चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ मार्च २०१९

Date : 29 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांना एक सुवर्ण आणि दोन रौप्य :
  • नवी दिल्ली : तैपेईमधील ताओयुआन येथे सुरू असलेल्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांची कमाई केली.

  • रवी कुमार आणि ईलाव्हेनिल व्हालारिव्हान जोडीने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले. पात्रता फेरीत रवी आणि ईलाव्हेनिल यांनी ८३७.१ गुणांसह आघाडी मिळवली होती. मात्र पाच संघांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत पार्क सुनमिन आणि शिन मिन्की या कोरियाच्या जोडीने त्यांच्यावर सरशी साधली. कोरियाने ४९९.६ गुणांसह सुवर्णपदक मिळवले, भारतीय जोडीच्या खात्यावर ४९८.४ गुण जमा होते. चायनीज तैपेईच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. दीपक कुमार आणि अपूर्वी चंडेला या दुसऱ्या भारतीय जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

  • कनिष्ठ गटामधील १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात दोन संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले. मेहुली घोष आणि केवल प्रजापती जोडीने सर्वाधिक ८३८.५ गुणांसह पात्रता फेरी गाठली, तर श्रेया अग्रवाल आणि यश वर्धन यांना ८३१.२ गुणांसह दुसरे स्थान मिळाले.

  • अंतिम फेरीत श्रेया आणि यशने ०.४ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर नाव कोरले. अंतिम सहा फैरी बाकी असताना मेहुली आणि केवल जोडीकडे १.६ गुणांची आघाडी होती. मात्र अखेरच्या टप्प्यात श्रेया-यश जोडीने ४९७.३ गुणांसह मेहुली-केवल (४९६.९ गुण) जोडीवर मात केली. कोरियाच्या जोडीला कांस्यपदक मिळाले.

श्वेतवर्णीय वर्चस्ववादाबाबतच्या संदेशांवर फेसबुकची बंदी :
  • सॅनफ्रॅन्सिस्को : समाजात द्वेष पसरवणाऱ्या मजकुराला लगाम घालण्यासाठी श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचे समर्थन वा पुरस्कार करणाऱ्या मजकुरावर बंदी घालण्याची घोषणा फेसबुकने बुधवारी केली.

  • वंशभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या मजकुरावरील बंदी पुढील आठवडय़ापासून अमलात येईल. ही बंदी फेसबुकच्या इन्स्टाग्राम या छायाचित्रकेंद्रित समाज माध्यमावरील मजकुरालाही लागू असेल. वंशभेदविषयक मजकूर द्वेष पसरवणाऱ्या गटांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला आमच्या समाजमाध्यम सेवांवर थारा नाही, असे फेसबुकच्या प्रसिद्धी निवेदनात म्हटले आहे.

  • लोकांमध्ये धर्म-वंशाधारित द्वेष पसरवणाऱ्या संदेशांना प्रतिबंध करण्यासाठी फेसबुकने श्वेतवर्णीय कट्टरतावादाचे समर्थन करणाऱ्या संदेशांवर यापूर्वीच बंदी घातली आहे. परंतु व्यापक राष्ट्रवाद आणि राजकीय स्वातंत्र्याच्या अभिव्यक्तीचे कारण देत फेसबुकने काही संदेशांना या बंदीतून वगळले होते. असे असले तरी, तज्ज्ञ आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिकांशी केलेल्या चर्चेतून श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचा संबंध द्वेष पसरवणाऱ्या गटांशी असल्याचे आढळून आले आहे.

  • ‘दुर्दैवाने लोक आमच्या यंत्रणेचा वापर समाजात द्वेष पसरवण्यासाठी करतात, परंतु आम्ही श्वेतवर्णीय वर्चस्ववाद आणि अलिप्ततावादाचे समर्थन वा त्याला प्रोत्साहन देण्याचे प्रकार सहन करणार नाही,’ असे फेसबुकतर्फे  यासंदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदान केंद्रांवर यंदा १५ विविध सुविधा :
  • मुंबई : निवडणुकीकरिता मतदान केंद्रांवर अत्यावश्यक किमान सुविधांची संख्या या वर्षी दुप्पट करण्यात आली आहे.

  • वैद्यकीय किट, मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिलांसाठी मदतनीस, लहान मुलांसाठी पाळणाघर, रांगांचे व्यवस्थापन या वर्षी नव्याने करण्यात येणार आहे.

  • गेल्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांवर सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींचा समावेश होता. या वर्षी त्यात दुप्पट वाढ करण्यात येणार असून एकूण १५ प्रकारच्या सुविधा देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

  • मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग मतदार व महिलांसोबत येणाऱ्या लहान मुलांना उन्हापासून बचावाकरिता मंडप टाकण्याची सूचना करण्यात आली आहे. मतदारांच्या साहाय्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून यात राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट व गाइड विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

मुंबईचे दोन माजी पोलीस आयुक्त रिंगणात :
  • मुंबई : मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांसह राज्यात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केलेले निवृत्त सनदी आणि पोलीस अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणखी काही अधिकाऱ्यांची इच्छा असली तरी पक्षाची उमेदवारी त्यांना मिळू शकलेली नाही.

  • ओडिशातील भुवनेश्वर मतदारसंघातून मुंबईचे निवृत्त पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांची उमेदवारी बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जाहीर केली. निवडणूक लढविण्यासाठीच पटनायक यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी बिजू जनता दलात प्रवेश केला होता.

  • पटनायक हे मूळचे ओडिशा राज्यातील असल्याने तेथून निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. भारतीय पोलीस दलातील अरुप पटनायक यांची लढत भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या भाजपच्या उमेदवार अपरजिता सरंगी यांच्याशी होणार आहे. सरंगी यांनी भुवनेश्वरच्या पालिका आयुक्त म्हणून चांगले काम केले होते. यामुळे भुवनेश्वर लोकसभा मतदारसंघात भारतीय प्रशासकीय सेवा विरुद्ध भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.

  • मुंबईचे आणखी एक माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हे पुन्हा उत्तर प्रदेशातील बागपत मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बागपत मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग यांचा सत्यपाल सिंग यांनी पराभव केला होता. यंदा बागपत मतदारसंघात डॉ. सिंग यांची लढत अजित सिंग यांचे पुत्र जयंत चौधरी यांच्याशी होणार आहे.

नवउद्यमींना सवलती :
  • नवी दिल्ली : काँग्रेसने गरिबांसाठी ज्या किमान उत्पन्न योजनेचे आश्वासन दिले आहे, तिच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणामुळे ‘नुकसान’ झालेली अर्थव्यवस्था सुरळीत होईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले. गरिबीच्या विरोधात आम्ही केलेल्या प्रतिज्ञेमुळे भाजप पूर्णपणे गोंधळून गेला असल्याचा दावाही त्यांनी केला.

  • सरकारने स्टार्ट-अप उद्योगांवर लावलेला ‘एंजल टॅक्स’ हा ‘कठोर’ असल्याचे सांगतानाच, काँग्रेस सत्तेवर आल्यास हा कर रद्द करण्यात येईल, असेही गांधी यांनी सांगितले.

  • ‘न्याय’ या गरिबांसाठी असलेल्या जगातील सगळ्यात मोठय़ा योजनेमुळे देशात खप आणि उत्पादन यांच्या मजबूत आर्थिक साखळीला वाव मिळेल आणि त्यातून अर्थव्यवस्था बळकट होईल, असे लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या १५ दिवस आधी पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत राहुल यांनी सांगितले. भाजपने निश्चलनीकरण आणि जीएसटी ज्या घाईघाईत लागू केले, तशाप्रकारे ही योजना लागू केली जाणार नाही यावर त्यांनी भर दिला.

  • आपला पक्ष स्टार्ट-अपवर लावण्यात आलेला एंजेल टॅक्स रद्द करेल, नव्या उद्योगांना सुरुवातीची तीन वर्षे कुठलीही परवानगी मिळवण्यापासून सूट देईल, तसेच बँकांकडून कर्जे मिळण्याची प्रक्रिया सोपी करेल, असे सांगून राहुल यांनी अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यापक मुद्दय़ांना स्पर्श केला. स्टार्ट-अपमधील गुंतवणुकीवर एंजेल टॅक्स आकारण्यात येतो.

  • तळातील २० टक्के कुटुंबांना किमान उत्पन्नाची हमी देणे आणि मोदी यांनी नुकसान केलेली अर्थव्यवस्था रुळांवर आणणे असा ‘न्याय’ योजनेचा दुहेरी उद्देश आहे, असे गांधी म्हणाले. काही टीकाकार ज्याप्रकारे चित्र रंगवत आहेत त्याप्रमाणे ही लोकप्रिय योजना नाही, असेही त्यांनी सांगितले.

गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही - नरेंद्र मोदी :
  • माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत.

  • त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत. गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही, असे भाकीत मोदींनी केले आहे.

  • ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत देताना त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. तसेच विविध प्रश्नांची उत्तरे दिले. पूर्वीच्या सरकारला (तत्कालीन यूपीए सरकार) संरक्षण करार म्हणजे एटीएम होते, असा आरोप करत देशातील जनतेने मला बहुमताने सत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. २०१४ च्या तुलनेत विरोधक यावेळी जास्त विखुरले असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई इंडियन्सचा रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरवर ६ धावांनी विजय, एबी डिविलियर्स ७० धावांची खेळी व्यर्थ :
  • बंगळुरु : मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेजर्स बंगलोरचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल-12 मधील पहिला विजय साजरा केला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवणाऱ्या सामन्यात मुंबईनं बाजी मारली. बंगलोरकडून एबी डिव्हिलियर्सची 41 चेंडूतील 70 धावांची झुंज अपयशी ठरली.

  • जसप्रीत बुमराहने टाकलेली 19 वी ओव्हर सामन्यात निर्णायक ठरली. हार्दिक पंड्याने टाकलेल्या 18 व्या ओव्हरमध्ये एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबेने 18 धावा काढल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या ओव्हरमध्ये बुमराहने केवळ 5 धावा देत सामन्याला कलाटणी दिली.

  • एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद 70 धावांच्या खेळीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मुंबई इंडियन्सकडून अवघ्या सहा धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात मुंबईनं बंगलोरसमोर विजयासाठी 188 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत पाच बाद 181 धावांपर्यंत मजल मारता आली.

  • बंगलोरकडून कर्णधार विराट कोहलीने 46 धावा, पार्थिव पटेलने 31 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने चार ओव्हर्समध्ये 20 धावा देत तीन विकेट्स घेतल्या. तर मयंक मार्कंडेने एक विकेट घेतली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

  • १९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

  • १९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

  • १९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

जन्म 

  • १८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

  • १९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

  • १९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २०१०)

  • १९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

  • १९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)

  • १९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

  • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.