चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० एप्रिल २०१९

Date : 30 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पोस्टात उघडलं जातं मुलींसाठी हे खास खातं, जमा होणार ४० लाखांचा फंड :
  • नवी दिल्ली- मुलीच्या भविष्याची चिंता आई-वडिलांना नेहमीच सतावते. मुलीला चांगलं शिक्षण आणि अनेक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकारही प्रयत्नशील असते. सरकार मुलींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. विशेष म्हणजे त्याच योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना ही खास आहे. या योजनेंतर्गत आपली मुलगी 10 किंवा त्याहून कमी वयाची असल्यास पोस्टात जाऊन तिच्या नावे खातं उघडू शकता. तसेच मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ते पैसे आपल्याला व्याजासहीत परत मिळतात.

  • मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या विवाहाच्या तरतुदीसाठी अल्पबचतीस प्रोत्साहन देण्याकरिता डिसेंबर 2014मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेचाही ग्राहकांनी भरभरून लाभ घेतला. सरकारनं या योजनेंतर्गत मिळणारे व्याजदर वाढवून 8.5 टक्के केले आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत आपण फक्त 250 रुपयांमध्ये खातं उघडू शकतो. ज्यासाठी पहिल्यांदा 1000 रुपये मोजावे लागत होते. आपल्यालाही जर मुलगी असेल तर केंद्राची ही योजना भरपूर फायदेशीर ठरू शकते. 

  • अशी आहेत उद्दिष्ट्ये - जन्मापासून ते 10 वर्षं वयोगटातील मुलींची खाती या योजनेंतर्गत उघडता येते. दाम्पत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येऊ शकते. कमीत कमी 250 रुपये व अधिकाधिक दीड लक्ष रुपये एका वित्तीय वर्षात मुलीच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते. यावर शासनाकडून 9.2 टक्के दराने व्याज दिले जाते. खातेधारकाची किंवा मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण किंवा विवाहप्रसंगी खर्चाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी पूर्ण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येते. 21 वर्षे वय पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व झाले असे नमूद आहे.

  • कुठे उघडू शकतो खातं- मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत, कुठल्याही टपाल कार्यालयात किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत, तिचे जन्म प्रमाणपत्र सादर करून केवळ एक हजार रुपयांच्या ठेवीवर पालक हे खाते उघडू शकतात. 

  • किती कराल गुंतवणूक-  मुलीच्या पालकांना या खात्यात एका आर्थिक वर्षात कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. मुलगी 10 वर्षांची होईपर्यंत तिच्या पालकांना या खात्यातील व्यवहार करता येतील, तर मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर तिला खात्याचे व्यवहार करण्यास पात्र समजले जाईल. या खात्याला 21 वर्षांची मुदत आहे. 

  • प्राप्तिकरातून मिळते सूट- या योजनेत दीड लक्ष रुपयांपर्यंतच्या अंतर्गत प्राप्तिकर सूट देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांला मदत एकाच टप्प्यात मिळणार असल्याने विकासाचे पर्यायाने समृद्धीचे बळ मिळेल.

सनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल, सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती :
  • अमृतसर : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सनीने त्याच्या प्रतिज्ञापत्रात त्याच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे.

  • सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्याच्या बँक खात्यात 35 लाख रुपयांची रोकड आहे. सनीची पत्नी पूजा देओल यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 19 लाख आणि 16 लाख रुपयांची रोकड आहे.

  • सनीने त्याचे खरे नाव अजय सिंह देओल या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना सनीसोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह तसेच सनीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल उपस्थित होते.

  • सनी देओलकडे त्याची सावत्र आई आणि खासदार हेमामालिनी यांच्या तुलनेत खूप कमी संपत्ती आहे. हेमामालिनी यांच्याकडे 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंनी 'एक होतं पाणी'चे केले तोंडभरून कौतुक :
  • मुंबई, आयपीएल २०१९: आयपीएलचे प्ले ऑफ व फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय बीसीसीआयने सोमवारी घेतला. आधीच्या वेळापत्रकानुसार हे सामने रात्री ८ वाजता होणार होते. ते आता सायंकाळी ७:३० वाजता होतील. प्ले ऑफ सोबतच अंतिम सामना अर्धा तास आधी होणार आहे. तसेच, ७ ते १२ मे दरम्यान सामने होणार आहेत. 

  • यंदाच्या आयपीएलमध्ये प्रथमच महिलांच्या मिनी ट्वेंटी-२० लीगचे आयोजन करण्यात येणार आहेत. तीन संघांचा समावेश असलेल्या या लीगचे सामने ९ ते ११ मे दरम्यान जयपूर मध्ये होणार आहेत. हेही सामने सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येतील. मात्र या लीगचा ८ मे रोजी होणारा दुसरा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल.

देशात चौथ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान :
  • लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी नऊ राज्यांमधील ७२ मतदारसंघांमध्ये सुमारे ६४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही घटना घडल्या, तर काही भागात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याच्या तक्रारी मिळाल्या.

  • २०१४ च्या निवडणुकांत ज्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपने ३२ पैकी ३० जागा मिळवल्या होत्या, त्या राजस्थानमध्ये (१३ जागा) ६२ टक्के, उत्तर प्रदेशात (१३ जागा) ५३.१२ टक्के, तर मध्य प्रदेशात (६ जागा) ६५.८६ टक्के मतदान झाले.

  • पश्चिम बंगालमधील आठ मतदारसंघांत ७६.४७ टक्के मतदान झाले. बिरभूम मतदारसंघातील नानूर, रामपूरहाट, नलहाटी व सुरी येथे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये चकमकी उडाल्या व त्यात अनेक लोक जखमी झाले.

  • आसनसोल मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या वाहनाची बाराबानीतील एका मतदान केंद्राबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. दुब्राजपूर भागात मोबाइल फोन घेऊन मतदान केंद्रात शिरू पाहणाऱ्या लोकांना अटकाव करणाऱ्या केंद्रीय सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांवर या लोकांनी हल्ला केल्यानंतर त्यांना पांगवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला.

  • २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने आज मतदान झालेल्या ७२ पैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी सुमारे १२.७९ कोटी मतदार पात्र होते. याबरोबरच महाराष्ट्र आणि ओडिशातील निवडणुका आटोपल्या असून, राजस्थान व मध्य प्रदेशातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

राफेल निर्णय फेरविचार याचिका - सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी :
  • सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराबाबत १४ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्णयाच्या फेरविचाराची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी मंगळवारी होत आहे.

  • दरम्यान, ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. या मागणीचे पत्र संबंधित पक्षकारांनाही देण्याची परवानगी न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला दिली. परंतु सुनावणी पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नाही.

  • सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबरच्या निकालात ३६ राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निर्णय प्रक्रियेवर संशय घेण्यास जागा नसल्याचे स्पष्ट करत या व्यवहारात गैरप्रकार घडल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. परंतु या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

  • या फेरविचार याचिकांच्या गुणवत्तांबाबत उत्तर दाखल करण्यास आपल्याला आणखी वेळ हवा असल्याचे केंद्राने पत्रात म्हटले आहे. याचिकाकर्त्यांसह इतर पक्षांना हे पत्र देण्याची परवानगी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर. बालसुब्रमणियन यांना दिली. तथापि, मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्दय़ावर खंडपीठाने काहीही भाष्य केले नाही.

  • माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी दाखल केलेल्या याचिका मंगळवारी दुसऱ्या सत्रात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोरील सुनावणीच्या यादीत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि अ‍ॅड. विनीत धांडा यांच्या याचिकांवरही मंगळवारीच सुनावणी होणार आहे.

होय! आमच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत, पाकिस्तानी लष्कराची कबुली :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना कार्यरत असून या संघटना सातत्याने भारतासह आसपासच्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करतात, असा आरोप भारत नेहमीच करत आला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याबाबतचे पुरावेदेखील अनेकदा सादर केले आहेत. परंतु पाकिस्तानने ते कधीही मान्य केले नाहीत. परंतु आता मात्र पाकिस्तानने त्यांच्या देशात दहशतवादी आणि जिहादी संघटना असल्याचे मान्य केले आहे.

  • पाकिस्तानी सैन्याचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत ते म्हणाले की, पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि जिहादी संघटना आहेत. या संघटनांवर आम्ही कारवाया करत आहोत. परंतु त्यांना संपवण्यासाठी अजून खूप काही करण्याची आवश्यकता आहे.

  • गफूर म्हणाले की, कट्टरवादी आणि जिहादी संघटनांवर आम्ही बहिष्कार घातला आहे. आम्ही सातत्याने त्यांच्यावर कारवाया करत असतो. परंतु त्यांचा पूर्ण नाश करण्यासाठी बरीच कामं करावी लागणार आहेत. या दहशतवाद्यांमुळे पाकिस्तानचे आतोनात नुकसान झाले आहे. यापूर्वीची सर्व सरकारे या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरली आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

महत्वाच्या घटना 

  • १६५७: शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.

  • १७८९: जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

  • १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

  • १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

  • १९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

जन्म 

  • १७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

  • १९०९: माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

  • १९१०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

  • १९२१: जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

  • १९२६: मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

  • १९८७: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

मुत्यू 

  • १०३०: तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)

  • १८७८: साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

  • १९१३: व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

  • २००१: प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

  • २०१४: भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.