चालू घडामोडी - ३० नोव्हेंबर २०१७

Date : 30 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंटरनेट कन्टेन्ट पुरविताना भेदभाव नको, कंपन्यांना ट्रायचे आदेश
  • नवी दिल्ली : इंटरनेट सेवा देताना काही अ‍ॅप्स, वेबसाइट्स आणि सेवांची गळचेपी करणे आणि काहींना ‘फास्ट लेन’ उपलब्ध करून देणे, असे प्रकार सेवादाता कंपन्यांना करता येणार नाहीत, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाने (ट्राय) दिले आहेत.

  • ट्रायने इंटरनेट तटस्थता (नेट न्यूट्रलिटी) याविषयीच्या आपल्या बहुप्रतीक्षित शिफारशी जारी केल्या आहेत. इंटरनेट हा तत्त्वत: खुला प्लॅटफॉर्म असावा, असे ट्रायने त्यात म्हटले आहे.

  • इंटरनेट सेवेचे नियमन अशा पद्धतीने व्हायला हवे, की कुठल्याही निर्बंधाविना सर्वांना सर्व प्रकारचा कन्टेन्ट उपलब्ध होतील, असे ट्रायने नमूद केले आहे. ट्रायच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्यास इंटरनेट सेवादात्यांना कोणत्याही प्रकारचा वेब ट्रॅफिक रोखता येणार नाही.

  • संगणक, लॅपटॉप अथवा मोबाइल अशा कोणत्याही उपकरणावर कोणतेही कन्टेन्ट कंपन्यांना समान गतीचे मार्ग उपलब्ध करून द्यावे लागतील.अमेरिकेच्या केंद्रीय दळणवळण आयोगाचे चेअरमन अजित पै यांनी इंटरनेट तटस्थता संपविण्याची शिफारस केल्यानंतर दुसºयाच दिवशी ट्रायने इंटरनेट तटस्थतेच्या बाजूने निर्णय दिला आहे.

  • पै यांनी २०१५ सालचा इंटरनेट तटस्थता कायदाच संपविण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओबामा प्रशासनाने हा कायदा केला होता. त्यानुसार सर्व वेबसाइट्सना समान गतीचे मार्ग उपलब्ध करून देण्याचे बंधन कंपन्यांवर होते.

धर्मादाय आयुक्त कार्यालयात डिजिटल यंत्रणा :
  • धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज लोकाभिमुख, पारदर्शी होण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी, त्यासाठी मानवी हस्तक्षेपरहित संपूर्ण डिजिटल यंत्रणा उभी करण्याचे, तसेच विश्वस्त नोंदणीच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी डिजिटल सिग्नेचर अथवा आधार क्रमांक सलंग्न यंत्रणा उभी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

  • सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील बदल व त्याच्या अंमलबजावणीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

  • या वेळी विधी व न्याय राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे आदी उपस्थित होते. या वेळी विविध जिल्ह्यांतील धर्मादाय कार्यालयांतील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

संरक्षणमंत्र्यांकडून स्वदेशी लढाऊ विमानाचे कौतुक :
  • सिंगापूरचे संरक्षणमंत्री एन.ई. हेन यांनी भारताच्या स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या विमानाचे मोठे कौतुक केले. हे विमान उत्कृष्ट आणि प्रभावशाली असल्याचे त्यांनी म्हटले. हेन यांनी 28 नोव्हेंबर रोजी बेंगळूरु येथील कलाईकुंड या हवाई दलाच्या तळावरुन पहिले परदेशी नागरिक म्हणून तेजस विमानातून सुमारे अर्धा तास हवाई सफर केली. यावेळी त्यांनी भारताच्या या बहुद्देशीय हलक्या विमानाचे तोंडभरून कौतुक केले.

  • हेन म्हणाले, "हे खूपच शानदार आणि प्रभावशाली विमान आहे. यावेळी त्यांनी एव्हीएम मार्शल ए.पी. सिंह आणि तेजस उडवणाऱ्या पायलटची प्रशंसा केली.

  • विमानात बसल्यानंतर एका लढाऊ विमानात बसल्यानंतर आम्ही आरामात कारमधून प्रवास करीत असल्याचे भासल्याचे त्यांनी म्हटले."

  • दरम्यान, सिंगापूरच्या संरक्षणमंत्र्यांनी तेजसच्या खरेदीत रस दाखवला आहे. सिंगापूर तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्यात उत्सुक आहे का? या प्रश्नावर संरक्षणमंत्री हेन यांनी सांगितले की, मी पायलट नाही, यावर तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या लोकांनाच निर्णय घेता येईल. अधिक चर्चेनंतर सिंगापूरने तेजसच्या खरेदीत रस असल्याचे सांगितल्याचे भारतीय संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

आता इंटरनेट कनेक्शनसाठीदेखील आधार कार्ड आवश्यक :
  • नवी दिल्ली - जर तुमच्या दैनंदिन जीवनात इंटरनेट वापर होत असेल आणि अद्यापपर्यंत तुम्ही आधार कार्ड बनवलं नसेल, तर सर्व कामं बाजूला ठेऊन आधी आधार कार्डचे काम आटोपून घ्या. कारण इंटरनेटचा वापर करता यावा यासाठीदेखील आता आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे. देशात इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता ग्राहकांकडून त्यांच्या आधार कार्ड क्रमांक मिळाल्यानंतरच इंटरनेटची सेवा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.  

  • इंटरनेटची सेवा देणा-या कंपन्या आता आपल्या सेवा पुरवण्यापूर्वी ग्राहकांकडून त्यांचा युनिक आयडेन्टिटी नंबरचा तपशील मागणार आहेत. त्यामुळे आता आधार क्रमांकाविना कोणत्याही ग्राहकाला इंटरनेट कनेक्शन आणि संबंधित अन्य सेवा मिळणार नाहीत. तर दुसरीकडे ऑनलाइन विक्री करणारी कंपनी अॅमेझॉननंही आपल्या ग्राहकांना वेबसाइटवर त्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवण्यास सांगितले आहे.

  • आधार क्रमांकाच्या आधारे ग्राहकांचं हरवलेल्या सामानाचा शोध घेणं सोपे होईल, असे अॅमेझॉनचं म्हणणं आहे. तर बंगळुरूमध्ये भाड्यावर कार देणा-या जूमकार कंपनीनंही ग्राहकांना बुकींग करताना आधार क्रमांक देणं सक्तीचं केले आहे. 

अभिलाषा म्हात्रे यांचा मनपाकडून सन्मान :
  • आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल भारतीय महिला कबड्डी संघाच्या कर्णधार व महापालिकेच्या क्रीडा अधिकारी अभिलाषा म्हात्रे यांचा महापालिका मुख्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर, आयुक्त यांच्या पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

  • नुकत्याच गोरगान इराण येथे दि. 23 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम विजेतेपद संपादन करून देशाचा बहुमान वाढविला आहे.

  • त्यातही महिलांच्या कबड्डी संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे या महापालिकेच्या क्रीडा अधिकारी असल्याने हे यश नवी मुंबईकरांसाठी आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे भारतीय संघ मायदेशी परतल्यावर महापालिका मुख्यालयात महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते महापौर दालनात सत्कार करण्यात आला.

उत्तर कोरियावर अतिरिक्त निर्बंध लादणार : डोनाल्ड ट्रम्प 
  • उत्तर कोरियाने केलेल्या शक्तीशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर अमेरिका चांगलीच भडकली असून उत्तर कोरियावर यापुढे अतिरिक्त कडक निर्बंध लादण्यात येतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

  • या मुद्द्यावरुन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांनी बुधवारी संवाद साधला आणि उत्तर कोरियाला समजावण्याची सूचना त्यांनी केली. ट्रम्प यांनी ट्विटद्वारे ही माहित दिली आहे.

  • उत्तर कोरियाने बुधावारी व्हॉसाँग-१५ नामक सर्वाधिक शक्तीशाली आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सादर केले. हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीनंतर दोन महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा हे पाऊल उचलले आहे.

  • अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि संपूर्ण पूर्व अमेरिकेचा किनारी भाग या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येत असल्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमेरिकेनेही चिंता व्यक्त केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

  • १९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.

  • १९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

  • १९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.

  • १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

  • १९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.

  • २०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

जन्म

  • १६०२: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १६८६)

  • १७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

  • १८३५: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल१९१०)

  • १८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

  • १८७४: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

  • १९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९८४)

  • १९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.

  • १९३६: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९८९)

  • १९४५: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.

  • १९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)

मृत्य

  • १९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर१८५४)

  • १९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)

  • १९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

  • १९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)

  • २०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

  • २०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

  • २०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.