चालू घडामोडी - ३० एप्रिल २०१८

Date : 30 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान युद्ध सराव : 
  • नवी दिल्ली : सप्टेंबरमध्ये रशियात होणाऱ्या राष्ट्रीय युद्ध सरावात भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी देश सहभागी होणार आहेत. दहशतवादी कारवायांना चाप बसवण्यासाठी आयोजित या युद्ध सरावात चीनसह अनेक देश सहभागी होणार आहे.

  • शांघाय सहयोग संघटना (एससीओ)कडून याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या संस्थेवर चीनचं प्रभुत्व असल्याने त्याची ‘नाटो’शी तुलना केली जात आहे. या युद्ध सरावाचे आयोजन उराल भागात होणार असून, एससीओमधील सर्व सदस्य देश यात सहभागी होतील.

  • दहशतवादाचा सामना करण्यासाठी एससीओच्या आठ सदस्य देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर विशेष भर असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये एससीओ सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या. त्यांनीही सैन्य अभ्यासाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

  • सीतारामण यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानसारखे दोन प्रतिस्पर्धी देश युद्ध सरावात सहभागी होणार आहेत.” पण दुसरीकडे दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्राच्या शांती रक्षा मिशनमध्येही काम केलं आहे.

  • रशिया, चीन किर्गिज गणराज्य, कझाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांनी 2001 मध्ये शांघायमध्ये आयोजित शिखर परिषदेत एससीओची स्थापना केली. 2005 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे देश पर्यवेक्षक म्हणून या संघटनेत सहभागी झाले.

नागराज मंजुळेला बॉलिवूडमध्ये 'बिग शॉक', अमिताभ बच्चन यांनी सोडला सिनेमा :
  • मुंबई: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित 'झुंड' या चित्रपटामधून अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. चित्रपटाचे शुटिंग वारंवार पुढे ढकलले जात असल्याने अमिताभ यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे यांच्यात गेल्यावर्षी 'झुंड'च्या प्रोजेक्टवर काम करण्याविषयी चर्चा झाली होती.

  • काही कारणांमुळे 'झुंड'चे चित्रीकरण सातत्याने लांबणीवर पडत आले आहे. मध्यंतरी याच कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील चित्रपटाचा सेट हटविण्याच्या सूचनाही नागराज मंजुळेंना देण्यात आल्या होत्या.

  • त्यानंतरही 'झुंड'च्या चित्रीकरणाचे गाडे फारसे पुढे सरकले नव्हते. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनीही आता चित्रपटामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही कारण न देता चित्रटाचे शुटिंग सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अमिताभ यांना अन्य निर्मात्यांना तारखा देता येत नव्हत्या.

  • आता अधिक काळ इतर निर्मात्यांना तारखा न देणे बच्चन यांना परवडणारे नाही. त्यामुळे अमिताभ यांनी 'झुंड'मध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, चित्रपटाच्या मार्गात कॉपीराईटचेही काही अडथळे आहेत. परिणामी अमिताभ बच्चन यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेऊन निर्मात्यांकडून आतापर्यंत देण्यात आलेले मानधनही परत केल्याचे समजते. 

कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उप-मुख्यमंत्री :
  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये मोठे राजकीय फेरबदल घडले आहेत. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी राजीनामा दिला आहे. आता निर्मल सिंह यांच्या जागी कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कविंद्र गुप्ता हे सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे. 

  • कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये भाजपाच्या काही मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती.

  • त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित 9 अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला. 

  • दरम्यान, राजकीय फेरबदलासंदर्भात कविंद्र गुप्ता म्हणालेत की, 'पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी मी प्रयत्न करेन. तसंच कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू''. 

स्वच्छ भारत समर इंटर्नशिप कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मोदी यांचे तरुणांना आवाहन :
  • नवी दिल्ली : ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’मध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असा सल्ला देतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले की, तीन मंत्रालयांनी तरुणांसाठी ही इंटर्नशिप सुरु केली आहे. यात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार दिला जाईल.

  • आकाशवाणीवरील ‘मन की बात’या कार्यक्रमात पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडूंच्या शानदार कामगिरीचा उल्लेख केला आणि त्यांचे अभिनंदन केले. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल-टेनिसमधील खेळाडूंचा त्यांनी विशेष उल्लेख केला. महिला खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले.

  • पोखरणने भारताची आण्विक शक्ती सिद्ध केली पोखरणमध्ये २० वर्षांपूर्वी घेतलेल्या आण्विक चाचणीने जगात भारताची आण्विक शक्ती सिद्ध केली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ११ मे १९९८ रोजी बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी घेतली होती.

  • भारत हा महान वैज्ञानिकांचा देश आहे, हा संदेश यातून गेला. त्या दिवशी अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’हा मंत्र दिला, असे ते म्हणाले.

किरण बेदींची १२ तासांत माघार :
  • नवी दिल्ली : पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी ‘स्वच्छतागृह नाही, तर तांदूळ नाही’ हा वादात सापडलेला व शनिवारी सकाळी दिलेला आदेश १२ तासांत मागे घेतला.केंद्रशासित प्रदेशातील अत्यंत गरीब कुटुंबांना मोफत तांदूळ दिला जातो. या लाभार्थींनी त्यांचे

  • गाव उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त (ओपन डिफेकेशन फ्री-ओडीएफ) झाल्याचे व स्वच्छ झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना मोफत तांदूळ मिळणार नाही, असे आदेशातम्हटले होते.

  • हा आदेश म्हणजे ‘हुकुमशाही’ असल्याची जोरदार टीका काँग्रेसने केल्यानंतर तो मागे घेतला गेला. किरण बेदी यांनी प्रशासनाला सांगितले होते, की ग्रामीण भागातील नेते मंडळी सरकारकडून चांगल्या सोयी- सवलती तावातावाने मागतात व त्यासाठी प्रयत्नही करतात. परंतु, स्वच्छ भारत योजनेतील आरोग्य मोहिमांसाठी तेवढाच उत्साह दाखवत नाहीत. शनिवारी सकाळी बेदी यांनी खेड्याला भेट दिल्यावर आदेश निघाला होता. खेडे खूपच अस्वच्छ असल्याचे त्यांचे मत बनले व त्यांनी आदेश जारी करण्यास सांगितले.

दिनविशेष : 
  • आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

महत्वाच्या घटना

  • १४९२: स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.

  • १६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.

  • १७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

  • १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

  • १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

  • १९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

  • १९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

  • १९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

  • २००९: ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

जन्म

  • १७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी१८५५)

  • १८७०: भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

  • १९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

  • १९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

  • १९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

  • १९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

  • १९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

मृत्यू

  • १०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)

  • १८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

  • १९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

  • १९४५: जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)

  • २००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

  • २००३: मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)

  • २०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.