.

  • २००७: ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

  •  

जन्म 

  • १७९३: प्रोपेलर चे शोधक जोसेफ रोसेल यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८५७)

  • १८६४: शिक्षणतज्ज्ञ व वकिल आशुतोष मुखर्जी यांचा जन्म.

  • १८७१: मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९३४)

  • १८९१: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचा जन्म. (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)

  • १८९३: भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक प्रसंत चंद्र महालनोबिस यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९७२)

  • १९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)

  • १९३४: रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)

  • १९४५: श्रीलंकेच्या ५व्या राष्ट्राध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगा यांचा जन्म.

  • १९५६: पोर्तुगालचे पंतप्रधान पेद्रोसंताना लोपेस यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९५: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक थॉमस हक्सले यांचे निधन. (जन्म: ४ मे १८२५)

  • १९६६: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०७)

  • १९९२: अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद बुदियाफ यांचे निधन.

  • १९९२: सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजीराव भावे यांचे निधन.

  • १९९३: चिमणराव-गुंड्याभाऊ  मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते विष्णुपंत जोग यांचे निधन.

  • २०००: ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)

  • २०००: मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचे निधन.

  • २०१०: विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.