चालू घडामोडी - ३० जानेवारी २०१९

Updated On : Jan 30, 2019 | Category : Current Affairsगरिबांना उत्पन्नाची हमी नंतर राहुल गांधींकडून महिला आरक्षणाची घोषणा :
 • लोकसभा निवडणूक २०१९ डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसकडून सातत्याने नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. आधी गरिबांना किमान उत्पन्नाची हमी यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी कोची येथे महिला आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. जर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता आली तर महिला आरक्षण विधेयक संमत होण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

 • राहुल बुथस्तरीय पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. २०१९ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही सर्वांत प्रथम संसदेत महिला आरक्षण विधेयक संमत करू. आम्ही महिलांना नेतृत्वाच्या स्तरावर पाहू इच्छितो, असे ते म्हणाले. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे. या मुद्यावर सर्वसहमती न झाल्यामुळे अजूनही हे विधेयक प्रलंबित आहे.

 • यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींनी धनाढ्य लोकांना कमाल उत्पन्नाची हमी दिली आहे. तर आम्ही गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणार आहोत. तर दुसरीकडे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी मात्र काँग्रेसच्या या घोषणेवर टीका केली आहे.

 • राहुल गांधींचे हे आश्वासन खोटे असून त्यांची आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. मायावती यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसच्या नेतृत्त्वातील आघाडीमध्ये सामील होण्यात त्यांना रस नसल्याचे स्पष्ट होत आहे.

माजी जगज्जेत्यां व्लादिमिर क्रॅमनिकची निवृत्ती :
 • मॉस्को : रशियाचा माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक याने मंगळवारी व्यावसायिक बुद्धिबळातून निवृत्ती जाहीर केली. नेदरलँड्समधील विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

 • जवळपास तीन दशके व्यावसायिक बुद्धिबळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या क्रॅमनिकने १९९६ मध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेत सर्वानाच अचंबित केले होते. अशी कामगिरी करणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला होता. त्यानंतर त्याचा हा विक्रम नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने २०१० मध्ये मोडीत काढला.

 • २००० साली ग्रँडमास्टर क्रॅमनिकने गॅरी कास्पारोव्हचे साम्राज्य मोडीत काढत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला. त्यानंतर सात वर्षे त्याने जगज्जेतेपदाचा किताब आपल्याकडेच कायम राखला. २००७ मध्ये भारताच्या विश्वनाथन आनंदने त्याच्याकडून जगज्जेतेपदाचा किताब हिसकावून घेतला. ४३ वर्षीय क्रॅमनिकने व्यावसायिक बुद्धिबळातील जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या जेतेपदांवर नाव कोरले आहे.

 • मंगळवारी निवृत्तीची घोषणा करताना क्रॅमनिकने सांगितले की, ‘‘काही महिन्यांपूर्वीच व्यावसायिक बुद्धिबळ कारकीर्दीचा समारोप करण्याचा निर्णय मी घेतला होता. आता कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा खेळल्यानंतर मी तो जगजाहीर करत आहे. व्यावसायिक बुद्धिबळपटू म्हणून माझा प्रवास संस्मरणीय होता. मला सर्वकाही दिल्याबद्दल मी बुद्धिबळ या खेळाचा ऋणी आहे. काही क्षणी अपयशाचा तर काही वेळा यशाचा आनंद लुटताना मला मौल्यवान असा अनुभव मिळाला.

 • माझ्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. गेल्या काही महिन्यांत बुद्धिबळ खेळाडू म्हणून मिळणारे प्रोत्साहन लक्षणीयरीत्या कमी झाल्याने आता निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटले होते.’’

 • ‘‘गेल्या काही महिन्यांपासून मी शैक्षणिक क्षेत्रात तसेच लहान मुलांसाठीच्या बुद्धिबळ क्षेत्रात योजना विकसित करण्यावर अधिक भर देत होतो. लवकरच त्याविषयीची सविस्तर माहिती सर्वासमोर आणेन. यापुढेही मला जलद व ब्लिट्झ प्रकारात खेळायला आवडले असते. बुद्धिबळाला अधिक लोकप्रिय करण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील राहीन,’’ असे क्रॅमनिकने सांगितले.

भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास मोदींची मदत करू - चीन :
 • नवी दिल्ली- भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. मोदींनी भारताला नियंत्रणात ठेवावं, अशी चीनची इच्छा आहे. भारतात कमी प्रमाणात रोजगार उपलब्ध असल्यानं मोदींना जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. चीनसाठी ही चांगली बातमी नाही, असंही ग्लोबल टाइम्समधून छापण्यात आलं आहे.

 • रिपोर्टनुसार, डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या सेना एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर जवळपास वर्षभरानं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सुधारत आहेत. भारतातलं केंद्र सरकारनं हे कमजोर आहे. त्यामुळे मोदींनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारत आणि चीनदरम्यान आर्थिक द्विपक्षीय संबंधही मजबूत असून, ते वेगानं पुढे जात आहेत. तसेच मोदींनी चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे मोदींच्या प्रतिमेतही सुधारणा होऊ शकते. भारत हा देश धर्मसंकटात अडकला आहे. दिल्लीनं चीनमधून येणारी गुंतवणूक थांबवल्यास अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

 • भारतात चीनची गुंतवणूक ही मुख्यत्वे कामगारांशी जोडलेल्या क्षेत्रात आहे. जसे की स्मार्टफोन प्लांट वगैरे वगैरे. जर भारतानं चिनी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्यास मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारनं रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. अशातच चीनकडून येणारी गुंतवणूक वाढवल्यास बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात, असंही ग्लोबल टाइम्समध्ये म्हटलं आहे.

 • गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधीही म्हणाले होते की, चीन उत्पादन क्षेत्रात अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांची कमी नाही. भारतानंही उत्पादन क्षेत्राला चालना दिली पाहिजे, जेणेकरून भारतात नोकऱ्या उपलब्ध होतील. रोजगाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनीही मोदींवर टीका केली होती. 

महात्मा गांधींची पहिल्या महायुद्धातील भूमिका :
 • मुंबई : महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी महात्मा गांधीजींची ओळख आहे. त्यांची पहिल्या महायुद्धात काय भूमिका होती याबाबत आपण जाणून घेऊया.

 • 1918 साली पहिल्या महायुद्धाच्या नंतरच्या काळात, व्हाईसरॉय यांनी महात्मा गांधींना दिल्लीतील एका युद्ध परिषदेसाठी बोलावले. कदाचित गांधीनी त्यांचा इंग्रज साम्राज्यास असलेला पाठिंबा दर्शवावा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीसाठी मदत मिळवावी हा त्यामागचा हेतू होता.

 • महात्मा गांधीनी भारतीयांना सक्रियपणे युद्धात उतरवण्याची तयारी दर्शवली. जून 1918 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका 'फौजेत भरती होण्याचे आवाहन'मध्ये महात्मा गांधी यांनी म्हटले आहे की,  "ही गोष्ट (स्वातंत्र्य) प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यामध्ये स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे, म्हणजेच शस्त्र बाळगण्याची आणि वापरण्याची क्षमता...... आपल्याला जर शस्त्र सर्वाधिक कौशल्याने वापरण्याची कला अवगत करायची असेल तर फौजेत भरती होणे हे आपले कर्तव्य आहे," असे जरी असले तरी व्हाईसरॉय यांच्या खासगी सचिवास लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात "वैयक्तिकरीत्या कोणालाही, मित्र व शत्रूस, मारणार नाही अथवा जखमी करणार नाही."

 • महात्मा गांधींच्या युद्धभरतीने त्यांच्या अहिंसेबद्दलच्या एकजिनसीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांचा मित्र चार्ली आंद्रीउस नमूद करतो - "वैयक्तिकरीत्या मला कधीही त्यांच्या ह्या वर्तणुकीचा त्यांच्या स्वतःच्या इतर वर्तनांशी मेळ घालता आला नाही. ज्यावर मी वेदनादायकरीत्या असहमत झालो आहे हा त्या मुद्यांपैकी एक आहे."

नाना पाटेकर यांना मातृशोक, निर्मला पाटेकर यांचं निधन :
 • मुंबई : ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या मातोश्री निर्मला पाटेकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. सायंकाळी 5.30 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी नाना पाटेकर यांच्यासह त्यांचे काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

 • ज्यावेळी त्यांच्या आईंनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळी ते घरी नव्हते. त्यांना माहिती मिळताच ते घरी पोहोचले. नानांचं आपल्या आईसोबत घट्ट नातं होतं. त्यांनी वेळोवेळी याबद्दल सांगितलं आहे.

 • नाना 28 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडील गजानन पाटेकर यांचं निधन झालं होतं. ते मुंबईत टेक्सटाईलचं व्यवसाय करत होते. तर नाना आपल्या आईंसोबत गावी राहत होते. गजानन पाटेकर आणि निर्मला पाटेकर यांना 7 मुलं होती. मात्र पाच मुलांचं लहान असतानाचं निधन झालं होतं.

मुलांवर आपले स्वप्न लादू नका- पंतप्रधान मोदी :
 • नवी दिल्ली : एखाद्या परीक्षेत काही कमी-जास्त झाल्याने आयुष्य थांबत नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी कसोटी आवश्यक आहे. अशा कसोटीला सामोरे न गेल्यास आयुष्य थांबल्यासारखे होते, असे सांगतानाच मुलांवर आपले स्वप्न लादू नका, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी ‘परीक्षा पे चर्चा-२’ या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला.

 • एका विद्यार्थ्याने मोदी यांना विचारले की, मुलांकडून पालकांना अधिक अपेक्षा असतात. तशी परिस्थिती पंतप्रधानांसमोर आहे. देशभरातील नागरिकांना मोदींकडून खूप अपेक्षा आहेत. यावर मोदी म्हणाले की, एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, ‘कुछ खिलौने के टूटने से बचपन नहीं मरा करता है’

 • स्वत:ला सिद्ध करा मोदी म्हणाले की, जर एखाद्याला आॅलिम्पिकमध्ये जायचे आहे; पण तो गाव, तालुका, इंटरस्टेट, नॅशनल स्तरावर खेळला नसेल, तर त्याने असे स्वप्न पाहून कसे चालेल? ते म्हणाले की, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हाला स्वत:ला सिद्ध करावे लागेल; पण अपेक्षेच्या दबावात दबून जाता कामा नये. निराशेत बुडालेला समाज, परिवार वा व्यक्ती कोणाचेही भले करू शकत नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

 • १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

 • १९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

 • १९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर.

जन्म 

 • १८८२: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)

 • १९१०: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)

 • १९११: शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून १९८७)

 • १९१७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००७)

 • १९२७: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)

 • १९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.

 • १९४९: नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अ‍ॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९४८: महात्मा गांधी यांची हत्या. (जन्म: २ ऑक्टोबर १८६९)

 • १९४८: आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)

 • १९५१: ऑस्ट्रियन वाहन अभियंता फर्डिनांड पोर्श यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)

 • १९९६: हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.

 • २०००: मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.

टिप्पणी करा (Comment Below)