चालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१७

Date : 31 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नऊ वर्षांनी मोशे येणार मुंबईमध्ये, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंचा भारत दौरा :
  • नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जानेवारी महिन्यामध्ये भारतात येत आहेत. त्यांच्याबरोबर मोशेसुद्धा येणार आहे. मोशेचे आई-वडिल मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले होते. खाबाद हाऊस येथे झालेल्या हल्ल्यामधून मोशे बचावला होता. सध्या तो इस्रायलमध्ये त्याच्या आजी-आजोबांसोबत राहातो.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जेव्हा इस्रायलला भेट दिली तेव्हा त्यांनी मोशेची भेट घेऊन त्याला भारतभेटीचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार आता मोशे भारताच्या भेटीवर येत आहे. तसेच याच भेटीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यानाहू यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, त्याचा स्वीकार नेत्यानाहू यांनी केला होता. 

  • भारताला भेट देणारे नेत्यानाहू हे दुसरे इस्रायली पंतप्रधान ठरतील. यापुर्वी २००३ साली अरायल शेराँन यांनी भारताला भेट दिली होती. तेव्हाअटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते.

  • दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर तेव्हा चर्चा केली होती. इस्रायल आणि भारत यांच्या संबंधांना तेव्हापासून गती मिळाली होती. यावर्षी भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये राजनयीक संबंध प्रस्थापित होण्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

स्वच्छ महाराष्ट्र योजना, विजेत्या शहराला 20 कोटींपर्यंत बक्षीस :
  • मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या धरतीवर राज्यत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. या अंतर्गत हागणदारीमुक्त आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन गोष्टींचा समावेश आहे. यासाठी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्पर्धा ठेवली आहे. विशेष म्हणजे यामध्ये 15 ते 20 कोटी रुपये बक्षीस ठेवण्यात आलंय.

  • केंद्र सरकारकडून स्वच्छतेच्या अनुषंगाने देशभरातील 4041 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं सर्वेक्षण होणार आहे. अमृत शहरं आणि नॉन अमृत शहरं या दोन गटात हे सर्वेक्षण होईल. अमृत शहरांचा गुणानुक्रम हा देशपातळीवरील 500 शहरांमधून करण्यात येणार आहे. यात राज्यातील 43 शहरं आहेत.

  • स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या विविध बाबींसाठी 4 हजार गुण देण्यात येतील. अमृत आणि नॉन अमृत शहरांना वेगवेगळं बक्षीस देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात जाणार पॅलेस्टाइन दौऱ्यावर :
  • नवी दिल्ली- 2018 साली जानेवारी महिन्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारताच्या भेटीवर येणार आहेत या भेटीमध्ये भारत आणि इस्रायल यांच्यामधील आर्थिक व इतर संबंध अधिक दृढ होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत.

  • यावर्षी जुलै महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. या तीन वर्षांच्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पॅलेस्टाइनला भेट दिली आहे.

  • मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल दौऱ्याच्यावेळी पॅलेस्टाइनला भेट दिली नव्हती. त्यामुळे त्याबाबत जगभरात आणि विशेषतः भारतीय राजकीय पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्य़ा.

  • संयुक्त अरब अमिराती दौरा आणि पॅलेस्टाइन भेट एकत्र करण्याचे नियोजन साऊथ ब्लॉकतर्फे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसाठी उपस्थित राहाणार आहेत. या परिषदेचे यजमान संयुक्त अरब अमिराती असून 11 ते 13 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये ती भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त अरब अमिरातीची ही दुसरी भेट असेल.

सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, नव्या पक्षाची स्थापना :
  • चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे प्रस्थापितांना मोठा हादरा बसला आहे. चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी ही घोषणा केली.

  • 'राज्यातलं राजकारण बदलण्याची गरज आहे. तामिळनाडूतील राजकारण खूपच वाईट झालं आहे. लोकशाही मरणपंथाला लागली आहे. गेल्या वर्षभरात तामिळनाडूच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राज्य बदनाम झालं आहे. इथे असलेला पारदर्शकतेचा अभाव आम्ही आणण्याचा प्रयत्न करु' अशा भावना रजनीकांत यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

  • रजनीकांत यांच्या स्टाईलची फक्त दाक्षिणात्यच नाही, तर देश-विदेशातील प्रेक्षकांवर मोहिनी आहे. त्यांना असलेल्या मोठ्या चाहत्यावर्गाचा राजकीय क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रजनीकांत यांनी नव्या पक्षाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.

स्वराज्याच्या घोषणेचा लखनौमध्ये उत्सव, लोकमान्य टिळकांनी केली होती घोषणा :
  • मुंबई : लोकमान्य टिळ कांनी लखनौ येथे २९ डिसेंबर १९१६ रोजी झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्षस्थानावरून संबोधित करताना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी घोषणा केली होती. या घटनेला १०१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे शनिवारी आयोजन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य अतिथी होते.

  • उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला तेथील मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, महिला कल्याण पर्यटन मंत्री रिता बहुगुणा-जोशी, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.

  • फडणवीस यावेळी म्हणाले की, लोकमान्यांच्या स्वराज्यविषयक घोषणेने स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलण्यासह जुलमी ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागवला. युवा शक्तीचा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होत असताना

  • युवा पिढीला निव्वळ आधुनिक शिक्षण व प्रगत तंत्रज्ञान देऊन चालणार नाही. त्यासोबत या पिढीला संस्कार, राष्ट्रीयत्व शिकविले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील एका चित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. त्यानंतर फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची लखनौ येथील राजभवनात भेट घेतली.

वजन घटविण्याच्या फसव्या जाहिरातींवर कारवाई करा  - उपराष्ट्रपती
  • नवी दिल्ली : झटपट वजन कमी करण्याच्या फसव्या आणि बनावट जाहिरातींचा गोरखधंदा बंद करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरकारला केले. अशाच एका जाहिरातीच्या नादी लागून आपण स्वत: १,२३० रुपयांना कसे फसविले गेलो, याचा अनुभवही त्यांनी कथन केला.

  • शुक्रवारी हा स्वानुभव राज्यसभेत कथन करताना नायडू म्हणाले की, उपराष्ट्रपती झाल्यानंतर लगेचच २८ दिवसांत वजन कमी करण्याची खात्री देणाºया एका औषधाची जाहिरात माझ्या पाहण्यात आली. मी काही लोकांशी बोललो, पण अशा जाहिराती खºया नसल्याचे त्यांनी सांगितले.

  • मी पुन्हा जाहिरात पाहिली. त्यात १,२३० रुपये भरावे लागतील, असे लिहिले होते. त्याप्रमाणे मी तेवढे पैसे भरले. पण त्यांनंतर मला ते औषध पाठविण्याऐवजी एक पाकीट आले. ‘अस्सल औषधासाठी आणखी एक हजार रुपये भरावे लागतील’, असे पत्र त्यात होते!

  • नायडू यांनी सांगितले की, यानंतर मी हे प्रकरण ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे उपस्थित केले. त्यांनी चौकशी केल्यावर संबंधित जाहिरात अमेरिकेतून दिली जात असल्ं़याचे आढळून आले.

  • अशा जाहिरातींचे मूळ अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशात असले तरी ही फसवणूक थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, असे ते म्हणाले.

भारतात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध 8 ठिकाणं :
  • मुंबई : 2017 या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागताची देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. अनेक जण अगोदरपासून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळांवर दाखल झाले आहेत. मात्र तुम्ही अजून प्लॅन केला नसेल तर असे काही निवडक ठिकाणं आहेत, जिथे जाऊन तुम्ही नव्या वर्षाचं स्वागत करु शकता.

  • गोवा : गोव्याला भारताचं लॉस वेगास म्हटलं जातं. गाण्यांवर थिरकणारी तरुणाई, पार्टी आणि समुद्रकिनाऱ्यांवरचा जल्लोष हे गोव्याचं आकर्षण असतं. थर्टी फर्स्टसाठी जगभरातील पर्यटक गोव्यात दाखल होत असतात.

  • बंगळुरु : ओपन स्पेस, हिरव्यागार गार्डन, मॉल्सचं विश्व आणि पार्टीची विविध ठिकाणं असं बंगळुरुचं वर्णन करता येईल. बंगळुरुमधील रेस्टॉरंट हे पर्यटकांचं आकर्षण असतात. रॉकिंग क्राऊडसोबत लाईव्ह डीजे पार्टीचा आनंद आणखी वाढवतात.

  • मुंबई : स्वप्ननगरीतही रात्रभर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं जातं. गेट ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह या ठिकाणी मुंबईकर रात्रभर नव्या वर्षाचं स्वागत करण्यात दंग असतात.

  • दिल्ली : इंडिया गेट हे ठिकाणी दिल्लीत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. महागडे नाईट क्लब, प्रायव्हेट लाँज आणि डीजे पार्टी हे दिल्लीचं आकर्षण आहे.

  • कोलकाता : कोलकाता हे शहर मोस्ट हॅपनिंग क्राऊडचं शहर म्हणून ओळखलं जातं. कोलकात्यात प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करताना दिसतो. तुम्हीही कधी कोलकात्याला गेला नसाल तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हे ठिकाण निवडू शकता.

  • केरळ : तुम्हाला पाण्यात आणि निसर्गाच्या सौंदर्यात नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करायचं असेल तर केरळला पर्याय नाही. केरळच्या समुद्रकिनाऱ्यांवरील पार्टीची मजा निराळीच आहे. हाऊस बोट बुक करुन तुम्ही पाण्यात पार्टी करु शकता.

  • मनाली : मनालीला जाऊनही तुम्ही या वर्षाला निरोप देऊ शकता. मित्र किंवा कुटुंबासोबत येथील हॉटेलमध्ये होणाऱ्या पार्टीजमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता.

  • गंगटोक : पूर्वोत्तर भारतात जाऊन तुम्हाला नव्या वर्षाचं स्वागत करायचं असेल तर गंगटोक हे चांगलं ठिकाण आहे. येथील बर्फाची चादर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. लोकल पब आणि बार हे पर्याय तर आहेतच, मात्र स्किंग आणि स्नो बोर्डिंग करुनही तुम्ही सेलिब्रेशन करु शकता.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

  • १८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.

  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.

  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

  • २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म

  • १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)

  • १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)

  • १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)

  • १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.

  • १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.

  • १९४८: अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१२)

  • १९६५: भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा जन्म.

मृत्य

  • १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)

  • १९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)

  • १९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.

  • १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)

  • १९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.