चालू घडामोडी - ३० जुलै २०१८

Date : 30 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इराणमध्ये एका डॉलरसाठी लागतात १,१२,००० रिआल :
  • तेहरान : इराण समोरील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर बनत जात असताना त्याच्या चलनाची घसरण वेगाने होत आहे. रविवारी इराणचे चलन रिआल एका अमेरिकन डॉलरला १,१२,००० एवढे घसरले. शनिवारी ते ९८,००० होते.

  • इराण सरकारने रिआलचा डॉलरशी विनिमयाचा दर ४४,०७० एवढा ठेवला होता तो यावर्षी एक जानेवारी रोजी ३५,१८६ एवढा होता. रिआलने स्वत:चे मोल अवघ्या चार महिन्यांत डॉलरच्या तुलनेत निम्म्याने गमावले. गेल्या मार्च महिन्यात रिआल ५० हजारांवर गेला होता.

  • सरकारने एप्रिल महिन्यात ४२ हजार असा दर निश्चित करण्याचा प्रयत्न केला व काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमकी दिली. परंतु, इराणशी व्यापारी संबंध सतत सुरू असलेल्यांना त्याच्या प्रदीर्घ काळपासून खालावत चाललेल्या आर्थिक व्यवस्थेची काळजी वाटली व त्यांनी आपली बचत सुरक्षित राहावी यासाठी रिआल आणखी खाली जाईल या आशेने डॉलरमध्ये गुंतवणूक केली.

  • कृत्रिमरित्या कमी केलेल्या दराने बँकांनी त्यांच्याकडील डॉलर विकायला नकार दिल्यावर सरकारला गेल्या जून महिन्यात आपली भूमिका नरम करायला भाग पडले व ठराविक आयातदारांच्या गटांबाबत लवचिक धोरण त्याने मान्य केले.

  • इराणचे मध्यवर्ती बँकेचे प्रमुख वलिवुल्लाह सैफ यांना अध्यक्ष हासन रुहानी यांनी गेल्या आठवड्यात पदावरून दूर करण्याचे कारण आर्थिक संकटाची हाताळणी हेच होते. २०१५ मध्ये इराणशी झालेल्या अणु करारातून बाजुला होण्याची घोषणा अमेरिकेने गेल्या मे महिन्यात केल्यापासून रिआलची घसरण सुरू झाली. 

कतार गमावणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा मान :
  • लंडन - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वांना वेध लागलेत ते 2022च्या स्पर्धेचे, परंतु यजमानपदाच्या निवडीपासूनच ही विश्वचषक स्पर्धा वादात राहिली आहे. त्यात यजमानपद मिळवण्यासाठी कतारने पेड बातम्या दिल्याचे प्रकरण समोर येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी कतारसह अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनीही उत्सुकता दर्शवली होती. मात्र खरी चुरस रंगली ती कतार आणि अमेरिका यांच्यात, त्यात कतारने 14-8 अशा फरकाने बाजी मारली. 

  • कतारला यजमानपद मिळाल्यापासून 2022ची स्पर्धा चर्चेत आहेच. यजमानपदाच्या मतासाठी लाच दिल्याच्या आरोपापासून ते कतारच्या हवामानात खेळाडूंना होणा-या त्रासापर्यंतच्या मुद्यांवरून या निर्णयाला विरोध झाला. त्यात हे यजमानपद मिळवण्यासाठी कतारकडून फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

  • यजमानपदाच्या शर्यतीत असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दावेदारांबद्दल पैसे देऊन अपप्रचार केल्याचा आरोप कतारवर ठेवण्यात आला आहे. यासाठी कतारने जवळपास 7000 पाऊंड रक्कम खर्ची केल्याचा दावा करण्यात येत आहे. 

  • त्यामुळे फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. यात कतार दोषी आढळल्यात त्यांच्याकडून यजमानपदाचा मान काढून घेतला जाऊ शकतो. 2022च्या विश्वचषक आयोजनासाठी इंग्लंडने तयारी दर्शवली आहे. त्यांनी 2018च्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु तो मान रशियाला मिळाला. इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे माजी अध्यक्ष लॉर्ड ट्राइस्मन यांनी 2022च्या विश्वचषक स्पर्धा आयोजनाची तयारी दर्शवली आहे. 

झुंजार मच्छिमार नेते रामभाऊ पाटील यांचे निधन :
  • मुंबई - ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे आज रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, जिवीतेश, प्रशांत ही दोन मुलगे व वंदना ही एक मुलगी दोन नातवंडे असा परिवार आहे.

  • गेले 4 वर्षे ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते.त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अंधेरी पश्चिम येथील बीएसइएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान आज रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी पालघर वडराई, माहीम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली. 

  • त्यांनी राष्ट्र सेवादलातून तरुण वयात समाजसेवक म्हणून झोकून घेतले, वडराई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नँशनल फिशवर्क्स फोरम या संघटनेची अध्यक्षपदी होते. तर वर्ल्ड फिश फोरम पिपल संघटनेवर आशियाई खंडाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते.

आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत बजरंग व पिंकी यांना सुवर्णपदक :
  • नवी दिल्ली - बजरंग पुनियाने सलग दुस-या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली, तर संदीप तोमरनेही रौप्यपदकाची कमाई केली. इस्तानबुल येथे झालेल्या यासर डोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीयांनी एकूण 10 पदकांची कमाई केली आणि त्यात सात पदके महिलांनी जिंकली आहेत. 

  • पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू आहे. तिने 55 किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर 6-3 असा विजय मिळवला. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला येथे अपयशाचा सामना करावा लागला. तिला 62 किलो वजनी गटाच्या पदक फेरीतही प्रवेश मिळवता आलेला नाही. 

  • राष्ट्रकुल विजेत्या बजरंगने महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याने रविवारी 70 किलो गटाचे सुवर्ण नावावर केले. युक्रेनच्या अँड्रीय केव्हात्कोवस्कीने दुखापतीमुळे माघार घेतली. 61 किलो वजनी गटात संदीपला इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने 8-2 अशी धुळ चारली. 

आता रोज बेळगावातून विमान उडणार : 
  • बेळगाव : बेळगावात सध्या आठवड्यातून तीनच दिवस विमानसेवा सुरु असते. मात्र आता आठवड्यातून सातही दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. येत्या 10 ऑगस्टपासून सेवा सुरु होणार आहे. येत्या 10 ऑगस्टपासून एअर इंडियाची बेळगाव विमानतळावरुन विमान सेवा सुरु होणार आहे. एअर बस 319 द्वारे ही सेवा सुरू होणार आहे.

  • सध्या बेळगाव ते बंगळुरु अशी आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि शनिवार अशी अलायन्स एअरलाईन्सची सेवा सुरु आहे. उरलेल्या चार दिवशी एअर इंडिया आपली बेळगाव ते बंगळुरु अशी विमानसेवा उपलब्ध करून देणार आहे.

  • बंगळुरुहून सकाळी सात वाजता निघून साडेआठ वाजता विमान बेळगावला पोहोचणार आहे. बेळगावहून सकाळी नऊ वाजता निघून 10 वाजून 20 मिनिटांनी बंगळुरुला विमान पोहोचणार आहे.

  • काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या प्रादेशिक संचालकांनी बेळगाव विमानतळाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी विमानसेवेबाबत सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून बेळगावहून विमानसेवा सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी सिटीझन फोरमला दिले होते.

२ ऑक्टोबरपासून लोकपालसाठी पुन्हा उपोषण - अण्णा हजारे :
  • अहमदनगर : सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधींजींच्या जयंतीदिनी अण्णा आपलं गाव राळेगणसिद्धीतून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

  • अण्णांनी लोकपालसह विविध मागण्यांसाठी मार्च महिन्यात दिल्लीत सात दिवस उपोषण केलं होतं. सरकारने मागण्या मान्य करण्याचं लेखी दिल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतलं. पण अद्यापही लोकपालची नियुक्ती झालेली नसल्यामुळे त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

  • जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील काही महत्त्वाच्या बदलांसाठी अण्णांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर सात दिवस उपोषण केलं. 23 मार्च म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सुरु करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवण्यात आलं.

  • दरम्यान, लोकपालच्या नियुक्तीसाठी केंद्र सरकारकडून बैठकांचं सत्र सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर सदस्यांची नुकतीच एक बैठक झाली होती. मात्र या प्रक्रियेला वेग येत नसल्याने अण्णांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिणामी त्यांना पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ आली आहे.

  • लोकपालची नियुक्ती झाल्यास देशात भ्रष्टाचाराचं प्रमाण 60 ते 70 टक्क्यांनी कमी होईल, असं अण्णांचं म्हणणं आहे.

इम्रान खान यांचा स्वातंत्र्यदिनापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथविधी :
  • इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते व माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांचा शपथविधी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर म्हणजे १४ ऑगस्टपूर्वी होणार आहे. त्यांच्या पक्षाला पूर्ण बहुमत नसल्याने लहान पक्षांच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार स्थापन होणार असून अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत.

  • पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ हा नॅशनल असेंब्लीत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांना ११६ जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ  पक्षाचे नेते नइनउल हक यांनी सांगितले की, बहुमत मिळवण्यासाठी अपक्ष व लहान पक्ष यांच्याशी वाटाघाटी सुरू आहेत. 

  • १४ ऑगस्टपूर्वी इमरान खान यांचा पंतप्रधानपदी  शपथविधी होईल.  पाकिस्तान निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला ११६ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी १२ जागा कमी पडल्या आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ गटाला ६४ तर पाकिस्तान पीपल्स पार्टीला ४३ जागा मिळाल्या आहेत.

  • पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत एकूण ३४२ जागा असून त्यात २७२ जागांची थेट निवडणूक होते. बहुमतासाठी १७२ जागा मिळवणे आवश्यक असते. पाकिस्तानात राजकीय घडामोडींना निकालानंतर वेग आला असून काही खुल्या तर काही गुप्त बैठका सुरू  आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टी व पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ यांच्या बैठका दोन दिवसात होण्याची शक्यता असून त्यात संसदेत पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाला घेरण्याची रणनीती निश्चित केली जाईल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

  • १९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

  • १९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

  • १९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

  • १९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

  • २०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

  • २०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

  • २००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

  • २०१२: दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

जन्म 

  • १८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

  • १८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)

  • १८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

  • १९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

  • १९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

  • १९६२: भारतीय दहशतवादी याकूब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)

  • १९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

  • १९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लबचे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

  • १९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

  • १९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)

  • १९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)

  • १९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

  • २०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)

  • २०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर१९१३

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.