चालू घडामोडी - ३१ ऑगस्ट २०१८

Date : 31 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताची अर्थव्यवस्था पुढील वर्षी जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार - जेटली :
  • पुढील वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तसेच ही उभारी घेताना ब्रिटनलाही भारत मागे. तर, २०४० मध्ये भारताचा तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये क्रमांक लागेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

  • जेटली म्हणाले, भारतात दरडोई उत्पन्न हे कमी राहिल मात्र अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड मोठा असल्याने ती वेगाने अधिक विकसित होत आहे. या वर्षी आकाराच्या रुपात आपण फ्रान्सला मागे टाकले आहे. पुढील वर्षी आपण ब्रिटनलाही मागे टाकू आणि जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेची नोंद होईल.

  • जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच धीम्या गतीने विकसित होत आहेत. त्यांची अर्थव्यवस्ता एक ते दीड टक्क्यांनी वाढत आहे. जर आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात सात ते आठ टक्क्यांनी वाढ होत असेल तर या अर्थव्यवस्थांना मागे टाकायला आपल्याला फार काळ लागणार नाही. जर आपण २०३० आणि २०४० च्या दृष्टीने पाहत असाल तर नक्कीच आपली अर्थव्यवस्था जगातील आकाराने तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. १०-२० वर्षांत बदल घडवून आणण्याइतकी भारतामध्ये नक्कीच क्षमता आहे.

  • उदाहरण सांगायचे झाल्यास देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात अधिक विकास झाला आहे. या तुलनेत आता पूर्व भागातील राज्यांना आपल्या विकासाचा वेग वाढवावा लागेल. आपली लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्याची क्षमता प्रचंड बनली आहे. त्यामुळेच बाजाराचेही रुप प्रचंड आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे असाधारण बनू त्यासाठी आपल्याला आवश्यक पावले उपलण्याची आवश्यकता आहे.

इंटरपोलकडून २८ देशांना पत्र :
  • कॉसमॉस बँकेच्या सायबर हल्ल्यासंदर्भात इंटरपोलमार्फत एसआयटीकडून २८ देशांना पत्रे देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या ७८ कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात मदत करण्याचे आवाहन या पत्रांमध्ये करण्यात आले आहे.

  • कॉसमॉस बँकेच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या सव्‍‌र्हरवर हॅकर्सनी हल्ला चढवत ‘रूपे डेबिट कार्ड’ आणि व्हिसा कार्डधारकांची गोपनीय माहिती चोरून ९४ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम काढली होती. यातील १३ कोटी रुपयांची रक्कम हॅनसेंग बँकेच्या खात्यात जमा केली होती आणि ७८ कोटी रुपये काही देशांमधील बँकांमध्ये जमा झाले होते.

  • २८ देशांच्या यादीत संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, रशिया, ब्रिटन आदी देशांचा समावेश आहे. एटीम कार्ड क्लोन करून पैसे चोरी करण्यात आले आहेत.

  • ‘प्रामुख्याने ७८ कोटी रुपये कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. ज्यात आम्हाला थोडी कसरत करावी लागणार आहे. इंटरपोलच्या मदतीने आम्ही पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारतातील अडीच कोटी रुपयांच्या संदर्भात आम्ही पहिल्या दिवसापासून वसुली करायला सुरुवात केली आहे’, असे कॉसमॉस बँकेसंदर्भात स्थापन केलेल्या एसआयटीच्या मुख्य व सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग यांनी सांगितले.

पंतप्रधान नेपाळ दौऱ्यावर, चार वर्षातला चौथा दौरा :
  • काठमांडू- बिमस्टेक बैठकीसाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी शेजारच्या नेपाळमध्ये पोहोचले आहेत. गेल्या चार वर्षांमधील हा त्यांचा चौथा दौरा आहे. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशनची चौथी शिखर परिषद येथे होत आहे.

  • नेपाळमध्ये पोहोचल्यावर मोदी यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली, त्याचवेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांचीही भेट त्यांनी घेतली. यानंतर बिमस्टेक परिषदेचे उद्घाटन होईल आणि 31 ऑगस्ट म्हणजे उद्या संमेलन संपेल.

  • संमेलनानंतर संयुक्त घोषणापत्रही जाहीर करण्यात येईल. बंगालच्या उपसागराजवळचे सात देश या संघटनेचे सदस्य आहेत. त्यात बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. या सात देशांची लोकसंख्या 1.5 अब्ज इतकी आबे. जगातील एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के लोकसंख्या या सात देशांमध्ये राहाते. तसेच सर्व देशांची एकूण जीडीपी 2500 अब्ज डॉलर इतकी आहे. बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रातील दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांमध्ये तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्याचे वातावरण वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट्य आहे.

  • अॅक्ट इस्ट पॉलिसी आणि नेबरहूड फर्स्ट पॉलिसी या भारताच्या नव्या योजनांमुळे भारतासाठी बिमस्टेक अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन वर्षांपूर्वी गोव्यामध्ये बिमस्टेकचे आयोजन करण्यात आले होते. त्य़ानंतर आता काठमांडूमध्ये बिमस्टेकचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या यशात ‘पीवायसी’चा मोठा वाटा :
  • पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे. मला गरज भासल्यास येथील व्यवस्थापनाने पहाटे ४.३० वाजतासुद्धा मला सरावासाठी क्लबचे दरवाजे खुले केले आहेत. आपल्या देशात खेळाडूंसाठी असे प्रयत्न करणारे फारच कमी क्लब आहेत. हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षांची असल्यापासून मी प्रशिक्षण घेत आहे आणि पीवायसी क्लब हे माझे दुसरे घरच बनले आहे, असे कृतज्ञ उद्गार आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस प्रकारात महिला एकेरीत कांस्यपदक जिंकलेल्या अंकिता रैनाने आपल्या भाषणात व्यक्त केले.

  • क्रीडाक्षेत्रात शहरांतील अग्रगण्य क्लब असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या टेनिसमधील कांस्यपदक विजेती अंकिता रैना, टेनिसपटू ऋतुजा भोसले आणि बास्केटबॉलपटू शिरीन लिमये या तीन खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

  • याप्रसंगी तीन खेळाडूंसह प्रशिक्षक हेमंत बेंद्रे, सुवर्णा लिमये, टेक्निकल आॅफिशियल अवनी गोसावी आणि खेळाडूंचे पालक यांचा पीवायसी क्लबच्या सभासदांतर्फे क्लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, खजिनदार आनंद परांजपे, शिरीष करंबळेकर, विनायक द्रविड, अतुल केतकर, शशांक हळबे, ज्योती गोडबोले, शैलजा बापट, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या चारही आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपले पीवायसीच्याप्रती आभार व्यक्त केले.

  • यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेती टेनिसपटू अंकिता रैनाला क्लबच्या वतीने पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले. याआधी क्लबचे सभासदत्व प्रदान करण्यात आलेल्या भारतीय खेळाडू गगन नारंग, पूल्लेला गोपचंद, सायना नेहवाल, पंकज अडवाणी यांच्या यादीत अंकिता रैनाचा समावेश झाला आहे. शिरीन लिमये ही क्लबमध्ये प्रशिक्षक व तिची आई सुवर्णा लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

सोशल मीडियावरुन द्वेष पसरवू नका, नरेंद्र मोदींचं आवाहन :
  • नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन द्वेष पसरवू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसीमधील भाजप कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांशी 'नमो अॅप'च्या माध्यमातून संवाद साधताना मोदींनी हे आवाहन केलं.

  • एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबांतील भांडण ही आजकाल राष्ट्रीय बातमी होते. त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. देशाबाबतच्या सकारात्मक बातम्यांचं वातावरण निर्माण करुया. समाजाला बळकटी देणारी माहितीच शेअर करुया, असंही मोदी यावेळी म्हणाले.

  • 'लोक काहीतरी चुकीचं पाहतात किंवा ऐकतात आणि फॉरवर्ड करतात. पण त्यामुळे समाजाचं किती नुकसान होत आहे, याचा कोणी विचार करत नाही. सभ्य समाजाला अशोभनीय असणारे शब्द काही जण वापरतात. महिलांविषयी वाईट-साईट लिहिलं किंवा बोललं जातं' असंही मोदींनी पुढे म्हटलं.

  • सोशल मीडियावरुन गलिच्छ गोष्टी पसरवण्यापासून प्रत्येकाने स्वतःला थांबवायला हवं. स्वच्छता अभियान हे फक्त साफसफाईबाबत नसून मानसिक स्वच्छतेबाबतही असल्याचं मोदींनी सांगितलं. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना चांगल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करण्यास सांगा, असंही मोदी म्हणाले.

शिपाई पदाची भरती, पाचवी पासची अट, ३७०० पीएचडीधारकांचे अर्ज :
  • लखनऊ (उत्तर प्रदेश) : देशात नोकऱ्यांची किती वाणवा आहे, हे वास्तव सांगणारं चित्र उत्तर प्रदेशात समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील पोलिस विभागात शिपाई पदाच्या 62 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी पाचवी पासची अट ठेवण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या पदासाठी पीएचडीधारकांनी अर्ज केला आहे. आणि तेही एक किंवा दोन जणांनी नव्हे, तर तब्बल 3,700 पीएचडीधारकांनी शिपाई पदासाठी अर्ज केला आहे.

  • केवळ 62 पदांसाठी भरती केली जात आहे. मात्र या पदासाठी अर्ज करण्यात तब्बल 50 हजार पदवीधर, 28 हजार पदव्युत्तर आणि 3,700 पीएचडीधारकांचा समावेश आहे. पदव्युत्तर अर्जदारांमध्ये बी टेक, एमबीए शिक्षितांचाही समावेश आहे

  • एकूण 93 हजार जणांनी 62 पदांसाठी अर्ज केले असून, यातील 7,400 अर्जदार पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहेत.

  • पोलिस विभागातील शिपाई पदाच्या 62 जागांसाठी भरती केली जात आहे. पोस्टमनसारखी ही नोकरी असेल. पोलिसांच्या टेलिकॉम डिपार्टमेंटमधून पत्र किंवा कागदपत्र घेऊन, दुसऱ्या ऑफिसमध्ये पोहोचवण्याचे काम या पदावरील शिपायाला करावे लागणार आहे.

  • शिपायाची ही नोकरी पूर्णवेळ सरकारी नोकरी आहे, तसेच 20 हजार रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. कदाचित, त्यामुळेच उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांनी या पदासाठी अर्ज केल्याच अंदाज वर्तवला जातो आहे. या सर्व प्रकारामुळे नोकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात वाणवा आहे, हे वास्तव समोर आले आहे.

दिनविशेष :
  • बालस्वातंत्रदिन

महत्वाच्या घटना

  • १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

  • १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

  • १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.

  • १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.

  • १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

  • १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

  • १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.

  • १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

जन्म

  • १८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९५२)

  • १९१९: कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५)

  • १९३१: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २००५)

  • १९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

  • १९४४: वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.

  • १९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

मृत्यू

  • १४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)

  • १९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२)

  • १९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या. (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)

  • २०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.