चालू घडामोडी - ३१ मार्च २०१८

Date : 31 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना गुगल डुडलद्वारे आदरांजली :
  • मुंबई - भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांचा जन्म 31 मार्च 1865 साली पुणे शहरात झाला होता. आज त्यांच्या 153वी जयंतीनिमित्त त्यांचे सुंदर रेखाचित्र साकारुन डुडलद्वारे गुगलने त्यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली वाहिली आहे. 

  • या रेखाचित्रात नाकात नथ व पारंपरिक मऱ्हाठमोळी साडी परिधान केलेल्या वेशामध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र त्या दाखवत आहेत.  बंगळुरुतील रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी आनंदीबाईंचे हे सुंदर रेखाचित्र साकारले आहे. अमेरिकेच्या धरतीवर पाऊल ठेवणा-या व डॉक्टरकीची पदवी घेणा-या आनंदीबाई पहिल्या वहिल्या हिंदू महिल्या आहेत.

  • आनंदीबाई जोशी तमाम महिलांच्या एक आदर्श आहेत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. आनंदीबाईंचे पती गोपळराव हे त्यांच्याबून वयाने 20 वर्षे मोठे होते. लहान वयात लग्न झाल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  पण त्यांच्या पतीने त्यांना  शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

  • अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या मायदेशी परतल्या.(source :lokmat)

अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती :
  • नवी दिल्ली - काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या संघटनेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची पक्षाच्या प्रभारी महासचिवपदी नियुक्ती केली आहे. गहलोत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे निकटवर्तीय असलेल्या जनार्दन द्विवेदी यांचे स्थान घेतील. 

  •  दोनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या अशोक गहलोत यांना मिळालेल्या पदोन्नतीमागे काँग्रेसला गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत मिळालेले चांगले यश कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. गुजरात निवडणुकीदरम्यान गहलोत हे पक्षाचे गुजरात प्रभारी होते.

  • गहलोत यांनी 1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 या काळात राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. यापुढे पक्षामध्ये तरुणांना महत्त्वाची भूमिका मिळेल,  तर ज्येष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या अधिवेशनात सांगितले होते.  

रेल्वेमधील नोकऱ्यांची संख्या वाढली :
  • नवी दिल्ली : रेल्वेमधील नोकऱ्यांची संख्या वाढली असून, आता 90 हजारांऐवजी 1 लाख 10 हजार जागांसाठी भरती होणार आहे. म्हणजेच आणखी 20 हजार जणांची भरती केली जाईल. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन याबाबत घोषणा केली.

  • आरपीएफमध्ये 9 हजार रिक्त पदं आहेत आणि आरपीएसएफमध्ये 10 हजारहून अतिरिक्त नोकऱ्या आहेत, अशीही माहिती गोयल यांनी दिली. या 1 लाख 10 हजार जागांसाठी अडीच कोटींहून अधिक जणांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच, एक पदासाठी सरासरी 225 ते 230 जणांनी अर्ज केले आहेत.

  • एक लाख 10 हजार जागांसाठी अडीच कोटी जणांनी अर्ज केले असल्याने जगभरात या भरती प्रक्रियेची चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येहून अधिक जणांनी तर केवळ अर्ज केले आहेत.

  • शनिवारपर्यंत म्हणजेच 31 मार्चपर्यंत उमेदवारांना रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र त्याचवेळी अनेकांना ऑनलाईन अर्ज करताना, अडचणी येत असल्याचीही माहिती मिळते आहे. अनेक ठिकाणी वेबसाईट हँग होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

  • भारतीय रेल्वेमध्ये सध्या 13 लाख कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. म्हणजेच इतक्या मोठ्या संख्यात रेल्वेमध्ये रोजगार दिला जातो.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली केंद्रात सत्तेत आल्यानंतर आश्वासन दिले होते की, आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारतात निर्माण करु आणि मोठ्या संख्येत रोजगारही उपलब्ध करु. त्यासाठी ‘मेक इन इंडिया’सारखा महत्त्वाकांक्षी अभियानही केंद्राद्वारे हाती घेण्यात आला.(source :abpmajha)

महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन, १२ वर्षांनी मिळाला मुहूर्त :
  • पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह ११ एप्रिल रोजी महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

  • राज्य शासनाने यापूर्वी महात्मा फुले गौरव ग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङ्मय, शेतकऱ्यांचा आसूड अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. मोठ्या प्रमाणात मागणी असूनही या ग्रंथांचे पुर्नप्रकाशन करण्यात आले नाही. यासाठी युवा माळी संघटना आणि भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात आला होता.

  • महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत हरी नरके म्हणाले की, सुरूवातीच्या काळात राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने महात्मा फुले यांच्यावरील पुस्तके प्रकाशित केली होती. १९९१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पुढे २००६ मध्ये दुसरी आवृत्ती आली. त्यानंतर राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडून महात्मा फुले प्रकाशन समितीने हे काम स्वत:कडे मागून घेतले. त्यामध्ये नव्याने काही गोष्टी आम्हाला समाविष्ट कराव्याशा वाटल्या.

  • महात्मा फुले यांचे लेखन मोडी लिपीत असायचे. ‘शेतकºयांचे आसूड’ चे मूळ हस्तलिखित मोडीमध्येच होते. महात्मा फुले समग्र ग्रंथासह त्यांची पुस्तके देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित झाली. आता महात्मा फुले समग्र ग्रंथ नव्याने प्रकाशित करताना २०० पानी मजकूर वाढविण्यात आला आहे. महात्मा फुले यांनी गव्हर्नर जनरलला लिहिलेली मूळ पत्रे छापण्यात आली आहेत.(source :lokmat)

ट्रम्प प्रशासनाचा दणका, एकापेक्षा अधिक व्हिजाचे अर्ज रद्द :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेत काम करणाऱ्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनानं दणका दिला आहे. कारण, एकापेक्षा अधिक व्हिजासाठी अर्ज केल्यास, ते रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.

  • अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांमध्ये एच 1 बी व्हिसा अतिशय लोकप्रिय आहे. पण ट्रम्प प्रशासनाच्या नवीन व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांवर याचा फटका बसणार आहे.

  • अमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसची व्हिसा प्रक्रिया 2 एप्रिल पासून सुरु होणार आहे. पण 1 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी हा व्हिसा दिला जाईल.

  • एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसासाठी ज्या व्यक्ती एकापेक्षा अधिक अर्ज करत आहेत, ते यातील लॉटरी प्रक्रियेत अडचणी निर्माण करत आहेत.

  • अमेरिकेच्या इमिग्रेशन काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, एच 1 बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला काम करण्याचा व्हिसा देण्याची तरतूद रद्द करण्यात येणार आहे.

  • वास्तविक, ओबामा सरकारच्या कार्यकाळात 2015 मध्ये एच 1 बी व्हिसा मिळालेल्या व्यक्तींला त्याच्या जोडीदारांलाही तशाच प्रकारचा काम करण्याचा व्हिसा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. पण विद्यमान ट्रम्प प्रशासनाने ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टनुसार, 2010 ते 2016 दरम्यान एच 1 बी व्हिसा धारकांना टेक्सास आणि पूर्व किनारपट्टीच्या शहरांत रोजगाराच्या संधी मिळतात. वास्तविक, एच 1 बी व्हिसा धारकांना सिलिकॉन व्हॅलीत रोजगाराच्या संधी मिळणं अपेक्षित होतं.(source :abpmajha)

'जियो जी भरके', प्राइम मेंबरशिप वर्षभरासाठी मोफत :
  • मुंबई - स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगच्या सेवेमुळे दूरसंचार क्षेत्रातात अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केलेल्या रिलायन्स जिओनं पुन्हा एकदा धमाका केला आहे. रिलायन्स जिओच्या प्राईम मेंबर्सची सेवा आज 31 मार्चला संपणार होती. त्यामुळं ग्राहकांना ही सेवा बंद होणार किंवा यापूर्वी केलेल्या रिचार्जचे काय होणार? असा प्रश्न पडला होता. पण काल रात्री रिलायन्स जिओनं प्राईम युजर्ससाठी मोठी घोषणा करत एका वर्षांसाठी  मोफत मेंबरशीप जाहिर केली आहे.  

  • पुढील एक वर्षांसाठी अर्थात 31 मार्च 2019 पर्यंत  वैधता वाढणार असून प्राइम मेंबरशीपचे सर्व फायदेही मिळणार आहेत. त्यामुळे अनेक आकर्षक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे या युजर्सना आता पुढील एक वर्षांसाठी प्राईम युजर्सचे सर्व फायदे मिळणार आहेत.

  • याचाच अर्थ जर तुम्ही जिओचे प्राइम मेंबर असाल तर तुम्हाला नव्याने ही मेंबरशीप घेण्याची गरज नाही. याअंतर्गत तुम्हाला ज्या ऑफर्स मिळत होत्या त्या अशाच पुढील एक वर्षांसाठी वापरता येणार आहेत.

  • जिओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या भाषणादरम्यान युजर्सला ही माहिती दिली. त्याचबरोबर ज्या लोकांनी आजवर जिओची प्राइम मेंबरशीप घेतलेली नाही त्यांना यानंतरही 99 रुपयांत प्राइम मेंबरशीप घेता येणार आहेत.(source :lokmat)

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना

  • १६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

  • १८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

  • १८८९: आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

  • १९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

  • १९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

  • १९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

  • १९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

  • २००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

जन्म

  • १५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)

  • १५१९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १५५९)

  • १५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)

  • १८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५)

  • १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८८७)

  • १८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)

  • १९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)

  • १९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)

  • १९३८: दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.

  • १९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.

  • १९८७: भारतीय बुद्धिबळ खेळाडू हम्पी कोनेरू यांचा जन्म.

मृत्यू

  • १९१३: अमेरिकन सावकार जे. पी. मॉर्गन यांचे निधन. (जन्म: १७ एप्रिल १८३७)

  • १९७२: अभिनेत्री महजबीन बानो ऊर्फ मीनाकुमारी यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १९३२)

  • १९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)

  • २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)

  • २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)

  • २००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

  • २००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.