चालू घडामोडी - ३० ऑगस्ट २०१८

Date : 30 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्वप्ना बर्मननं हेप्टॅथ्लॉन प्रकारात सुवर्णपदक :
  • जकार्ता : भारताच्या स्वप्ना बर्मननं हेप्टॅथ्लॉन प्रकारात भारताला एशियाडचं सुवर्णपदक मिळवून दिलं. स्वप्नानं या प्रकारात 6026 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं भारताचं हे अकरावं सुवर्ण पदक ठरलं. हेप्टॅथ्लॉनमध्ये अॅथलेटिक्सच्या सात प्रकारांचा समावेश होतो.

  • यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 800 मीटर धावण्याची शर्यत खेळवली जाते. याशिवाय उंच उडी, लांब उडी आणि भालाफेकीचाही हेप्टॅथ्लॉनमध्ये समावेश असतो. स्वप्नानं या सातही खेळांत सर्वाधिक गुणांची कमाई करत अकरावं सुवर्ण भारताच्या झोळीत टाकलं.

  • याआधी एशियाडच्या अकराव्या दिवशी भारताच्या अरपिंदर सिंगनं एशियाडमध्ये तिहेरी उडीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. अरपिंदरनं चौथ्या प्रयत्नात 16.77 मीटरची उडी घेत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. अरपिंदर सिंगनं याआधी 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती.

  • भारताच्या द्युती चंदनं एशियाडमध्ये महिलांच्या 200 मीटर्स शर्यतीत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. यंदाच्या एशियाडमधलं द्युतीचं हे दुसरं पदक ठरलं. द्युतीनं 23.20 सेकंदाची वेळ देत रौप्यपदकाची कमाई केली.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सात टक्के महागाई भत्ता मिळतो. आता दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे.

  • मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 1 जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तर 61 लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत.

  • सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू झाली होती.

  • महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाऊन्स हा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेंशनधाकरांना मिळते. वाढती महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो.

पोस्टमनकाका होणार चालती-फिरती बँक: पत्रांसोबत पैसेही वाटणार :
  • नवी दिल्ली : टपाल विभागाची पोस्टल पेमेंट बँक १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये या बँकेचा प्रारंभ एका क्लिकने करतील व त्याचवेळी देशातील ६५० जिल्ह्यांत पेमेंट बँक सुरू होईल. ६५० जिल्ह्यांत या कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक खासदार, आमदार व भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. या सगळ्या ठिकाणी मोदी यांचे भाषण टेलिकॉन्फरसिंगच्या माध्यमातून दाखविले जाईल.

  • या उपक्रमाबाबत दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पेमेंट बँक व्यवस्थित चालण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आधी मंजूर केलेल्या ८०० कोटी रुपयांशिवाय बुधवारी अतिरिक्त ६३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. व्यवसाय करता करता येत्या तीन वर्षांत ही पेमेंट बँक ना नफा ना तोटा या टप्प्यापर्यंत पोहोचेल.

  • त्यानंतर बँक नफा मिळवू लागेल, याची आम्हाला खात्री आहे. ही बँक आपल्या खातेदारांना चार टक्के दराने व्याज देणार आहे. सिन्हा म्हणाले, बँक डिजिटल असेल. आधार क्रमांकाने तिच्यात खाते सुरू करता येईल. कागदाचा वापर शून्य असेल. पोस्टल पेमेंट बँक पैसे घरी नेऊन देणारी पहिलीच बँकदेखील बनेल.

  • यासाठी देशातील ४० हजार नियमित व २.४० लाख ग्रामीण टपालसेवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे पोस्टमन चालती-फिरती बँक बनतील ते घरी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या मदतीने खाते सुरू करतील, पैसे जमा करतील व रोख पैसेही देतील. यासाठी नाममात्र कमिशन ते घेतील. टपाल विभागाचे १७ कोटी बचत खातेधारक असून त्यांनाही या बँकेशी जोडण्याचे कार्य केले जाईल.

पहिला जिओचा नंबर! जिओकडे सर्वाधिक ३८% वाटा, युजर्संची संख्या तब्बल :
  • नवी दिल्ली : केवळ ४ जी सेवा आणि अत्यंत स्वस्त दर यामुळे रिलायन्स जिओ ही भारतातील प्रथम क्रमांकाची डेटा सेवादाता कंपनी बनली आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन, आयडिया सेल्युलर आणि बीएसएनएल या जुन्या कंपन्यांना जिओने मागे टाकले आहे.

  • दूरसंचार नियामक संस्था ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात ४९४ दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. त्यात जिओचा वाटा सर्वाधिक ३७.७ टक्के आहे. मार्च २0१८ अखेरीस जिओची ग्राहक संख्या १८६.५ दशलक्ष होती. जिओची सेवा सप्टेंबर २0१६मध्ये सुरू झाली.

  • ९0च्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेल्या एअरटेलचा बाजार हिस्सा २३.५ टक्के आहे. एअरटेलची इंटरनेट सेवा ग्राहक संख्या ११६ दशलक्ष आहे. एअरटेलकडे २ जी ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. हे ग्राहक प्रामुख्याने बिगर-इंटरनेटचा फिचर फोन वापरतात. केवळ व्हॉईस कॉलसाठीच हे फोन वापरले जातात.

  • विलीनीकरणाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांचा एकत्रित इंटरनेट बाजार हिस्साही जिओच्या खूपच मागे आहे. व्होडाफोनचा हिस्सा १५.४ टक्के (७६ दशलक्ष ग्राहक) आणि आयडियाचा ९.५ टक्के (४७ दशलक्ष ग्राहक) आहे. सरकारी मालकीच्या बीएसएनएलची उपस्थिती दिल्ली, मुंबई वगळता देशभर आहे. तरीही कंपनीचा बाजार हिस्सा अवघा ६.४ टक्के आहे. ३१.४ दशलक्ष ग्राहकांसह कंपनी इंटरनेट सेवेत पाचव्या स्थानी आहे.

माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन :
  • पुणे : माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे गुरुवारी (30 ऑगस्ट) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. थोरात यांच्या मागे त्यांची पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 

  • मंडई म्हणजे वसंत थोरात असे समीकरण असलेल्या वसंत थोरात यांचा अखिल मंडई मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक कामात महत्वाचा वाटा होता. युद्ध व आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत पाठविण्यात त्यांचा सहभाग असे. काँग्रेसचे ते शहराध्यक्ष होते.

  • 1974 -75 मध्ये ते महापौर झाले. मंडईमध्ये येणाऱ्या शेतकरी व गरीबांना किमान दोन घास खाता यावेत, या हेतूने महाराष्ट्रात प्रथम 1974 मध्ये झुणका भाकर केंद्र सुरु केले. तेव्हा त्यांनी महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1977 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती.

  • 1991 मध्ये ते आमदार झाले. शिवाजी मराठा सोसायटीचे ते मानद सचिव, अ. भा. मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार, सद्गुरू शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आणि बदामी हौद संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.

  • १८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.

  • १८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.

  • १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.

जन्म

  • १८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९)

  • १८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)

  • १८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर१९३७)

  • १८८३: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ – मुंबई)

  • १९२३: हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)

  • १९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)

  • १९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)

  • १९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.

  • १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.

मृत्यू

  • १७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)

  • १९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)

  • १९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)

  • १९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर१९०७)

  • १९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)

  • १९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)

  • २००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)

  • २०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)

  • २०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.