चालू घडामोडी - ३१ जानेवारी २०१९

Date : 31 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन - उद्या अंतरिम बजेट सादर होणार :
  • नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीचं हे अखेरचं अधिवेशन आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधित करतील. 13 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु राहणार आहे.

  • निवडणुकीआधी मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प उद्या मांडला जाणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमवर सरकार या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  • मोदी सरकार 1 फेब्रुवारीला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत - लोकसभा निवडणुकीनंतर मे महिन्यात सत्तेत येणारं सरकार जुलैमध्ये संपूर्ण बजेट सादर करणार आहे. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडलं जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला सुरु होऊन 13 फेब्रुवारीला संपणार आहे. एप्रिल, मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर मे अखेरपर्यंत नव्या सरकारची स्थापना होईल. मात्र अंतरिम अर्थसंकल्पातही पुढील चार महिन्यांच्या खर्चाचा लेखाजोखा मांडला जाईल.

  • जेटलींच्या अनुपस्थितीत पियुष गोयल यांच्याकडे अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार - सध्या अर्थ मंत्रालयाचं कामकाज पाहणारे पियुष गोयल उद्या अर्थसंकल्प मांडणार आहेत. अरुण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी गेल्याने मागील आठवड्यातच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्याआधी अरुण जेटली यांनी पाच वेळा अर्थसंकल्प मांडला होता.

राष्ट्रीय कबड्डी - महाराष्ट्र उपांत्य फेरीत :
  • रोहा : महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये  ५  आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये   ५ गुण पटकावले.

  • महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी " ६६व्या पुरुष वरिष्ठ गट" राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.  रायगड रोहा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.

  • रिशांकने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण करीत महाराष्ट्राच्या गुणांचे खाते खोलले. ८व्या मिनिटाला तुषार पाटीलने शिलकी ४ गडी एकाच चढाईत टिपत केरळवर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. पुन्हा जोरदार आक्रमण करीत दुसरा लोण देत आणला होता, पण केरळच्या शिलकी एक खेळाडूने बोनससह दोन गडी टिपत व निलेश साळुंखेची अव्वल पकड करीत होणारा लोण केरळने लांबविला. मध्यांतराला २४-१२अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती.

  • मध्यांतरानंतर ३ऱ्या मिनिटाला दुसरा लोण देत महाराष्ट्राने २९-१३अशी आघाडी घेतली. तिसरा लोण देताना पुन्हा एकदा तुषारने ६व्या मिनिटाला ४गडी टिपले तर शिलकी दोन गडी रिशांकने टिपत ७व्या मिनिटाला लोण देत ४२-१८ अशी आघाडी वाढविली. यानंतर तुषारला विश्रांती देण्यात आली. पण मध्यांतरा नंतर ११व्या मिनिटाला एका  लोणची परतफेड करीत केरळ ने ३०-४५अशी आघाडी कमी केली. पुन्हा एकदा महाराष्ट्राने जोरदार कमबॅक करीत १६ गुणांनी सामना खिशात टाकला.

  • महाराष्ट्राकडून तुषार पाटील ७चढाया करीत १०गुण मिळविले. अजिंक्य पवारने ८ चढायात ८गुण घेतले. रिशांकने देखील चढायात गुण घेतले. विशाल माने व विकास काळे यांनी ४-४पकडी घेत आपली भूमिका पार पाडली. केरळ कडून जिष्णु के के यांनी ८ चढायात २ बोनस व ६ गडी टिपले. सागर कृष्णाने ४ पकडी करीत चांगला प्रतिकार केला.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्त्यांवर १९ फेब्रुवारीपासून होणार सुनावणी :
  • नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी कायदा) सरकारने गेल्या आॅगस्टमध्ये केलेल्या दुरुस्त्यांच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या १९ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेणार आहे. तोपर्यंत या दुरुस्त्यांना कोणतीही अंतरिम स्थगिती दिली जाणार नाही, असे न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले.

  • पृथ्वीर चौहान व प्रिया शर्मा यांनी यासाठी केलेली याचिका न्या. उदय उमेश लळित व न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठापुढे आली तेव्हा ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी सुनावणी लवकर घेण्याची किंवा तोपर्यंत अंतरिम स्थगिती देण्याची विनंती केली. तेव्हा खंडपीठाने स्थगिती न देता १९ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले.

  • डॉ. सुभाष काशीनाथ महाजन वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात निकाल देताना गेल्या वर्षी २० मार्च रोजी निकाल देताना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी शिथिल केल्या होत्या. निव्वळ फिर्याद दाखल झाली म्हणून तिच्या खरेपणाची शहानिशा केल्याशिवाय गुन्हा नोंदविता येणार नाही, असे बंधन न्यायालयाने घातले, तसेच आरोपीला जामीन मिळण्याचा मार्गही मोकळा केला होता. या निकालाने अ‍ॅट्रॉसिटी कायदा मवाळ झाल्याने सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून कायदा पूर्ववत करावा, यासाठी दलित संघटनांनी देशभर आंदोलने केली.

शहीदाच्या परिवाराला सरकारकडून ५ एकर जमीन :
  • नांदेड : देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशा शाहिद परिवाराच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने 5 एकर जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अन राज्यात शाहिदच्या परिवाराला मोफत जमीन देण्याचा पहिला मान नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.

  • संभाजी कदम हे 29 नोव्हेंबर 2016 साली मातृभूमीचे रक्षण करताना काश्मीरमध्ये नागरोटा इथे शाहिद झाले. कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती शहीद झाल्याने आता शहीद संभाजी कदम यांचे आई, वडील, पत्नी आणि मुलीचे काय होणार असा प्रश्न होता.

  • राज्य सरकारने 28 जून 2018 रोजी महाराष्ट्रातील शहीदांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य जमीन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ अमलबजावणी केली. शहीद संभाजी कदम यांच्या परिवाराला 5 एकर शेतीयोग्य सरकारी जमीन खरबी या गावात मोफत दिली आहे. राज्यात शहीदांच्या कुटुंबाला मोफत जमीन देण्याचा पहिला मान देखील नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे.

महिला टी20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर :
  • मुंबई : इंग्लंडमध्ये यावर्षी भरवल्या जाणाऱ्या विश्वचषकाआधी 'आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक 2020'चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 21 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियात महिलांच्या विश्वचषकाला सुरुवात होईल. महिला विश्वचषकाचा अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

  • टी20 विश्वचषकात सर्वोत्तम दहा संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारतीय महिला संघाचा समावेश 'अ' गटात करण्यात आला आहे. 2018 च्या अखेरीस आयसीसीने जाहीर केलेल्या टी 20 आंतरराष्ट्रीय रँकिंगनुसार आठ संघांना विश्वचषकात थेट प्रवेश मिळाला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान हे ते आठ संघ.

  • भारताचा समावेश असलेल्या 'अ' गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर 'ब' गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान हे संघ आहेत. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत दहा संघ एकूण 23 सामने खेळतील. भारतीय महिला संघाचा गटातला सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

  • ऑस्ट्रेलियात आयोजित पुरुषांचा टी20 वर्ल्डकप 18 ऑक्टोबर 2020 रोजी सुरु होणार असून अंतिम सामना 15 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबरला सलामीच्या सामन्यात पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी खेळेल.

सलग चौथ्या विजयाचे भारताचा निर्धार :
  • न्यूझीलंडविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशीजिंकून कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. आता कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा खांद्यावर उचलणारा रोहित शर्मा न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत चौथ्या सामन्यातही पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • कर्णधार म्हणून दमदार कामगिरी करणारा रोहित आपला एकदिवसीय क्रिकेटमधील २००वा सामना संस्मरणीय करण्याच्या इराद्यात आहे. सेडॉन पार्कवर होणाऱ्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात केल्यास, १९६७नंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताचा हा गेल्या ५२ वर्षांतील सर्वात मोठा (४-०) मालिका विजय ठरेल.

  • दोन सामने शिल्लक राहिल्यामुळे आता भारताच्या राखीव खेळाडूंनाही संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गुरुवारी होणाऱ्या सामन्यातही धोनीच्या उपस्थितीविषयी शंका असली तरी त्याच्या समावेशाविषयीचा निर्णय नाणेफेकीच्या आधी घेतला जाणार आहे, असे संघ व्यवस्थापनाकडून समजते.

  • कोहलीला उर्वरित दौऱ्यासाठी दिलेली विश्रांती आणि धोनीच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू शुभमन गिलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेटचे भवितव्य असलेल्या शुभमनमध्ये कोहलीप्रमाणेच उत्तुंग फटके लगावण्याची क्षमता आहे. ‘‘१९व्या वर्षी शुभमन खेळत आहे, त्याच्या वयात मी शुभमनच्या १० टक्केही नाही,’’ अशा शब्दांत कोहलीने त्याची स्तुती केली होती. शुभमन आणि धोनीला संघात स्थान मिळाले तर दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात येईल.

आता MahaNMK वेबसाईटवर करता येणार परीक्षेची तयारी आधुनिक पद्धतीने..!
  • वाढत्या स्पर्धा परीक्षेच्या युगात आपल्याला देखील आधुनिक पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे.

  • स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, यामुळेच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय "Live Test Series" चा धमाका अगदी मोफत.

  • आता आपण Question Papers या लिंक वर क्लिक करून आपल्याला हवी ती परीक्षा "Start Test" या बटनाद्वारे देऊ शकता.

  • या आधुनिक पद्धतीचा फायदा आपल्याला नक्कीच होईल अशी आम्ही आशा करतो.

  • आपल्याला काही तक्रार किंवा सुचायचे असेल तर - येथे क्लिक करा

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

  • १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

  • १९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

  • १९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

  • १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.

जन्म 

  • १८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)

  • १९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)

मृत्यू 

  • १९७२: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.

  • १९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.

  • १९९५: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.

  • २००४: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.