चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ मे २०१९

Updated On : May 29, 2019 | Category : Current Affairsकर्तारपूर मार्गिकेबाबत भारत- पाकिस्तानमध्ये मतभेद :
 • पाकिस्तानातील गुरूद्वारा दरबार नानक साहिब व भारतातील डेराबाबा नानक या शीख धर्मस्थळांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेबाबत दोन्ही देशांच्या तंत्रज्ञांमध्ये काही मुद्दय़ांवर मतभेद झाले आहेत. रावी नदीच्या पूरपठारावर पूल बांधण्याच्या मुद्दय़ाचा त्यात समावेश आहे त्यामुळे कर्तारपूर मार्गिका प्रकल्पात अडथळे निर्माण झाले आहेत.

 • भारत व पाकिस्तान यांच्या तज्ज्ञांची बैठक कर्तारपूर झिरो पॉइंट येथे झाली त्यात या मार्गिकेतील काही प्रक्रिया पद्धतींवर चर्चा करण्यात आली. एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार एक तासभर ही बैठक चालली होती. त्यात दोन्ही देशाच्या तंत्रज्ञ गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताने या मार्गिकेअंतर्गत रावी नदीवर एक किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची सूचना केली असून पाकिस्तानने रस्ता बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या प्रस्तावास आक्षेप घेतला असून नदीला पूर आल्यास भाविकांना धोका आहे त्यामुळे पूल बांधणेच योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 • रस्त्याची उंची जास्त ठेवून त्याच्या बाजूला धरण बांधता येईल असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील बैठकीच्या तारखेबाबत दोन्ही देशात मतैक्य होऊ शकलेले नाही. भारताकडून परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय बंदरे प्राधिकरणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे अधिकारी उपस्थित होते.

 • पाकिस्तानच्या बाजूने संघराज्य तपास संस्था, सीमा शुल्क, रस्ते बांधणी, पाकिस्तानी रेंजर्स पंजाब, पाकिस्तान  सर्वेक्षण संस्था यांचे अधिकारी उपस्थित होते. याआधी एप्रिलमध्ये तंत्रज्ञ गटाची बैठक झाली होती त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

सिंध प्रांतात ६०० जणांना ‘एचआयव्ही’ लागण :
 • पाकिस्तानातील सिंध प्रांतात सहाशेजणांना एचआयव्ही विषाणूची बाधा झाली असून हा प्रसार वाढतच चालला आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची मदत मागवण्यात आली आहे.

 • आतापर्यंत सिंध प्रांतातील लारखाना जिल्ह्य़ातील रातोडेरो जिल्ह्य़ात २१,३७५ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली त्यात ६८१ जणांना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषाणूची लागण झालेल्यात ५३७ व्यक्ती या २ ते १५ वयोगटातील आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, असुरक्षित रक्तसंक्रमण, वैदूंकडून केले जाणारे उपचार व जंतुसंसर्ग असलेली उपकरणे यातून एचआयव्हीचा प्रसार झाला असावा.

 • पंतप्रधान इमरान खान यांचे राष्ट्रीय आरोग्य सेवा विशेष सहायक झफर मिर्झा यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेचे दहा सदस्यांचे पथक काही दिवसात पाकिस्तानात येईल अशी अपेक्षा आहे. रातोडेरो येथील एचआयव्ही प्रसाराचे नेमके कारण आम्हाला समजून घ्यायचे आहे.

 • अमेरिकेतील सीडीसी या संस्थेचे प्रतिनिधीही या पथकात असतील. जंतुसंसर्ग झालेल्या सुया, रक्तसंक्रमण यामुळे एचआयव्हीचा प्रसार झाला असावा असा आमचा अंदाज आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात एका डॉक्टरला विषाणूयुक्त रक्त रुग्णांना दिल्याप्रकरणी अटक केली होती. यात १७ वैदूंनाही अटक केली असून त्यांचे कथित दवाखाने बंद करण्यात आले आहेत. मिर्झा यांनी सांगितले की, पन्नास हजार एचआयव्ही तपासणी संच मागवण्यात आले आहेत. मिरपूरखास, नबाब शहा, हैदराबाद येथे एचआयव्ही उपचार केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. 

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार :
 • कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.

 • लोकसभा निवडणुक निकालानंतर 30 मे ला पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. "मी इतर मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. ते देखील या शपथविधीला जाणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने मी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे", असे ममता यांनी म्हटले आहे.

 • लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनाही झाल्या. त्यावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

 • पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर 'फनी वादळ' धडकलं त्यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत विचारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या फोनला ममतांनी प्रतिसाद दिला नव्हता. या सगळ्या घटनांनंतर ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीला जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती.

नरेंद्र मोदींनंतर आता राहुल गांधींवरील बायोपिक लवकरच प्रदर्शित होणार :
 • मुंबई : 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जीवनावरील सिनेमादेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 'माय नेम इज रागा' असं या सिनेमाचं नाव असून लोकसभा निवडणुकीदरम्यान या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता.  या सिनेमाचा टिजर याआधीच प्रदर्शित झाला आहे.

 • लोकसभा निवडणुकीमुळे प्रदर्शन लांबवलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील 'पीएम नरेंद्र मोदी' हा सिनेमा 24 मे रोजी प्रदर्शित झाला आहे.  त्यानंतर लगेचच आता राहुल गांधींच्या जीवनावरील बायोपिक देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक रुपेश पॉल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 • लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची दिग्दर्शकाची इच्छा होती. मात्र निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिलेली नव्हती. निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमासह 'माय नेम इज रागा'चंही प्रदर्शन लोकसभा निवडणूक काळात थांबवलं होतं. परंतू निवडणूक आयोगापेक्षा राहुल गांधींच्या समर्थकांचा या सिनेमाला जास्त विरोध होता असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. 'राहुल गांधींच्या समर्थकांनी मोदींच्या भितीमुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. मात्र आता ती भिती संपली आहे', असं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला २९ मे पासून सुरुवात, अशी असणार प्रवेशप्रक्रिया :
 • मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 85.88 टक्के लागला आहे. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 29 मे 2019 पासून सुरु होत आहे.

 • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 29 मे ते 10 जून 2019 असणार आहे. अॅडमिशन फॉर्मच्या अर्जाची प्रिंट आऊट घेऊन महाविद्यालयात सादर करण्याची तारीख 7 ते 13 जून  पर्यंत असणार आहे. हे अर्ज दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. तसेच इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोट्याचा प्रवेश या कालावधीत करता येणार आहे. यानंतर टप्प्य़ा टप्प्यांनी मेरीट लिस्ट जाहीर होणार आहे.

 • मुंबई विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीची आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या 'त्या' सल्ल्याची जगभर चर्चा :
 • मुंबई : कॉमेडियन ते राष्ट्रपती असा प्रवास करणारे युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सध्या जगभर चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नका, असा सल्ला दिला आहे.

 • राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटलं की, "नेत्यांनी आपल्या कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नये. कारण राष्ट्रपती आयकॉन, मूर्ती किंवा चित्र नाही. माझ्याऐवजी तुमच्या मुलांचा फोटो कार्यालयात लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मुलांकडे पाहा."

 • युक्रेनमधील जनता फुटीरतावाद्यांसोबत सुरु असलेल्या संघर्षाला वैतागली आहे. "आमचं सरकार लोकांकडून लोकांसाठी चालवलं जाणारं प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार असेल. आम्ही असा देश निर्माण करु की, ज्यामध्ये सर्वांना समान नियम, कायदे लागू होतील" असं आश्वासनही झेलेन्स्की यांनी दिलं.

 • विषेश म्हणजे कॉमेडियन असलेल्या झेलेन्स्की यांनी एकदा राष्ट्रपतींची भूमिकाही निभावली होती. आज मात्र ते स्वत: राष्ट्राध्यक्षपदी आहेत. झेलेन्स्की यांनी गेल्याच वर्षी त्यांच्या पक्षाची नोंदणी केली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. झेलेन्स्की यांना 73.2 टक्के मतदान झालं आहे. त्यांनी पेट्रो पोरोशेंको यांचा पराभव केला.

यंदाची विश्वचषक स्पर्धा सर्वात आव्हानात्मक :
 • १२व्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या थराराला गुरुवारपासून सुरुवात होईल. व्यवस्थापन आणि आर्थिकदृष्ट्या यंदाची विश्वचषक स्पर्धा आतापर्यंतची सर्वात

 • मोठी आणि रोमांचक स्पर्धा ठरेल हे नक्की. यंदा विश्वविजेतेपदासाठी दहा संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. या विश्व स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून एकूण

 • १०० करोड रुपयांचा (१४ मिलियन यूएस डॉलर) वर्षाव होईल. यामध्ये विजेता संघ तब्बल ३२ करोड रुपयांचा (४.८ मिलियन डॉलर) धनी होईल. १९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकादरम्यान एकूण बक्षीस रक्कम एक लाख पौंड (आजच्या चलनात सुमारे १ करोड रुपये) इतकी होती. त्यावेळी विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाला ४ हजार पौंड (सुमारे ४ लाख) रक्कम मिळाली होती.

 • तेव्हा आणि आत्ताच्या काळातील आर्थिक गणित केल्यानंतर समोर येणारा फरक आश्चर्यकारक आहे. पण असे असले, तरी यातूनच क्रिकेटची झालेली प्रगती आणि खेळाचा झालेला जबरदस्त प्रसार याचीही माहिती मिळते. क्रिकेटच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान आहे ते सहाजिकंच भारताचे. एकूण उत्पन्नापैकी ७०-७५ टक्के उत्पन्न हे भारतामुळे मिळते. या सर्व आर्थिक गणितातून भारताला बाजूला ठेवले, तर क्रिकेटचे भविष्य मोठ्या प्रमाणात खालावेल.

देशभरातील कलाकारांचे मॅपिंग होणार; ७१३ जिल्ह्यात राबविणार :
 • पुणे : शासन स्तरावर कलाकार मंडळींसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या जातात. पण त्या कलाकारांपर्यंत पोहोचतच नाहीत. यासाठी आता केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशभरातील कलाकार, कलाप्रकार आणि त्यांचे ठिकाण यांचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला असून, याद्वारे देशभरातील ७१३ जिल्ह्यांमधील कलाकारांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’ असे या मिशनचे नाव आहे.    

 • अर्थतज्ञ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माजी प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता. त्याला मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, या मॅपिंगच्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली आहे. करंजीकर हे या ‘कल्चरल मॅपिंग मिशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष आहेत. 

 • यासंदर्भात दीपक करंजीकर म्हणाले, भारताला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. कलेसाठी अनेक कलाकारांनी आयुष्य समर्पित केले आहे. मात्र वयाच्या उतरत्या काळात त्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. शासनाच्या योजना तळागाळातील कलाकारांपर्यंत न पोहोचणे हे याचे प्रमुख कारण आहे. यासाठीच देशभरातील कलाकारांचे मॅपिंग करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला होता.

 • मँपिंगच्या माध्यमातून कलाकारांची डेमोग्राफी तयार होऊ शकेल. उदा: तो कलाकार कोणत्या भागातला आहे? तो कोणते वाद्य वाजवतो? याचा डेटा संकलित करण्यात येणार आहे.  प्रत्यक्षात कला ही तीन प्रकारात मोडते. कलात्मक,दृश्यात्मक  आणि साहित्य. या तिन्हींचे मिळून 86 उपप्रकार आहेत.

दिनविशेष :
 • जागतिक पचन स्वास्थ्य दिन

महत्वाच्या घटना 

 • १७२७: पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.

 • १८४८: विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.

 • १९१४: ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात १९९२ लोक ठार झाले.

 • १९१९: अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

 • १९५३: एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.

जन्म 

 • १९०६: भारतीय-इंग्लिश लेखक टी. एच. व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६४)

 • १९१४: एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९८६)

 • १९१७: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

 • १९२९: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचा जन्म.

मृत्यू 

 • १८१४: नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी जोसेफिन डी बीअर्नार्नास यांचे निधन. (जन्म: २३ जून १७६३)

 • १८२९: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १७७८)

 • १८९२: बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७ – तेहरान, इराण)

 • १९७२: अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)

 • १९७७: भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चटर्जी यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)

 • १९८७: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १९०२)

 • २००७: संगीतकार स्‍नेहल भाटकर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९१९)

 • २०१०: समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक ग. प्र. प्रधान यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)