चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ मार्च २०१९

Date : 31 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पुढच्या दोन दिवसांनी 'या' पाच गोष्टी महागणार :
  • नव्या आर्थिक वर्षांत सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. नव्या आर्थिक वर्षांत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. सिलिंडरही महाग होणार आहे.

  • जर आपण गाडी खरेदी करणार असाल, तर दोन दिवसांत घेऊन टाका. आता 1 एप्रिलपासून गाडी खरेदी करणं महागणार आहे. कारच्या किमती 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत. टाटा मोटर्सच्या गाड्या 25 हजार तर महिंद्राच्या गाड्यांची किंमत 75 हजार रुपयांनी वाढणार आहेत.

  • पीएनजीवरच्या गाडी चालवणंही महागणार आहे. नैसर्गिक गॅसच्या किमतीत 18 टक्क्यांची वाढ होणार आहे. गॅसच्या किमती वाढल्यानं महागाई वाढणार आहे.

  • विमान प्रवासही 1 एप्रिलपासून महागण्याची चिन्हे आहेत. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना अधिक सुविधा पुरविण्याची मागणी होत असल्याचं त्याचा भार प्रवाशांवरच पडणार आहे.

  • हृदयविकाराच्या रुग्णांवरील उपचार महाग होणार आहेत. कारण स्टेंटची किंमत वाढणार आहे. नव्या किमती 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.

घुसखोरीविरोधात चौकीदारच संरक्षण करणार - मोदी :
  • आसाम व ईशान्येकडील इतर राज्यांत १९७० पासून काँग्रेस सरकारच्या धोरणामुळे घुसखोरी होत राहिली त्याचा फटका तेथील लोकांना बसला आहे, पण आता चौकीदारच घुसखोरीपासून तुमचे संरक्षण करील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचार सभेत केले.

  • काँग्रेसने आसामचा वेळोवेळी विश्वासघात कसा केला हे सांगतील. देशाच्या हिताविरोधात काम करणाऱ्यांना आसामची जनता पाठिंबा देणार का, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने कधीच देशाच्या व आसामच्या विकासाचा विचार केला नाही. काँग्रेसने लोकांना फसवले पण चौकीदार लोकांचे घुसखोरीपासून रक्षण करील. जनसंघ व अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढय़ास पाठिंबा दिला होता. त्या वेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

  • सरकारच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, की चौकीदारानेच पीएम श्रमयोगी मानधन योजना सुरू केली, ती चहामळ्यात काम करणाऱ्या लोकांना लागू आहे. यातील लोकांना वयाच्या साठीनंतर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत.

भारताच्या उपग्रहभेदी चाचणीची टेहळणी नाही :
  • भारताने  ए-सॅटची (उपग्रहभेदी क्षेपणास्त्र)चाचणी केल्याच्या प्रक्रियेची  विमान पाठवून टेहळणी केल्याचा आरोप अमेरिकेने फेटाळून लावला आहे. अमेरिकेने हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावरून एक विमान पाठवून भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीची टेहळणी केल्याच्या बातम्या आल्या आहेत त्याबाबत हे स्पष्टीकरण करण्यात आले. भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीची माहिती आधीच होती, हे मात्र अमेरिकेने मान्य केले आहे.

  • अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल डेव्हीड इस्टबर्न यांनी सांगितले, की अमेरिकेच्या विमानाने या चाचणीवर हेरगिरी करीत लक्ष ठेवले हे खरे नाही. उलट अमेरिका भारताशी संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच दोन्ही देशांचे आर्थिक संबंध चांगले आहेत.

  • एअरक्राफ्ट स्पॉटस या लष्करी हालचालीवंर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने असे म्हटले होते, की अमेरिकी हवाई दलाने दिएगो गार्सिया बेटावरून एक विमान भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीवर हेरगिरी करण्यासाठी पाठवले होते, हे विमान त्या  बेटावरून उडाले व बंगालच्या उपसागराकडे गेले, त्या वेळी भारताच्या चाचणीवर टेहळणी करण्यात आली. भारताच्या एसॅट चाचणीवर टेहळणी करून  माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

बॅडमिंटनपटूंच्या कमाईत सायना नेहवाल द्वितीय स्थानी :
  • लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल ही पहिल्या तिमाही सत्रात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला बॅडमिंटनपटूंमध्ये द्वितीय स्थानावर आहे. पहिल्या स्थानी चीनची चेन युफेई प्रथम स्थानी, तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली ताय त्झु यिंग तृतीय स्थानावर आहे.

  • ऑल इंग्लंड चॅम्पियन्स स्पर्धेची विजेती युफेइने ८६३२५ डॉलर्सच्या बक्षिसासह कमाईत अव्वल स्थान मिळवले आहे. तर सायनाने इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद आणि मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या कामगिरीतून ३६८२५ डॉलर्सची कमाई केली आहे.

  • पुरुषांमध्ये जपानच्या केंटो मोमोटाने जर्मन खुली बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद आणि ऑल इंग्लंडचे विजेतेपद तसेच इंडोनेशिया मास्टर्सचे उपविजेतेपद पटकावताना एकूण ९४५५० डॉलर्सची कमाई करीत बॅडमिंटनपटूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सलसेनने ४४१५० डॉलर्सच्या कमाईसह द्वितीय, तर शी युकीने २८५७५ डॉलर्स कमाईसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.

नागपुरात नोंदवला गेला कालचा सर्वात उष्ण दिवस, पारा ४३.३ अंशांवर :
  • एप्रिल महिना लागण्यास अवघा एक दिवस उरला आहे. तर मे महिना पूर्ण जायचा आहे असं असूनही गेल्या काही दिवसात उष्मा प्रचंड वाढला आहे. आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं.

  • हवामान खात्याने नोंदवलेल्या अंदाजानुसार नागपुरात ४३.३ अंश इतका पारा नोंदवला गेला. आज राज्यात सर्वाधिक पारा नागपुरात नोंदवला गेला. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

  • गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि उष्मा वाढला आहे. उन्हाची काहिली वाढल्याने कडाका जाणवू लागला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाने लाही लाही होते आहे. अशात आज नागपुरात सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला. नागपुरातले आजचे तापमान ४३.३ अंशांवर होते.

शिका आणि कमवा…७० टक्के फी भरतंय टाटा पॉवर :
  • आज सर्वच क्षेत्रात कुशल कामगारांची फार गरज आहे. उपलब्ध उद्योगांच्या तुलनेत कुशल कामगारांची संख्या मात्र फार कमी आहे. नेमकी हिच गरज ओळखून टाटा पॉवरने कौशल्य विकास संस्थेची स्थापना केली. वीज पुरवठा आणि त्यासंबंधी क्षेत्रात कुशल कामगार तयार करण्याचा या संस्थेचा मूळ हेतू आहे.

  • २०१५ साली या संस्थेची स्थापना झाली असून देशभरात टाटा पॉवर कौशल्य विकासाच्या एकूण पाच संस्था आहेत. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे विद्यार्थ्यांना इतर संस्थांच्या तुलनेत कमी फी घेऊन शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना केवळ ३० टक्के फी भरावी लागत असून उर्वरीत ७० टक्के फी ही टाटा ट्रस्टकडून भरली जाते. याठिकाणी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो. यासाठी लागणारी सर्व साधने, उपकरणे येथे उपलब्ध आहेत.

  • आठवीपासून ते बीटेक, बीई शिकलेल्यांसाठी इथे कोर्सेस उपलब्ध आहेत. अगदी १ दिवसापासून ते सहा आठवड्यांपर्यंत विविध विद्युत आणि त्यासंबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील विविध गोष्टी इथे शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करून शिकता यावं यासाठी संस्थेच्या जवळपास १० एकर परिसरात सर्व साधनं उपलब्ध करून दिली आहेत.

  • सामान्य वायरमनपासून सोलार पॅनल लावण्यापर्यंत सर्व गोष्टी इथे शिकवल्या जातात. या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राहण्याची-जेवण्याची सोय कोर्स शुल्कात केली जाते. त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थीही येथे सहज शिक्षण घेऊ शकतात.

  • शहाड इथल्या टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये नेमके कोणकोणते कोर्सेस आहेत आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ :

 ‘एमपीएससी’ परीक्षांमध्ये समांतर आरक्षणाचा गोंधळ सुरूच :
  • मुंबई : समांतर आरक्षणाचा लाभ मिळाल्यास आरक्षण राहावे म्हणून आणि आरक्षणाच्या तरतुदीमुळे निवड न झाल्यास आरक्षण रद्द व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. यापुढे आयोगाच्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करताना समांतर आरक्षण लागू न करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.

  • शासनाने यापूर्वी समांतर आरक्षण लागू केले होते. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील महिला, खेळाडू यांसाठी राखीव असलेल्या पदांवर फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचीच निवड केली जात असे. या निर्णयाच्या विरोधात उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. समांतर आरक्षणाबाबत शासनाने १९ डिसेंबर रोजी शुद्धिपत्रक जाहीर केले. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील निवड ही गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गातील महिला किंवा खेळाडू उमेदवार पात्र ठरू शकतील. या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या निकाल पद्धतीतही आयोगाने बदल केले आहेत. आयोगाच्या यापुढील सर्व परीक्षांसाठी समांतर आरक्षणाचे सुधारित निकष लागू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १९ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मात्र निकाल जाहीर झालेला नाही, अशा परीक्षांसाठीही समांतर आरक्षण लागू होणार आहे.

  • १९ डिसेंबरच्या निर्णयापूर्वी परीक्षा झाल्या आहेत, मात्र निकाल जाहीर झालेले नाहीत, अशा पदांसाठीही समांतर आरक्षण लागू होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र आयोगाच्या या परिपत्रकाने उमेदवारांमधील गोंधळ अधिकच वाढवला आहे. गेल्या महिन्यात राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले.

  • या परीक्षा १९ डिसेंबरपूर्वी झाल्या असल्यामुळे त्या निकालातही बदल होणार का, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्याचवेळी समांतर आरक्षणाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आयोगाने याबाबत निर्णय जाहीर केल्याचा आक्षेपही उमेदवारांनी घेतला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

  • १८८९: आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. हा बांधायला २ वर्षे, २ महिने व २ दिवस लागले.

  • १९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.

  • १९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

  • १९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

  • १९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

  • २००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

जन्म 

  • १५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १५५२)

  • १५९६: फ्रेन्च तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि लेखक रेनें देंकार्त यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १६५०)

  • १८६५: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७)

  • १८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६०)

  • १९०२: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २०००)

  • १९३४: भारतीय कवी आणि लेखक कमला सुरय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००९)

  • १९३८: दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.(जन्म: २७ फेब्रुवारी १८९९)

  • २०००: भारतीय विद्वान ग्यानी चेत सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९०२)

  • २००२: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी मोतुरू उदायम यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९२४)

  • २००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

  • २००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.