चालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१७

Date : 30 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
३१ उपग्रहांचे होणार एकाच वेळी प्रक्षेपण :
  • बंगळुरू : ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या शक्तिशाली अग्निबाणाने येत्या १० जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तब्बल ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार आहे.

  • या मोहिमेसाठी पीएसएलव्ही-सी ४० हा अग्निबाण वापरला जाईल. यात सोडल्या जाणा-या उपग्रहांमध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ मालिकेतील पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह हा मुख्य व सर्वात मोठा उपग्रह असेल. याखेरीज भारताचे दोन लघू व एक अतिलघू उपग्रहही या वेळी सोडले जातील.

  • इतर २८ लघू उपग्रह फिनलॅण्ड व अमेरिकेसह इतर देशांचे असतील. गेल्या आॅगस्टमध्ये अशाच प्रकारच्या अग्निबाणाने ‘आयआरएनएसएस-१ एच’ उपग्रह सोडण्याची मोहीम अपयशी ठरली होती. (source :lokmat)

एकाच दिवसात १६ वेळा नववर्ष :
  • वॉशिंग्टन : जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत असताना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावरील सहा अंतराळवीर एक अनोखी अनुभूती घेणार आहेत.

  • ४०२ किमी उंचीवर असलेला हा तळ दर ९० मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा करत असल्याने या अंतराळवीरांना सरत्या वर्षाचा सूर्यास्त आणि नववर्षाचा सूर्योदय (एकाच दिवसात) १६ वेळ पाहता येणार आहे. तळावर अमेरिकेचे तीन, रशियाचे दोन व जपानचा एक अंतराळवीर आहे.

  • सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवडा ते हलके काम करून व कुटुंबांशी संवाद साधून व्यतीत करतील.(source :lokmat)

एलिव्हेटेड रेल्वेबाबत निर्णय मार्चमध्ये :
  • नवी दिल्ली : मुंबईत होणा-या देशातील पहिल्या एलिवेटेड (उंचीवरुन) रेल्वे लाइनचे रंग रुप कसे असेल? याचा निर्णय नव्या वर्षात होणार आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, मार्चपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत चर्चगेट - विरार आणि सीएसटी - पनवेल दरम्यान एलिवेटेड रेल्वे लाइन करण्याची घोषणा रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती.

  • मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणाºया रेल्वे लाइनवरील प्रवाशांचा वाढता ताण कमी करणे आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुविधाजनक करणे, हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आगामी तीन महिन्यात आम्ही या प्रकरणी निर्णयाप्रत येऊ.

  • या विषयावर सुरु असलेला अभ्यास फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

  • रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी सांगितले की, मुंबईतील लाइन्सवर निश्चितपणे ताण वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव दिलासा देणारा आहे. पण, आमचा निर्णय याबाबतच्या अहवालावरुनच ठरणार आहे. जर अहवालात या लाइन्स बनविण्याबाबत सकारात्मक मत आले तर, सद्याच्या लाइन्सच्या अगदी वर न करता त्या लाइनसोबत बनविण्यात येतील.(source :lokmat)

११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या :
  • मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. अतुल पाटणे यांची सहकार व पणन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त एन.के. पोयाम यांची मुंबई कामगार आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

  • गृहनिर्माण विभागाचे सहसचिव बी.जी. पवार यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील.

  • नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आर.एस. जगताप यांना पुणे येथील कृषी प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस. रंगा नाईक यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.

  • तर एम.जी. गुर्सल मुंबईत विक्री कर विभागाचे सहआयुक्त असतील. गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांची नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला औरंगाबाद येथील जल व मृदा संधारणचे आयुक्त असतील. (source :lokmat)

मेघालयमधील पाच काॅंग्रेस आमदारांचा राजीनामा; मुकुल संगमांना धक्का :
  • शिलॉंग- कॉंग्रेस पक्षाला मेघालयमध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या पाच आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन पक्षासमोर नवे संकट उभे केले आहे. विशेष म्हणजे या पाच आमदारांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर इतर तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे.

  • या इतर तिघांमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या एका आमदाराचा व दोन अपक्षांचा समावेश आहे. या सर्वांनी आपले राजीनामे विधानसभेचे मुख्य सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.

  • कालच कॉंग्रेसचे आमदार पी.एम. साइयाम यांनी राजीनामा दिला होता. सलग दोन दिवस चाललेल्या या राजीनामा सत्रामुळे विधानसभेत कॉंग्रेसचे आता केवळ 24 आमदार राहिले आहेत.कॉंग्रेसचे मेघालयातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री रॉवेल यांनी या राजीनाम्याबद्दल बोलताना नंतर सांगितले, "आज राजीनामा देणारे आठ आमदार पुढील आठवड्यामध्ये नॅशनल पिपल्स पार्टीमध्ये सहभागी होणार आहेत.

  • " एकूण साठ सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे 30 सदस्य आहेत. विधानसभेचा कार्यकाळ 6 मार्च रोजी संपणार असून पुढील वर्षी नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. (source :lokmat)

येथे असते उणे ५० तापमान :
  • मॉस्को- हिवाळ्यात आपल्याकडे ८ ते १० डिग्री सेल्सिअस तापमान असले तरी अक्षरश: हुुडहुडी भरते. मात्र रशियातील याकूत्स्क या ठिकाणी तापमान उणे ५० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि तेथील लोक अशा तापमानातही राहतात. रशियाच्या दक्षिण भागात हे शहर लेना नदीकिनारी वसलेले आहे.

  • त्यामुळेच याला पोर्ट सिटी म्हणूनही संबोधले जाते. या शहराची लोकसंख्या २,५०,००० एवढी आहे. या शहराची स्थापना १६३२ मध्ये झाली होती. १८८० आणि १८९० मध्ये येथे मिळालेल्या सोने आणि खनिज पदार्थांच्या भांडाराने या शहराला महत्व प्राप्त झाले. या शहराचा विस्तार झाला.

  • साधारणत: १२ मे ते १० सप्टेंबर या काळात येथे उन्हाळा असतो. या काळात येथील तापमान १२ डिग्री सेल्सिअस असते. येथे हिवाळा १८ नोव्हेंबर ते १ मार्चपर्यंत असतो.(source :lokmat)

मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं वृद्धापकाळाने निधन :
  • मुंबई : मुंबईचे माजी रणजीपटू होशी अमरोलीवाला यांचं शुक्रवारी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

  • अमरोलीवाला यांनी 44 प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात 35 रणजी सामन्यांचा समावेश होता. अमरोलीवाला यांनी 44 सामन्यांमध्ये 44.55 च्या सरासरीनं 1782 धावांचा रतीब घातला आहे. त्यांनी लेग स्पिन गोलंदाजी करून 14 विकेट्सही घेतल्या आहेत.

  • 1958-59 मध्ये मुंबई आणि बंगाल संघादरम्यान झालेल्या सामन्यात त्यांनी 139 धावा झळकावत मुंबई संघाला चॅम्पियन बनवले होते.

  • शिवाय, रणजी चषकात मुंबईच्या संघात त्यांचा पाचवेळा समावेश झाला होता. तर दोन वेळा त्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या संघाने इराणी ट्रॉफी देखील आपल्या नावावर केली होती.

  • त्यांच्यासोबत माधव मंत्री, पॉली उम्रीगर, रुसी मोदी, अजीत वाडेकर, दिलीप सरदेसाई, अशोक मंकड, नरेन ताम्हाणे आणि रमाकांत देसाई सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेट खेळलं होतं.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

  • १९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

  • १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

  • २००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.

जन्म

  • १८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी१९३६)

  • १८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल१९५०)

  • १८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)

  • १९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९६३)

  • १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)

  • १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)

  • १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.

  • १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.

मृत्य

  • १६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७)

  • १९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६)

  • १९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)

  • १९७४: गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन.

  • १९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)

  • १९८७: संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे निधन.

  • १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)

  • २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च१९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.