चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मार्च २०१९

Date : 30 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
श्रीकांत, कश्यप, सिंधू उपांत्य फेरीत :
  • भारताच्या किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांच्या दुहेरीत मात्र भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले.

  • पुरुष एकेरीत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच बी. साईप्रणीतला नमवले. या सामन्यात साईप्रणीतने अटीतटीच्या झुंजीत पहिला गेम २३-२१ असा जिंकत श्रीकांतला आव्हान दिले. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने २१-११ असे दमदार पुनरागमन करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम पुन्हा अत्यंत चुरशीचा झाला. त्यात श्रीकांतने २१-१९ अशी बाजी मारली. कश्यपने तैपेईच्या वॅँग झु वेईवर सलग दोन गेममध्ये २१-१६, २१-११ अशी मात केली.

  • महिला एकेरीत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्टला २१-९, २२-२० असे पराभूत केले. त्यामुळे सिंधूला आता उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंगजिओ हिच्याशी झुंजावे लागणार आहे.

  • महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या अप्रियानी रहायू आणि ग्रेसिया पोल्ली जोडीने अश्विनी आणि सिक्की जोडीला २१-१०, २१-१८ असे पराभूत केले. याचप्रमाणे द्वितीय मानांकित जाँगकॉलफान किटिथाराकुल आणि रविंदा प्राजोंगजल जोडीने अपर्णा बालन आणि श्रुती केपी जोडीचा २१-८, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि सुमीत रेड्डी या जोडीने भारताच्याच प्रणव जेरी चोप्रा आणि शिवम शर्मा या जोडीला २१-१०, २१-१२ असे नमवले.

नागपुरात तृतीयपंथीय मतदारांची संख्या कमीच :
  • तृतीयपंथीयांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर मुंबईत तृतीयपंथीय मतदारांची संख्या गेल्या पाच वर्षांत दुपटीने वाढली. तुलनेने उपराजधानीत मात्र या पाच वर्षांत ही संख्या अवघ्या २५-३० वरच खोळंबली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवडणूक आयोगाने तृतीयपंथी गौरी सावंत यांना निवडणूक सदिच्छा दूत म्हणून नियुक्त केल्यामुळे या संख्येत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. यात तृतीयपंथी गौरी सावंत यांचाही समावेश आहे. २००४, २००९च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची तृतीयपंथी अशी नोंद नव्हती.

  • २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा पुरुष आणि महिला मतदारांबरोबर तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली. त्यावेळी या तिसऱ्या वर्गात सुमारे ९१८ मतदारांची नोंद करण्यात आली. त्यानंतर आता केलेल्या नोंदीत या आकडय़ात दुपटीने वाढ होऊन ही संख्या दोन हजार ८६ इतकी झाली आहे. यातही राजधानी मुंबईतील तृतीयपंथीय मतदारांची संख्या सुमारे ७४४ इतकी आहे. तुलनेने उपराजधानी नागपुरात मात्र ही संख्या अवघी २५-३० इतकीच आहे.

  • मुंबईत तृतीयपंथीयांच्या संघटना अतिशय मजबूत आहेत. त्यांच्या हक्कासाठी सर्व तृतीयपंथी एकत्र येतात. मात्र, नागपुरात उलट चित्र आहे. येथे ७३०च्या जवळपास तृतीयपंथियांची संख्या आहे आणि त्यातील केवळ २५-३० जणच मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत. मतदानाच्या हक्काबाबत तृतीयपंथी सजग होत असले तरी उपराजधानीत तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नसल्याने मतदान ओळखपत्र तयार करण्यात अडचणी येत असल्याची नाराजी तृतीयपंथीयांनी बोलून दाखवली.

मातृभाषेवर प्रभुत्व नसतानाही ओडिशावर १९ वर्षे अधिराज्य :
  • राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्या राज्याची भाषा अस्खलितपणे बोलता येत नसेल तर मतदार स्वीकारतील का, असा प्रश्न साहजिकच पडतो. पण ओडिशाचे मुख्यमंत्रिपद गेली १९ वर्षे भूषविणारे नवीन पटनायक अजूनही त्यांची मातृभाषा बोलताना अडखळतात. लागोपाठ पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी ते रिंगणात उतरले असून, मतदार त्यांनाच पुन्हा कौल देतात का, याची उत्सुकता आहे.

  • लोकसभेबरोबरच ओडिशा विधानसभेची निवडणूक होत आहे. गेली १९ वर्षे सत्तेत असलेल्या बिजू जनता दलासमोर भाजपने कडवे आव्हान उभे केले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. आतापर्यंत कधी नव्हे एवढे कडवे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. ओडिशा जिंकण्यासाठी भाजपनेही सारी ताकद पणाला लावली आहे. १४७ सदस्यीय ओडिशा विधानसभेत सत्ताधारी बिजू जतना दलाचे ११७ आमदार निवडून आले होते. तर लोकसभेच्या २१ पैकी २० जागा सत्ताधारी पक्षाने जिंकल्या होत्या.

  • नवीन पटनायक हे राज्यात लोकप्रिय असले तरी त्यांना ओडिया ही मातृभाषा अजूनही अस्खलितपणे बोलता येत नाही. माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या निधनानंतर नवीन यांनी राजकारणात प्रवेश केला होता. नवीन पटनायक यांची आई पंजाबी होती तर शिक्षण दिल्ली व परदेशातच झाले. यामुळे ओडिया भाषेचे ज्ञान सुरुवातीपासूनच कमी होते.

  • इंग्रजी, हिंदूी, फ्रेंच अशा भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. राजकारणात आल्यावर ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री होते. २००० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जतना दल आणि भाजप युतीला बहुमत मिळाले. तेव्हापासून नवीनबाबू ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. गेले १९ वर्षे सतत मुख्यमंत्री असले तरी मातृभाषेतून बोलताना त्यांची अडचण होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाराशे जणांना नोटीस :
  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलीस विभागाकडून १२३५ जणांना  प्रतिबंधात्मक कारवाईच्या संदर्भाने नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये अनेक मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. नोटिशीत पोलिसांकडून वापरण्यात आलेल्या टोकदार शब्दांमुळे मराठा कार्यकर्ते दुखावले असून क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी क्रांती चौकात निषेध आंदोलन केले.

  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून गुंड, दहशत माजवणारे, सामाजिक शांतता भंग करणारे, मनाई आदेश असतानाही विविध आंदोलने केलेले, कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये गतवर्षी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या मराठा क्रांतीच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे अनेक मराठा कार्यकर्त्यांमध्ये रोष पसरला आहे.

  • या कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिशीत टोकदार शब्दांचा वापर करण्यात आलेला असल्यामुळे ते दुखावले आहेत. तुमच्याविरुद्ध दाखल गुन्हा पाहता अशा आडदांड, दुसाहसी व समाजविघातक वृत्तीमुळे पुन्हा तुमच्याकडून समाजास धोका पोहोचवणारे कृत्य होण्याची शक्यता आहे, असे नोटिशीत नमूद करण्यात आलेले आहे. तसेच प्रतिष्ठित व्यक्तीकडून चांगल्या वर्तवणुकीचे दोन वर्षांच्या मुदतीचे २५ हजार रुपयांचे बंधपत्र का घेण्यात येऊ नये, असेही त्यात म्हटले आहे.

  • नोटिशीत वापरलेल्या शब्दांमुळे मराठा कार्यकर्ते दुखावले असून मराठा क्रांती मोर्चाकडून शुक्रवारी क्रांती चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

निकाल २३ मे ऐवजी सहा दिवस उशिराने लागेल - निवडणूक आयोग :
  • विरोधी पक्षांची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीप जुळवण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीचे निकाल येण्यास सुमारे ६ दिवस जास्त लागू शकतात, असा दावा निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात केला. २१ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून एका मतदारसंघातील किमान ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप जुळवून पाहण्याची मागणी केली होती. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर संशय राहणार नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचार करण्यास सांगितले होते.

  • निवडणूक आयोगाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, जर प्रत्येक संसदीय किंवा विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लीप्स जुळवल्या तर यामुळे मतमोजणीला उशीर होऊ शकतो. यामुळे सुमारे ६ दिवस जास्त लागू शकतात. अशावेळी लोकसभा निवडणूक निकालाची घोषणा २३ ऐवजी ६ दिवस उशिराने होईल.

  • सध्या यासाठी स्लीप्स जुळवून पाहण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध नाही. कारण व्हीव्हीपॅटमधून निघणाऱ्या स्लीपवर कोणताच बारकोड नाही. त्यामुळे निवडणुकीचे निकाल ३० किंवा ३१ मे आधी येऊ शकणार नाही. त्याचबरोबर या स्लीप मोजण्यासाठी मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांची गरज भासेल. इतकेच नव्हे तर मतमोजणी करण्यासाठी मोठ्या जागेची गरज भासेल. अनेक राज्यांमध्ये आधीपासूनच जागेची कमतरता भासत आहे.

  • सध्या निवडणूक आयोग प्रत्येक मतदारसंघातील कोणतेही एक इव्हीएम निवडून त्याच्या स्लीप्स पडताळून पाहते. सध्या देशात एकूण १०.३५ लाख मतदान केंद्र आहेत. सरासरी एका मतदारसंघात २५० मतदान केंद्र आहेत. आयोगानुसार, एक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मतमोजणीला एक तास उशीर होतो. पण जर ५० टक्के पर्यंत हे प्रमाण वाढवले तर सरासरी ५.२ दिवस लागतील.

अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे कसं ओळखावं :
  • प्रश्न- अमेरिकेतील शाळा किंवा विद्यापीठ कायदेशीर आहे की नाही, हे मला कसं कळू शकेल?

  • उत्तर- शाळा, कॉलेजचा शोध घेताना तिथे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयी अवास्तव तर वाटत नाही ना, हे तपासून पाहणं आवश्यक आहे. तुम्ही विविध मार्गांनी अमेरिकेतील कायदेशीर शाळा, विद्यापीठ शोधू शकता. देशाबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची परवानगी असलेल्या शाळांची माहिती अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाकडे (https://studyinthestates.dhs.gov/school-search) उपलब्ध आहे.

  • याशिवाय अमेरिकन सरकार आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी इज्युकेशन यूएसए (https://educationusa.state.gov/) ही मोफत सेवा पुरवतं. या ठिकाणी अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या यंत्रणेची माहिती उपलब्ध आहे. यासोबतच तुम्ही या सेवेचा वापर करुन 4500 हून अधिक महाविद्यालय, विद्यापीठांमधून हवा तो पर्याय निवडू शकता. या सर्व संस्था कायदेशीर आहेत.

  • विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कायदेशीर शाळा आणि विद्यापीठ विशिष्ट प्रक्रिया पाळतात. त्यांच्याकडून आवश्यक निकषांची माहिती काटेकोरपणे दिली जाते. तुम्ही त्यांच्या निकषांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बऱ्याचदा त्यांच्या सध्याच्या किंवा जुन्या शाळेतून इंग्रजी प्रावीण्य परीक्षा द्यावी लागते. याशिवाय तुमच्या शिक्षकांकडून शिफारस पत्र आणावं लागतं. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमच्या वरिष्ठांकडून तसं पत्र गरजेचं असतं. 

हार्दिक पटेल यांना न्यायालयाचा दणका, निवडणूक लढवता येणार नाही :
  • अहमदाबाद : पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात न्यायालयाने त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. 2015 मध्ये गुजरातमधल्या मेहसाणातल्या भाजपा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या नियमानुसार ज्याला दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली आहे तो निवडणूक लढवू शकत नाही.

  • भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयाने हार्दिक पटेल यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.

  • हार्दिक पटेल गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. त्याला काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु न्यायालयाच्या दणक्यानंतर आता पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

  • १८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

  • १८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

  • १९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

  • १९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

जन्म 

  • १८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

  • १८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

  • १९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

  • १९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

  • १९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

  • १९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

  • १९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

  • २००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

  • २००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

  • २०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.