चालू घडामोडी - २९ नोव्हेंबर २०१८

Date : 29 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मध्यप्रदेश निवडणुकीत ६५.५ टक्के मतदान :
  • मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बुधवारी एकूण ६५.५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानापेक्षा हे प्रमाण ७ टक्क्य़ांनी कमी आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ७२.६९ टक्के मतदान झाले होते, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

  • बुधवारच्या मतदानाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफायल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) सदोष असल्याच्या तक्रारींचे गालबोट लागले. तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी मिळाल्यानंतर ११४५ ईव्हीएम आणि १५४५ व्हीव्हीपॅट बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

  • राज्यातील २२७ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ य वेळेत मतदान झाले; तर नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्य़ातील लांजी, परसवाडा व बैहर या तीन मतदारसंघांत सकाळी ७ ते दपारी ३ या वेळेत मतदान घेण्यात आले, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही.एल. कंठा राव यांनी सांगितले.

  • बुधवारच्या मतदानादरम्यान सुमारे २.५ टक्के मतदान यंत्रे बदलण्यात आली. अलीकडेच निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये हेच प्रमाण सुमारे २ टक्के होते, असे राव म्हणाले. धार, इंदोर व गुणा जिल्ह्य़ांमध्ये कर्तव्य बजावताना ‘आरोग्यविषयक कारणांमुळे’ ३ कर्मचारी मरण पावल्याचेही त्यऋंनी सांगितले.

काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवणे शक्य :
  • भारताशी पाकिस्तानला मजबूत व सुसंस्कृत असे संबंध हवे आहेत, निर्धार केला तर काश्मीरसह सर्व प्रश्न दोन्ही देश सोडवू शकतात, यात शंका नाही, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कर्तारपूर मार्गिकेच्या पायाभरणी प्रसंगी केले. पाकिस्तानातील कर्तारपूरचे दरबार साहिब व गुरुदासपूर जिल्ह्य़ातील डेराबाब नानक या दोन धर्मस्थळांना जोडणारी ही मार्गिका असणार आहे.

  • भारतीय शीख भाविकांना तेथे व्हिसा शिवाय जाता येणार आहे. या कार्यक्रमास पंजाबचे मंत्री नवजोत सिंग सिद्धू, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर व हरदीप पुरी उपस्थित होते.

  • इम्रान खान म्हणाले, की भारतबरोबरचे संबंध पुढे सरकले पाहिजेत असे आम्हाला वाटते. जर फ्रान्स व जर्मनी या एकमेकाशी अनेक युद्धे लढणाऱ्या देशांत मैत्री व शांतता निर्माण होत असेल, तर भारत व पाकिस्तान यांच्यात ती का निर्माण होऊ शकत नाही. पाकिस्तान व भारत यांना देवाने दिलेल्या संधी समजत नाहीत. जेव्हा मी भारताला भेट देतो, तेव्हा  पाकिस्तानशी मैत्रीबाबत आमची एकजूट आहे पण लष्कर या मैत्रीत अडथळा आणते, असे तेथील राजकीय नेते सांगतात. आमच्यात तसे नाही.

  • लष्कर, राजकीय नेते व सर्वानाच भारताशी मैत्री हवी आहे. आम्ही पुढे जाऊ इच्छितो. आम्हाला सुसंस्कृत असे मैत्रीचे संबंध हवे आहेत. काश्मीर हा केवळ एक प्रश्न आहे. माणूस जर चंद्रावर चालू शकतो तर आपण सोडवू शकत नाही असे कोणते प्रश्न असू शकतात. आपण हे प्रश्न सोडवू शकतो, त्यासाठी निर्धार व मोठी स्वप्ने हवीत. समजा व्यापार सुरू झाला, दोन्ही देशांतील संबंध चांगले झाले, तर दोन्ही देशांना किती फायदा होईल याचा विचार करा.

  • भारताने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्तान मैत्रीसाठी दोन पावले टाकेल, दोन्ही देशांनी चुका केलेल्या आहेत पण याचा अर्थ दोन्ही देशांनी या भूतकाळात रमावे असा नाही. भूतकाळाची जोखडे टाकली नाहीत, एकमेकांवर आरोप बंद केले नाहीत, तर दोन्ही देश याच स्थितीत राहतील पण दोन्ही देशांतील संबंध सुधारले पाहिजेत असे आम्हाला वाटते. दोन्ही देशांतील नागरिकांना शांतता हवी आहे, आता दोन्ही देशांच्या नेत्यांनी त्यावर एकत्र काम केले पाहिजे.

‘…म्हणून पारसी असूनही मी सिंदूर लावते’, स्मृती इराणींनी दिले स्पष्टीकरण :
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानातील पुष्कर येथील मंदीरामध्ये आपले गोत्र ‘दत्तात्रेय’ असल्याचे सांगितल्यानंतर आज भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी आपले गोत्र सांगितले आहे. एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी आपल्या गोत्राची माहिती दिली.

  • या ट्विटमध्ये त्या म्हणतात माझे वडील हिंदू होते आणि त्यांचे गोत्र कौशल होते. त्यामुळे माझेही गोत्र कौशलच आहे. तर माझे पती आणि मुले पारसी असल्याने त्यांना गोत्र नसल्याचा खुलासाही इराणी यांनी केला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी आपण पारसी असूनही सिंदूर का लावतो याबद्दलही माहिती दिली.

  • पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे दररोज नवीन नवीन राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता निवडणुकीचा प्रचार पुन्हा एकदा जातीपाती, धर्म आणि गोत्र या विषयांकडे जाताना दिसत आहे. यावरूनच काल राहुल गांधी यांनी ब्रह्मदेवाच्या मंदिरामध्ये पुजेदरम्यान आपले गोत्र सांगितले. त्यानंतर आज एका नेटकऱ्याने स्मृती इराणी यांना त्यांचे गोत्र कोणते असा प्रश्न विचारला.

  • इराणी यांनी या प्रश्नाला ट्विटवरूनच उत्तर देताना म्हणाल्या, ‘माझ्या वडीलांचे गोत्र कौशल असल्याने माझे गोत्रही कौशलच आहे. माझे पती आणि मुले पारसी असल्याने त्यांना गोत्र नाहीय. माझी हिंदू धर्मावर श्रद्धा आहे म्हणून मी सिंदूर लावते.’

'अॅमेझॉन'चे वर्चस्व! 'फ्लिपकार्ट'ला टाकले मागे :
  • नवी दिल्ली -  सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू असते. अॅमेझॉन, फिल्पकार्टवर सारख्या कंपन्या सेलमध्ये बड्या ब्रँड्सच्या वस्तूंवर ग्राहकांना मोठी सवलत देत असतात. मात्र आता फिल्पकार्टला मागे टाकत अॅमेझॉनने बाजी मारली आहे. अॅमेझॉनने देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. 

  • अॅमेझॉनने 31 मार्च 2018 ला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल 53 हजार कोटी रुपयांची (साडेसात अब्ज डॉलर) विक्री करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. 'बार्कलेज'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून याबाबतची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉनने  पाच वर्षांपूर्वीच देशांतर्गत बाजारपेठेत पाऊल ठेवले आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टमध्ये सातत्याने स्पर्धा पाहायला मिळते. 

  • 'बार्कलेज'च्या अहवालानुसार 'ग्रॉस मर्कंटाइझ व्हॅल्यू्' अर्थात 'जीएमव्ही'मध्ये अॅमेझॉनने फ्लिपकार्टला मागे टाकून देशातील सर्वांत मोठी कंपनी बनण्याचा मान पटकावला आहे. मात्र या अहवालात 'फ्लिपकार्ट'च्या 'जबाँग' आणि 'मिंत्रा' या उपकंपन्यांचा विचार करण्यात आलेला नाही.

  • आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 'जीएमव्ही'च्या बाबतीत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यात मोठी स्पर्धा होती. आर्थिक वर्ष 2017-18 अॅमेझॉनने फ्लिपकार्टला मागे टाकल्याचे दिसून आले. 31 मार्चपर्यंत अॅमेझॉनने साडेसात अब्ज डॉलरचा तर फ्लिपकार्टने 6.2 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला आहे. 

यजमान भारताने पहिल्याच सामन्यात लावला पाच गोलचा धडाका :
  • भुवनेश्वर : यजमान भारताने हॉकी विश्वचषक स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करताना ‘क’ गटातील पहिल्या सामन्यात तुलनेत दुबळ्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा ५-० असा धुव्वा उडवला. युवा खेळाडूंचा भरणा अधिक असलेल्या भारतीय संघासाठी हा सामना चांगला सराव ठरला. सामन्यात दोन गोल केलेल्या सिमरनजीत सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

  • कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यावर भारताने एकहाती वर्चस्व राखताना दोन संघांतील फरक स्पष्ट केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या यजमानांनी दक्षिण आफ्रिकेला आपला खेळ करण्याची एकही संधी दिली नाही. विशेष म्हणजे सिमरनजीत सिंग याने दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मनदीप सिंग, आकाशदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.

  • भारतीयांच्या तुफान आक्रमणापुढे दुबळ्या दक्षिण आफ्रिकेचा काहीच निभाव लागला नाही. घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या मोठ्या पाठिंब्यासह खेळताना भारतीयांनी दक्षिण आफ्रिकेला हॉकीचे धडेच दिले.

  • मनदीप सिंग याने १०व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल नोंदवताना भारतीय संघाला आघाडीवर नेले. यानंतर आकाशदीप सिंग याने १२व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी केली. मध्यांतरापर्यंत भारताने हीच आघाडी कायम राखत सामन्यावर वर्चस्व राखल.

इन्फोसिस कर्मचाऱ्यांच्या पगारात दुप्पटीने वाढ होणार :
  • नवी दिल्ली : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता दुप्पट होणार आहे. पगारवाढीसंबंधी इन्फोसिस प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या सतत कंपनी सोडून जाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी इन्फोसिसने हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.

  • इन्फोसिस भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी सेवा असून, आयटी व्यावसायिकांची सर्वात मोठी भरती करणारी कंपनी सुद्धा आहे. दुप्पट पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट प्रक्रिया पार करावी लागेल. त्यात कर्मचारी यशस्वी ठरल्यानंतर ते दुप्पट पगारवाढीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती मिळत आहे.

  • इन्फोसिस अशा संस्थांपैकी एक आहे, ज्यात कर्मचाऱ्यांवर जास्तीत जास्त खर्च केला जातो. इन्फोसिसच्या वार्षिक अहवाल 2017-2018 च्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018 मध्ये इन्फोसिसने कर्मचारी लाभ खर्चाच्या अंतर्गत 32,472 कोटी रुपये खर्च केले होते. जे वर्ष 2015 मध्ये 30, 944 कोटी रुपयांवरुन 4.9 4 टक्क्यांनी वाढवले होते. तसेच 30 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या तिमाहीत इन्फोसिसने निव्वळ नफ्यात 10,110 कोटी रुपयांचा नफा कमावला होता.

'इफ्फी'त 'डॉनबास' सर्वोत्तम चित्रपट, सलीम खान विशेष पुरस्काराने सन्मानित :
  • पणजी : गोव्यातल्या शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये रंगतदार कार्यक्रमाने 49 व्या इफ्फीची सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चित्रपटाच्या ‘आनंदाचा प्रसार’ ही यावर्षीची इफ्फीची संकल्पना होती.

  • सुवर्णमयूर, रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कायर या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. चित्रपटातल्या अमूल्य योगदानाबद्दल सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने अरबाझ खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

  • सलीम खान यांनी 1970 च्या दशकात भारतीय चित्रपटामध्ये क्रांती घडवत बॉलिवूड फॉर्म्युल्यात परितर्वतन आणले. तसेच बॉलिवूड ब्लॉकबस्टरची संकल्पना रुजवली. मसाला चित्रपट आणि दरोडेखोर केंद्रीत चित्रपटांच्या जॉनरचा प्रारंभ केला. अँग्री यंग मॅन ही व्यक्तीरेखा निर्माण करून अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीचा पाया त्यांनी घातला.

  • सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनियन चित्रपट ‘डॉनबास’ला इफ्फी 2018 चा सर्वोत्कृष्ट चित्रपट सन्मान प्राप्त झाला. सुवर्ण मयूर, मानपत्र आणि 40 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांना समान विभागून देण्यात येते. ‘डॉनबास’ चित्रपटात पूर्व युक्रेनमधल्या दोन फुटीरतावादी गटातला सशस्त्र संघर्ष, हत्या, दरोडे यांबाबतची कथा आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

  • १९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

  • १९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

  • १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

  • २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

  • २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९५१)

  • १८७४: नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

  • १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)

  • १९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

  • १९१९: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)

  • १९२०: स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)

  • १९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)

  • १९३२: फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

  • १९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)

  • १९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

  • १९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)

  • १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)

  • २००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

  • २०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.