चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० मे २०१९

Updated On : May 30, 2019 | Category : Current Affairsयुक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या 'त्या' सल्ल्याची जगभर चर्चा :
 • मुंबई : कॉमेडियन ते राष्ट्रपती असा प्रवास करणारे युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सध्या जगभर चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नका, असा सल्ला दिला आहे.

 • राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटलं की, "नेत्यांनी आपल्या कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नये. कारण राष्ट्रपती आयकॉन, मूर्ती किंवा चित्र नाही. माझ्याऐवजी तुमच्या मुलांचा फोटो कार्यालयात लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मुलांकडे पाहा."

 • युक्रेनमधील जनता फुटीरतावाद्यांसोबत सुरु असलेल्या संघर्षाला वैतागली आहे. "आमचं सरकार लोकांकडून लोकांसाठी चालवलं जाणारं प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार असेल. आम्ही असा देश निर्माण करु की, ज्यामध्ये सर्वांना समान नियम, कायदे लागू होतील" असं आश्वासनही झेलेन्स्की यांनी दिलं.

 • विषेश म्हणजे कॉमेडियन असलेल्या झेलेन्स्की यांनी एकदा राष्ट्रपतींची भूमिकाही निभावली होती. आज मात्र ते स्वत: राष्ट्राध्यक्षपदी आहेत. झेलेन्स्की यांनी गेल्याच वर्षी त्यांच्या पक्षाची नोंदणी केली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. झेलेन्स्की यांना 73.2 टक्के मतदान झालं आहे. त्यांनी पेट्रो पोरोशेंको यांचा पराभव केला.

मोदी-जिनपिंग चर्चा वाराणसीमध्ये :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यातील पुढील अनौपचारिक शिखर परिषद ११ ऑक्टोबर रोजी वाराणसीमध्ये घेण्याचे भारताने प्रस्तावित केले आहे, अशी माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे. या प्रस्तावाचा आम्ही सकारात्मक विचार करीत असल्याचे चीनने कळविले आहे.

 • चीनच्या हुबेई प्रांतातील वुहानमध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दोन नेत्यांमध्ये पहिली अनौपचारिक शिखर परिषद झाली होती. वुहानमध्ये मोदी यांचे जसे आदरातिथ्य करण्यात आले त्याच प्रकारे मोदी यांची जिनपिंग यांचे आदरातिथ्य करण्याची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 • मोदी यांना आपल्या लोकसभा मतदारसंघात क्षी जिनिपग यांना निमंत्रित करण्याची इच्छा असल्याने वाराणसी हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना झियामेन प्रांतात निमंत्रण दिले होते त्याप्रमाणे वाराणसीत जिनपिंग यांना निमंत्रित केले जाणार आहे. जवळपास ३० वर्षांपूर्वी जिनपिंग हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे पदाधिकारी झाले होते.

 • सप्टेंबर २०१४ मध्ये मोदी यांनी त्यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे जिनपिंग यांचे आदरातिथ्य केले होते आणि जिनपिंग यांनी झियान येथे मे २०१५ मध्ये मोदी यांचे आदरातिथ्य केले होते. नियोजित कालावधीत क्षी जिनपिंग हे उपलब्ध आहेत का, अशी विनंतीवजा प्राथमिक विचारणा राजनैतिक मार्गाने चीनकडे करण्यात आली आहे.

नौदल प्रमुखपदाची सूत्रे घेण्यासाठी करमबीर सिंह यांना लवादाची परवानगी :
 • नवी दिल्ली : नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांना नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेण्यास लष्करी लवादाने बुधवारी परवानगी दिली आहे. नौदल प्रमुखपदी करमबीर सिंह यांच्या नेमणुकीस आव्हान देणारी याचिका दाखल झालेली असून त्यावरची सुनावणी सात आठवडय़ांनी लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी नौदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घ्यायची की नाही असा मुद्दा उपस्थित झाला होता, लवादाच्या निकालाने त्यावर पडदा पडला असून करमबीर सिंह यांना शुक्रवारी नौदल प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 • अंदमान व निकोबार कमांडचे ‘कमांडर इन चिफ’ असलेले व्हाइस अडमिरल बिमल वर्मा यांनी करमबीर सिंह  यांच्या नियुक्तीला सेवाज्येष्ठतेच्या मुद्दयावर आव्हान दिले असून त्यावर लष्करी दले लवादाकडे याचिका दाखल केली आहे. लष्करी दले लवादाने या प्रकरणाची सुनावणी १७ जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे. कारण सरकारने व्हाइस अ‍ॅडमिरल सिंह यांच्या नियुक्तीबाबतची कागदपत्रे सादर करण्यास आणखी वेळ द्यावा अशी मागणी सरकारने केली होती, असे वर्मा यांचे वकील अंकुर छिब्बर यांनी म्हटले आहे.

 • लवादाने आता करमबीर सिंह यांना नौदल प्रमुख पदाची सूत्रे हाती घेण्यास परवानगी दिली असून ते ३१ मे रोजी सध्याचे नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. पण करमबीर सिंह यांचे त्या पदावर राहणे हे लवादाच्या अंतिम निकालावर अवलंबून राहणार आहे.

 • वर्मा हे सेवाज्येष्ठतेत करमबीर सिंह यांच्या वरती असल्याचे सांगण्यात येते. २२ मे रोजी लवादाने सरकारला नवीन नौदल प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भातील कागदपत्रे २९ मे पर्यंत सादर करण्यास सांगितले होते. पण सरकारला ती कागदपत्रे सादर करता आली नाहीत, त्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने वर्मा यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर वर्मा यांनी लष्करी लवादाकडे आव्हान याचिका दाखल केली. नौदल प्रमुखपदी आपलीच निवड सेवाज्येष्ठतेनुसार करावी असे त्यांनी म्हटले होते.

कर्नाटकच्या ‘सिंघम’चा पोलीस दलातून राजीनामा :
 • कर्नाटकचे सिंघम म्हणून ओळले जाणारे पोलीस उपायुक्त के. अन्नामलई यांनी पोलीस दलातून राजीनामा दिला आहे. समाजसेवा करण्यासाठी त्यांनी हा राजीनामा दिला आहे. के. अन्नामलई यांनी गृहमंत्री एम बी पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली. के. अन्नामलई यांनी कर्तव्य बजावताना पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही के. अन्नामलई यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 • कुमारस्वामी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना के. अन्नामलई यांनी सांगितलं की, ‘मुख्यमंत्र्यांनी राज्याला तुमची गरज असल्याने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. पण माझा निर्णय अंतिम झाला असल्याचं मी त्यांना सांगितलं. यानंतर त्यांनी मला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या’.

 • कोणत्याही राजकीय दबावातून आपण राजीनामा देत नसल्याचं के. अन्नामलई यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचं कौतुकही केलं. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी कर्तव्य बजावताना आपल्याला स्वातंत्र्य दिल्याचं सांगितलं.

 • ‘संपूर्ण राज्यानेच मला खूप आदर दिला. मी अजून काही दिवस काम करु शकलो असतो. पण काही निर्णय घेणं गरजेचं असतं. मी सर्वांचे आभार मानतो’, अशी भावना त्यांनी व्यक्त केलं आहे. के. अन्नामलई आपल्या स्वच्छ प्रतिमा आणि धाडसीपणामुळे राज्यात चांगलेच प्रसिद्ध झाले होते. एसपी म्हणून काम करत असताना त्यांच्या बदलीविरोधात दोन जिल्ह्यात निदर्शनही झालं होतं.

शिवसेनेचा 'हा' नेता उद्या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार :
 • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (उद्या ) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतली. यादरम्यान एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रीपदं मिळणार, शिवसेनेचा कोणता नेता केंद्रात मंत्री होणार याची सर्वांनाच उस्तुकता आहे. याचदरम्यान शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

 • लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होतील.

 • एनडीएतील सेकेंड लार्जेस्ट पार्टी (एनडीएतील सर्वाधिक खासदार असलेला दुसरा पक्ष) असलेल्या शिवसेनेला आता दोन कॅबिनेट मंत्रीपदं आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा आहे. परंतु उद्या शिवसेनेचा एकच खासदार मंत्रीपदाची शपथ घेईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १५७४: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

 • १६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

 • १९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

 • १९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

 • १९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

 • १९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

 • १९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

 • १९९८: अफगाणिस्तान मधील ६.५ मेगावॅट क्षमतील भूकंपात ४००० ते ४५०० लोक ठार झाले.

जन्म 

 • १८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)

 • १९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई)

 • १९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.

 • १९५०: अभिनेते परेश रावल यांचा जन्म.

मृत्यू 

 • १४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी१४१२)

 • १५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

 • १७७८: फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

 • १९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

 • १९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

 • १९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

 • १९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

 • १९६८:चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

 • २००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)