चालू घडामोडी - ३१ जुलै २०१८

Date : 31 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आसाममधील ४० लाख लोकांना भारताचं नागरिकत्व नाही : 
  • दिसपूरआसाममध्ये स्थानिक कोण आणि परदेशी, बाहेरचे कोण याचा फैसला आज होत आहे. आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनचा (NRC) दुसरा अहवाल जारी झाला. त्यानुसार तब्बल 40 लाख लोकांना आसामचं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही.

  • NRC च्या मते  आसामचे 2 कोटी 89 लाख 83 हजार 668 भारतीय आहेत.  आसामची एकूण लोकसंख्या 3 कोटी 29 लाख इतकी आहे. मात्र आता 40 लाख नागरिकांना आसाममधील आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही. पण त्यांना ते सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

  • NRC ची पहिली यादी 31 डिसेंबर 2017 रोजी जारी करण्यात आली होती. पहिल्या यादीत आसामच्या 3.29 कोटी लोकसंख्येपैकी 1.90 कोटी नागरिकांना स्थान मिळालं होतं. जे नागरिक 25 मार्च 1971 पासून आसाममध्ये राहतात त्यांना या यादीत सरसकट सहभागी करुन घेतलं आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण - आसाममध्ये अवैधरित्या राहणाऱ्यांविरोधात एक मोहिम सुरु झाली आहे. त्यासाठी 2015 पासून अशा अवैधरित्या राहणाऱ्यांची माहिती मिळवली जात आहे. आसाममध्ये लाखो लोकांनी घुसखोरी केली आहे.  त्यामुळे मूळचे आसामी कोण आणि बाहेरचे कोण याबाबत नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन शोध घेत आहे.

मोदींचा इम्रान खान यांना फोन, निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील तहरिक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं.

  • मोदींनी इम्रान खान यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. शिवाय शेजारच्या राष्ट्राशी शांततेच्या मार्गाने विकास साध्य करायचा असल्याचं त्यांनी फोनवरुन सांगितलं आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची मुळं आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

  • पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. आपण 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ, असं इम्रान खान यांनी जाहीर केलं असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढच्या 48 तासात होईल.

  • पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. असं असलं तरी पीटीआयकडे अजून बुहमताचा आकडा नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

एसबीआयची ग्राहकांना खुशखबर, एफडीवरील व्याजदर वाढवले :
  • मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने एफडीच्या (मुदत ठेव) व्याजदरात वाढ करत आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. मॅच्युरिटी काळाच्या एफडीतील व्याजदरात वाढ करण्यात आली. ही वाढ सामान्य नागरिक आणि जेष्ठ नागरिक या दोघांसाठीही असेल.

  •  व्याजदरात किती वाढ झाली : एक कोटींपेक्षा कमी रकमेच्या आणि एक ते दहा वर्षांच्या कालावधीतील एफडीच्या व्याजदरात 0.05 ते 0.1 टक्क्याने व्याजदरात वाढ होईल. हे वाढीव व्याजदर आजपासून (30 जुलै) लागू होतील.

  • एक कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर : एक ते दोन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के व्याज मिळत होते, त्यावर आता 6.7 टक्के व्याज मिळेल. दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर आधी 6.65 टक्के एवढे व्याज मिळायचे, त्यामध्ये वाढ होऊन आता 6.75 टक्के व्याज मिळेल.

  • तीन ते पाच वर्ष या कालावधीच्या एफडीवर आधी 6.7 टक्के व्याज मिळायचे. आता हा व्याजदर 6.8 टक्के असेल. पाच ते दहा वर्षांच्या एफडीसाठी याआधी ग्राहकांना 6.75 टक्के व्याज मिळायचे, ते आता 6.85 टक्के मिळेल.

भारत अकरा वर्षानंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज :
  • मुंबई : भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही फौजा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवण्यात येईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी एक ऑगस्ट (बुधवार) पासून सुरु होणार आहे. गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळेच विराटची टीम इंडिया इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे.

  • 2014 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली होती. तर वन डेत इंग्लंड संघाची 2-1 अशी सरशी झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेच्या निमित्तानं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही फौजा आता सज्ज झाल्या आहेत.

  • आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर. पण इंग्लंडची मायदेशातली कामगिरी भारताच्या तुलनेत नेहमच वरचढ राहिलीये. त्यामुळे या दोन्ही संघांमधली पाच कसोटी सामन्यांची मालिका तितक्याच तुंबळपणे लढली जाईल.

२३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग :
  • नवी दिल्ली - मोबाइल हा आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला भारतात मोबाईलचे कोट्यवधी युझर्स असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. 1995 साली भारतात मोबाइलचे आगमन झाले आणि आजच्याच दिवशी 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग खणाणली होती. 

  • 31 जुलै 1995 रोजी तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना मोबाइलवरून फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. ज्योती बसू यांनी हा फोन कोलकाता येथील रॉयटर्स बिल्डिंगमधून दिल्लीतील संचार भवनमध्ये केला होता. 

  •  भारतातील पहिली मोबाइल ऑपरेटर कंपनी मोदी टेल्स्ट्रा होती. याच कंपनीच्या सेवेला मोबाइल नेट या नावाने ओळखले जात असे. याच कंपनीच्या नेटवर्कवरून भारातातील पहिला मोबाइल कॉल करण्यात आला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील टेलिकॉम कंपनी टेल्स्ट्रा यांची संयुक्त कंपनी होती. ही कंपनी तेव्हाच्या देशातील आठ कंपन्यांपैकी एक होती ज्यांना भारताता सेल्युलर सर्व्हिस पुरवण्यासाठी परवाना मिळाला होता. 

  •  मात्र 1995 साली भारतात मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य भारतीयाच्या हातात मोबाईल फोन येण्यास बराच वेळ लागला. त्याचे कारण म्हणजे मोबाइल सेवेचे असलेले महागडे दर हे होते. त्याकाळी एका आऊटगोईंग कॉलसाठी 16 रुपये प्रति मिनीट एवढा दर होता. तर इनकमिंग कॉलवरही ठरावीक शुल्क आकारले जाई. 

पोलीस तपासणीशिवाय मिळू शकणार पासपोर्ट, लवकरच नवा बदल :
  • नवी दिल्ली : पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील. इतर प्रकरणात त्यांना अर्जदाराच्या घरी जाण्याची गरजच भासणार नाही. यासाठी पासपोर्ट विभाग सर्व राज्यांच्या पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती मिळण्यासाठी चर्चा करीत आहे. त्यामुळे ज्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्यास लवकर पासपोर्ट मिळू शकेल.

  • अर्ज करणाºयास एक ते तीन दिवसांत पासपोर्ट मिळावा, असे विभागाचे प्रयत्न आहेत. सध्या आधार क्रमांक देणाºयास पासपोर्ट दिल्यानंतरही तपासणी केली जाते, पण राज्यांकडील गुन्ह्यांच्या माहितीद्वारेच अर्जदाराच्या थेट तपासणीचा प्रयत्न पासपोर्ट विभाग करीत आहे. शेजाºयाकडे जाऊन अर्जदाराची माहिती मिळविणे वा अर्जदार एकाच पत्त्यावर तीन वर्षे राहतो आहे का, हे पाहणे हे नियम शिथिल केले आहेत.

  • प्रत्येक जिल्ह्यात एक सेवा केंद्र परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पासपोर्ट सेवा) ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, शेजाºयाकडे जाऊन चौकशी करून घेणे, पोलीस कर्मचाºयाने घरी जाऊन माहिती मिळविणे हे प्रकार आम्हाला रद्द करायचे आहेत. ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही, त्याच्या माहितीची गरजच असू नये.

  • प्रत्येक जिल्ह्यात किमान पासपोर्ट सेवा केंद्र असावे, असे प्रयत्न असून, तोपर्यंत पाहिजे. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक पासपोर्ट सेवा केंद्र स्थापणे हे आमचे लक्ष्य आहे. यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: देखरेख करीत आहेत व त्याच्याशी संबंधित माहिती मिळवित आहेत. यामुळे काम वेगाने पुढे सरकत आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४९८: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युपोपीय ठरले.

  • १६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनले.

  • १८५६: न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.

  • १९३७: के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.

  • १९५६: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.

  • १९९२: सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

  • २०००: वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.

  • २००१: दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८७२: संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मणरामचंद्र पांगारकर यांचा जन्म. (मृत्यू: १० नोव्हेंबर१९४१)

  • १८८०: हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९३६)

  • १९०७: प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून १९६६)

  • १९१२: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रिडमन यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर२००६)

  • १९१८: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल २०००)

  • १९१९: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

  • १९४१: गुजरातचे ८वे मुख्यमंत्री अमरसिंग चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट २००४)

मृत्यू 

  • १८६५: आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

  • १८७५: अमेरिकेचे १७वे राष्ट्राध्यक्ष अँड्रयू जॉन्सन यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८०८)

  • १९४०: भारतीय कार्यकर्ते उधम सिंग यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

  • १९६८: चित्रकार, संस्कृत पंडित पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८६७)

  • २०१४: भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २३ जून १९४८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.