चालू घडामोडी - ३० जून २०१८

Date : 30 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आयर्लंडचा धुव्वा, भारताच्या इतिहासात सर्वात मोठा 'टी20 विजय' :
  • डब्लिन : डब्लिनच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात भारताने यजमान आयर्लंडचा 143 धावांनी धुव्वा उडवला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या इतिहासात हा आजवरचा दुसरा मोठा विजय ठरला. भारताच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येच्या फरकाने जिंकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या प्रभावी फिरकीच्या जोरावर टीम इंडियाला ही मजल मारता आली. या विजयासह भारतानं ही मालिका 2-0 अशी निर्विवादपणे खिशात घातली.

  • टीम इंडियानं दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव अवघ्या 70 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कुलदीप यादवनं 16 धावांत तीन आणि यजुवेंद्र चहलनं 21 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. याशिवाय उमेश यादवनं दोन तर सिद्धार्थ कौल आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी एक विकेट घेतली.

  • सलामीवीर लोकेश राहुल आणि सुरेश रैनाच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं आयर्लंडसमोर 213 धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या जागी संधी मिळवलेल्या लोकेश राहुलनं 36 चेंडूत तीन चौकार आणि सहा षटकार ठोकत 70 धावांची खेळी केली.

आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा :
  • मुंबई/नवी दिल्ली : आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे. बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत चार वेळा ही मुदत वाढ करुन देण्यात आली होती. सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर तातडीने करा. कारण आज शेवटचा दिवस आहे.

  • आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

  • वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

  • दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

एका दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स, कोल्हापुरात 'झिरो पेंडन्सी' उपक्रम :
  • कोल्हापूर : कोल्हापूरच्या परिवहन कार्यालयाद्वारे आता अवघ्या एका दिवसात वाहन चालवण्याचे लायसन्स देण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

  • ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांत वाहनचालकांना आपले पक्के लायसन्स मिळत आहे.

  • ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांना अनेकदा सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. यामध्ये पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. अशातच ‘झिरो पेंडन्सी’ सारख्या उपक्रमांद्वारे अवघ्या एका दिवसात शिकाऊ आणि पक्के लायसन्स मिळत असल्याने वाहनचालकांनीही आनंद व्यक्त केला आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा दिल्यानंतर सरकारी कार्यालयांचेही डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया चालू झाली होती.

  • कोल्हापूर परिवहन कार्यालयाद्वारे राबवला जाणारा हा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. देशभरात अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात यावा, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

दुबई मास्टर्स कबड्डी २०१८ - कोरियाला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक :
  • दुबई : दुबई मास्टर्स कबड्डी स्पर्धेत भारताने कोरियावर 36-20 ने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत भारत विरुद्ध इराण असा सामना होणार आहे.

  • उपांत्य सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत कोरियावर विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीलाच कोरियाने आघाडी घेतली परंतु त्यांची आघाडी फार काही काळ टिकू शकली नाही.

  • भारताचा कर्णधार अजय ठाकूरने आपल्या कौशल्याच्या जोरावर संघाला आघाडी मिळवून दिली. तर भारताच्या बचावफळीने सुद्धा चांगला खेळ केला. संपूर्ण सामन्यात भारताने आक्रमक पवित्रा दाखवत कोरियावर 36-20 ने विजय मिळवला. ही स्पर्धा दुबईत आयोजित केली आहे.

  • याआधी भारताने कबड्डी मास्टर्स स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 41-17 ने मात करत सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता.

हॉकी - भारत आज नेदरलँड्सविरुद्ध भिडणार :
  • ब्रेडा, नेदरलँड्स : भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी यजमान नेदरलँड्सविरुद्ध शनिवारी येथे किमान बरोबरी राखण्याची गरज आहे. आठ वेळचा आॅलिम्पिक विजेता भारतीय संघ बरोबरी साधू शकला किंवा विजय मिळवू शकला तर सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचेल.

  • भारत दोन विजय, एक पराभव आणि एका बरोबरीने गुण तक्त्यात दुसºया स्थानावर आहे. गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे १० गुण आहेत. आॅस्ट्रेलियाने या आधीच अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. सहा देशांच्या स्पर्धेत पहिल्या दोन स्थानांवर राहणारे संघ अंतिम फेरीत पोहचतात.

  • भारताच्या उलट नेदरलँड्सला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकण्याची गरज आहे. एका अन्य सामन्यात आॅस्ट्रेलिया संघ अर्जेंटिनाशी भिडेल. या सामन्याच्या आधीच अर्जेंटिना स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

  • भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात बेल्जियमविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली. भारताने या आधी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला ४-० असे पराभूत केले होते. या धमाकेदार विजयानंतर भारतीयांनी अर्जेंटिनाला २ -१ ने पराभूत केले होते. मात्र आॅस्ट्रेलियाकडून २-३ने पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या विजयी वाटचालीला ब्रेक लागला होता.

७० वर्षांनी दक्षिण कोरियाच्या राजधानीतून अमेरिकन सैन्य बाहेर :
  • सेऊल- दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये आलेले अमेरिकन सैन्य आता अधिकृतरित्या बाहेर पडणार आहे. सलग सात दशके अमेरिकन सैन्य सेऊलमध्ये ठेवण्यात आलेले होते.

  • आता या तुकडीचे मुख्यालय दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमेजवळ नेण्यात य़ेणार आहे.  जपानशी लढण्यासाठी अमेरिका 1945मध्ये सेऊलमध्ये सैन्य आणले होते. त्यानंतर सलग सात दशके ते येथएच ठेवण्यात आले. महायुद्धानंतर उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने हे सैन्य तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला.

  • या सैन्यामुळे अनेक दक्षिण कोरियन लोकांमध्ये अमेरिकेविरोधात भावनाही निर्माण झाली होती. 2008 साली या सैन्याची जागा बदलण्यात येणार होती मात्र अनेकवेळा ते पुढे ढकलण्यात आले. अखेर आता त्याची जागा बदलण्यात येत आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.

  • १९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.

  • १९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

  • १९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.

  • १९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.

  • १९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.

  • १९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.

  • १९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.

  • २००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.

जन्म 

  • १९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)

  • १९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)

  • १९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.

  • १९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.

  • १९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.

  • १९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.

  • १९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

  • १९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.

  • १९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.

  • १९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)

  • १९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.

  • १९९९: मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.

  • २००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.