चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० सप्टेंबर २०१८

Date : 30 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सेवाग्राम आश्रमात काँग्रेसलाच ‘चले जाव’ :
  • जनमानसाच्या मनात महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोन गोष्टी एकरूप आहेत. आजची काँग्रेस गांधीविचारांशी किती एकनिष्ठ आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो. परंतु तरीही काँग्रेस पक्ष वध्र्याच्या सेवाग्राम आश्रमात पाय ठेवायच्या लायकीचाच नाही, अशा पूर्वग्रहातून कुणी काँग्रेसला दुय्यम वागणूक देणे तरी गांधी विचारांशी कुठे अनुरूप आहे? परंतु असाच प्रकार सध्या सेवाग्राम आश्रमात सुरू आहे.

  • महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीपर्वाच्या निमित्ताने २ ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रमात काँग्रेसने राष्ट्रीय कार्यकारिणीची बठक घेण्याचे ठरविले. पक्षाची बडी नेतेमंडळी आश्रम परिसराचा त्यादृष्टीने आढावा घेण्यास आली. पण आश्रम प्रतिष्ठानचा नकारार्थी सूर ऐकून ती परतली.

  • आश्रमात राजकीय कार्यक्रम घेण्यास मनाई असल्याचे आश्रमवासी सांगतात, पण शासकीय कार्यक्रमातील भाजपच्या नेत्यांची उपस्थिती ते कशी खपवून घेतात, हा प्रश्न आहे. ज्यांनी गांधीविचारास हयातभर विरोध केला त्यांच विचारसरणीच्या लोकांचा सहभाग आश्रमातील कार्यक्रमात कसा चालतो, असाही प्रश्न निरूत्तरित राहतो आहे.

  • ‘ही आमची काँग्रेस नव्हे,’ असे मानणारा मोठा वर्ग गांधीवाद्यांमध्ये आहे. विनोबाजी गेले, आणि आमचा काँग्रेसशी संबंध संपला, असाही सूर आहे. इंदिराजींच्या काळात गांधीवाद्यांनी सोसलेले अपमानाचे वळ उरल्यासुरल्यांना काँग्रेसशी फारकत घेण्याचे कारणीभूत ठरल्याचे समजते. अशा तीन टप्प्यांवर काँग्रेसपासून दुरावलेले काही जण ‘सर्वसेवा संघा’च्या माध्यमातून आश्रमाचे संचालन करतात.

कुमार राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून :
  • गतवर्षीच्या संघातील सात खेळाडूंचा यंदाही संघात समावेश असल्याने अनुभवी महाराष्ट्राच्या मुलींचा संघ रविवारपासून राजस्थानातील उदयपूर येथे सुरू होणाऱ्या ३५व्या कुमार (१६ वर्षांखालील) राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत पदकजिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. १८ वर्षांखालील गटात खेळण्याचा अनुभव असलेल्या सुझान, आभा लाड, सिया देवधर यांच्यावर महाराष्ट्राची भिस्त असणार असून त्यांना श्रुती भोसले, देवश्री आंबेगावकर आणि पूर्वी महाले यांची साथ लाभेल.

  • गटात पश्चिम बंगाल आणि पंजाब या तुलनेत दुबळ्या असलेल्या संघाना पराभूत करून मुलींचा संघ उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश करण्याची शक्यता आहे. संघ अनुभवी आणि समतोल असल्याने अनेक वर्षांपासून हुलकावणी दिलेल्या पदकाला यंदा गवसणी घालण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्राच्या मुली वाया घालवणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

  • मुलांना मात्र बलाढय़ पंजाब, हरयाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश संघांशी झुंजावे लागणार असून वरिष्ठ विभागातील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी त्यांना किमान एका विजयाची आवश्यकता आहे. रविवारी रात्री महाराष्ट्राच्या मुलांचा सामना तामिळनाडूविरुद्ध होणार असून मुलींचा पहिला सामना सोमवारी होईल. गतवर्षी हैदराबाद येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना सातव्या तर मुलांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

आमच्या संयमाचा अंत पाहू नका, भारताला मोठा पलटवार झेलावा लागेल - पाकिस्तान
  • न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर काय बोलावं हे सुचेनासं झाल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत खोटं बोलण्यास सुरुवात केली. भारत शांततेसाठी बातचीत करण्याऐवजी घरगुती राजकारणाला पसंती देत असल्याची खुन्नस पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी काढली.

  • भारतानेच द्विपक्षीय वार्ता रद्द केल्याचा आरोप कुरैशी यांनी केला. पाकिस्तानला प्रत्येक स्तरावर शांततेसाठी बातचीत करायची आहे, पण नवी दिल्ली शांततेऐवजी राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुनही भारताने आपला काश्मीरचा राग काढला. आम्हाला गंभीर आणि व्यापक चर्चा करायची आहे, ज्याने सर्व समस्यांचं समाधान होईल, असं कुरैशी म्हणाले.

  • पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी -''भारताकडून सतत एलओसीवर सीजफायरचं उल्लंघन केलं जातं. आम्हाला हे सांगायचंय की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने एलओसी पार केली किंवा लिमिटेड वॉरचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा पलटवार झेलावा लागेल. दक्षिण आशियामध्ये न्युक्लिअर संतुलन ठेवण्याची बातचीत केली जाते. पण पाकिस्तान आण्विक शस्त्रांचा वापर न करण्याची खात्री देऊ शकत नाही,'' असं कुरैशी म्हणाले.

२ ऑक्टोबरपासून अण्णा पुन्हा उपोषणावर ठाम, राळेगणसिद्धीतच आंदोलन :
  • अहमदनगर : जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 2 ऑक्टोबरपासून पुकारलेल्या आंदोलनावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमली आहे, पण समिती नेमून काही होणार नाही, लोकपाल आणि लोकायुक्त नेमावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.

  • गेल्या 15 दिवसात दोन वेळा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली. मात्र केवळ आश्वासन, तसेच समिती नेमून काही होणार नाही, जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका अण्णांनी घेतली.

  • महात्मा गांधी म्हणाले होते की गल्ली बदलली तर दिल्ली बदलेल, त्याचप्रमाणे येत्या 2 ऑक्टोबरला राळेगणसिद्धी येथेच आंदोलन करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे.

  • अण्णांनी जनलोकपालच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर 23 मार्च ते 29 मार्च या काळात उपोषण केलं होतं. केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सोडवण्यात आलं. अण्णांनी तेव्हाच सहा महिन्यांची मुदत देत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता.

संयुक्त राष्ट्रातील सुषमा स्वराज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जोरदार भाषण केले. दहशतवादाच्या मुद्यावरुन त्यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला पूर्णपणे उघडे पाडले. वातावरण बदलाच्या मुद्यावरुन त्यांनी विकसित देशांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव करुन दिली तसेच भारतात सुरु असलेल्या वेगवेगळया कल्याणकारी योजनांची जगाला माहिती दिली. त्यांच्या भाषणातील काही मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात मोठया प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत असून यामुळे भारत मुदतीआधीच एसडीजीच्या लक्ष्य गाठेल असा विश्वास सुषमा स्वराज यांनी सयुंक्त राष्ट्र महासभेत बोलताना व्यक्त केला.

  • जन धन योजना ही जगातील सर्वात मोठी आर्थिक सर्वसमावेशक योजना भारतात सुरु झाली. या योजनेतंर्गत ३२ कोटी ६१लाख बँक खाती उघडण्यात आली. त्यामुळे विविध योजनांचे पैसे आता थेट गरिबांच्या खात्यात जमा होतात.

  • बेघरांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. २०२२ पर्यंत २ कोटी ९५ लाख घरे शहर आणि ग्रामीण भागात बांधण्याची योजना आहे. २०२२ पर्यंत देशात प्रत्येकाकडे हक्काचे घर असावे हा त्यामागे उद्देश आहे.

  • जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा योजनेचा कार्यक्रम भारतात सुरु झाला असून ५० कोटीपेक्षा जास्त भारतीयांना या योजनेचा लाभ मिळणार असून कुटुंबांना पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

  • वातावरण बदल आणि दहशतवाद ही आजच्या घडीला जगासमोरील दोन मुख्य आव्हाने आहेत. विकसनशील आणि अविकसित देश हे वातावरण बदलाने सर्वात मोठे पीडित आहेत.

  • निर्सगाचा हाऱ्स करुन ज्या विकसित देशांनी स्वत:ची प्रगती साधली आहे ते आता आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. मोठया देशांनी छोटया देशांना मदत केली पाहिजे असे स्वराज म्हणाल्या.

  • संयुक्त राष्ट्र हा जगातील सर्वच देशांसाठी मोठा मंच आहे. पण हळूहळू संयुक्त राष्ट्राचे महत्व, परिणाम, आदर आणि वापर कमी होत चाललाय.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

महत्वाच्या घटना

  • १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

  • १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

  • १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

  • १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

  • १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

  • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.

  • १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

  • २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

  • १९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

  • १९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

  • १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

  • १९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

  • १९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

मृत्यू

  • १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

  • १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

  • २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

  • २०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.