चालू घडामोडी - ३० ऑक्टोबर २०१८

Date : 30 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
परीक्षांचे मूल्यांकन सोपवा ‘नॅक’कडेच :
  • गेल्या आठवडाभरात पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठ चर्चेत आले. विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालात गेल्या ३ वर्षांत जवळपास ३५ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आणि विद्यापीठाचा परीक्षा विभाग पुन्हा चर्चेत आला. आतापर्यंत शैक्षणिक गुणवत्ता चर्चिली जात होती; परंतु या प्रकारामुळे मूल्यांकनाची गुणवत्ताही तपासण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी परीक्षांचे निकाल तब्बल सहा महिने उशिरा लागल्याने खुद्द राज्यपाल महोदयांना विद्यापीठात लक्ष घालावे लागले. त्या सगळ्या गोंधळात विद्यापीठाच्या कुलगुरूंनादेखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

  • परीक्षेसारखा संवेदनशील विषय हा प्रत्येक विद्यापीठाने गांभीर्याने हाताळला पाहिजे. विद्यापीठात अथवा संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे परीक्षेच्या गुणांवर होत असते. तसा प्रघात आपल्या व्यवस्थेत चालत आल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेला सामोरे जावे लागते.

  • परीक्षा झाल्यानंतर त्यांचे निकाल वेळेत लावण्याची जबाबदारी उत्तरपत्रिका तपासणारे परीक्षक, संबंधित अधिष्ठाते, कार्यालयीन कर्मचारी अशी एकूणच विद्यापीठाची सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे प्रत्येक घटकाने आपले काम चोख बजावले तर निकाल वेळेतच लागतील. परंतु तसे होताना दिसत नाही.

  • परीक्षा झाल्यानंतर आपापल्या विषयांच्या उत्तरपत्रिका परीक्षकांनी तपासल्या पाहिजेत; पण बहुतांशी परीक्षक वर्ग हा त्याबाबत आज उदासीन दिसतो हे वास्तव आहे. जे प्रामाणिकपणे उत्तरपत्रिका तपासतात त्यांचे या ठिकाणी अभिनंदन केले पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांना वेठीस धरून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारा, संप काळातील वेतन मागणाऱ्या शिक्षकांनी आपण खरेच किती उत्तरपत्रिका तपासल्या यावर चिंतन करणे आवश्यक आहे. विद्यापीठ कायद्यानुसार प्राचार्यदेखील शिक्षक या व्याखेत मोडतात. परंतु आज किती प्राचार्य उत्तरपत्रिका तपासतात याची माहिती घेतली तर धक्कादायक वास्तव समोर उभे राहील.

'रामजन्मभूमीचा निर्णय साधुसंत घेतील' :
  • भार्इंदर : रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून, राम मंदिर तिथेच बनेल. मात्र, त्याचा निर्णय साधुसंत घेतील; आणि संघ त्यांच्यासोबत असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवसृष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

  • ३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक केशवसृष्टी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या विचारांवर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत सात विविध संघटनांचे कार्यवाहक, संघटक सचिव, प्रचारप्रमुख आदी सहभागी होतील.

  • बैठकीत राम मंदिर निर्माण आणि देशातील घडामोडींचाही ऊहापोह केला जाईल. रामजन्मभूमीत पूर्वी राम मंदिरच होते. त्यावर कुणीतरी अन्य बांधकाम केले. त्यातून रामजन्मभूमी रामाचीच असल्याचे सिद्ध झाले असले, तरी सध्या जागेचा वाद कायम आहे.

  • हा वाद न्यायालयाने सोडवावा किंवा केंद्र सरकारने कायदा बनवून राम मंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली. मंदिराच्या निर्मितीसाठी संघ आग्रही असून त्याबाबत निर्णय रामभक्त साधुसंत घेतील आणि संघ त्यांच्या सोबत राहील, असेही अरुणकुमार म्हणाले.

इराणवर निर्बंधांचे भवितव्य भारत, चीनच्या भूमिकेवर :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणविरुद्ध लावलेल्या निर्बंधांमुळे इराणकडून तेल खरेदी करण्यावर येणाऱ्या बंदीला चीन, भारत व तुर्कस्तानकडून विरोध होत आहे. या देशांच्या भूमिकेवरच इराणविरोधी निर्बंधांचा आता खरा कस लागणार आहे.

  • अमेरिकेने इराणविरुद्ध नव्याने लावलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी ५ नोव्हेंबरपासून होत आहेत. इराणकडून तेल खरेदी थांबवून शून्यावर आणण्यासाठी तेल खरेदीदार देशांवर अमेरिका दबाव टाकत आहे, परंतु इराणच्या सर्वोच्च पाच ग्राहकांनी अमेरिकेच्या या भूमिकेला विरोध केला आहे. भारत, चीन व तुर्कस्तानचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

  • जगात पर्यायी तेल पुरवठादार नसल्यामुळे इराणचे तेल घेणे थांबविता येणार नाही, अशी भूमिका या देशांनी घेतली असल्याचे समजते. परंतु बंदीच्या मुद्द्यावर खुद्द ट्रम्प प्रशासनातच दोन मतप्रवाह आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांच्या नेतृत्वाखालील गटाला वाटते की, या प्रकरणी कठोरात कठोर भूमिका घेऊन इराणी तेलाची विक्री शून्यावर आणायलाच हवी.

  • हा मार्ग अतिरेकीच - याउलट विदेश मंत्रालयातील अधिकाºयांना मात्र हा मार्ग अतिरेकी वाटतो. इराणी तेलाची विक्री पूर्ण बंद केल्यास तेल टंचाई निर्माण होऊन किमती वाढतील. त्याचा फटका अंतिमत: अमेरिका व मित्र राष्ट्रांनाही बसेल. त्यामुळे इराणकडून काही प्रमाणात तेल खरेदीस परवानगी द्यावी, असे या अधिकाऱ्यांना वाटते.

वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण :
  • नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित केलेल्या ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ पुतळ्याच्या अनावरणाला सर्व मुख्यमंत्र्यांनी हजर राहावे, यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करीत आहेत. हा समारंभ ३१ आॅक्टोबर रोजी होईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यास न जाण्याची शक्यता आहे.

  • नितीश कुमार, के. सी. आर. पलानीस्वामी उपस्थित असावेत, असे मोदी यांना वाटते. परंतु, नितीश कुमार उत्सुक नाहीत. तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, ओदिशाचे नवीन पटनाईक व तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित राहावे यासाठीही प्रयत्न होत आहेत. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राम मंदिर चळवळीत आम्ही व्यग्र आहोत.’

  • २३८९ कोटी खर्च : हा जगातील सर्वात उंच पुतळा असून समुद्रसपाटीपासून १९३ मीटर उंचीवर त्याची गॅलरी आहे. गॅलरीत एकावेळी २०० लोक सामावू शकतात.

  • नर्मदा नदीवरील या पुतळ्यासाठी ३,४०० मजूर आणि २५० अभियंत्यांनी काम केले आहे. २३८९ कोटी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला.

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं निधन :
  • मुंबई : ज्येष्ठ गीतकार आणि संगीतकार यशवंत देव यांनी वयाच्या 91  व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शुश्रुषा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेले काही दिवस त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना न्यूमोनिया झाला असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

  • यशवंत देव यांना अशक्तपणामुळे 10 ऑक्टोबरपासून शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीमध्ये सुरुवातीला त्यांना चिकनगुनियाची बाधा झाल्याचं समजलं होतं.

  • उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचं मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं होतं. त्यांनतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.  शेवटी त्यांना न्यूमोनियाचा त्रास सुरु झाल्याने त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती.

रोहितची विक्रमी खेळी, सचिनलाही टाकलं मागे :
  • मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 224 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मानं 162 धावा आणि अंबाती रायडूनं 100 धावा ठोकल्या. रोहितनं या सामन्यात विविध विक्रम आपल्या नावे केले. यामध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

  • 'सिक्सर किंग' रोहित - रोहितने 162 धावांच्या खेळीत चार षटकार ठोकले आणि सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिनला मागे टाकलं. रोहितने आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दित 186 डावात 198 षटकार ठोकले आहे. भारताकडून सर्वाधिक षटकार महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहेत. धोनीने 281 डावात 218 षटकार ठोकले आहेत. भारतीय खेळाडूंच्या यादीत धोनीनंतर रोहितचा नंबर लागतो. सचिनने 452 डावात 195 षटकार मारले होते. रोहितला षटकारांचं द्विशतक साजरं करण्यासाठी केवळ दोन षटकारांनी गरज आहे. जगभरातील केवळ सहा फलंदाजांनी दोनशे षटकारांचा आकडा पार केला आहे.

  • सातव्यांदा 150 हून अधिक धावा - रोहितने आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात सातव्यांदा 150 हून अधिक धावा केल्या. सर्वाधिक दीड शतक ठोकण्याचा विक्रम रोहितच्याच नावे आहे. सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नरने प्रत्येकी पाच वेळा, ख्रिस गेल, हाशिम आमला, विराट कोहली आणि सनथ जयसूर्याने प्रत्येकी चार वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत.

  • एका मालिकेत दोनवेळा 150 हून अधिक धावा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितने दुसऱ्यांना 150 हून अधिक धावा ठोकल्या. गुवाहाटीमधील सामन्यात रोहितने 152 केल्या होत्या. याआधी जिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मास्कादजाने केनियाविरुद्ध 2009 मध्ये एकाच मालिकेत दोनदा 150 पेक्षा आधिक धावा केल्या होत्या.

दिनविशेष : 
  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

महत्वाच्या घटना

  • १९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

  • १९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

  • १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

  • १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

  • १९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

  • १९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

  • २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

जन्म 

  • १७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

  • १८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

  • १९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

  • १९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

  • १९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

  • १९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

  • १९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

  • १९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

  • १९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

  • १९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

  • १९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

  • १९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

  • १९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

  • २०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.