चालू घडामोडी - ३१ मे २०१७

Date : 31 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अडवाणी, जोशी, उमा भारती बाबरी विध्वंस कटात आरोपी : 
  • बाबरी मशिदीची वास्तू कारसेवकांनी पाडल्यानंतर २५ वर्षांनी सीबीआय न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारती या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह ११ जणांवर गुन्हेगारी कटाचा खटला चालविण्यासाठी आरोपनिश्चिती केली.

  • त्या सर्वांना प्रत्येकी ५०हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला. न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशानुसार अडवाणी (८९ वर्षे), जोशी (८३), उमा भारती (५८) व विनय कटियार (६२) या भाजपाच्या नेत्यांखेरीज वयाची ८५ वर्षे ओलांडलेले विश्व हिंदू परिषदेचे विष्णू हरी दालमिया आणि एके काळच्या जहाल वक्त्या साध्वी ऋतंबरा (५३) हे आरोपी न्यायाधीश एस. के. यादव यांच्यापुढे हजर झाले. 

  • बाबरी पाडण्यात आमचा सहभाग नव्हता. उलट आम्ही जमावाला तसे न करण्याचा प्रयत्न केला होता, असे या नेत्यांचे म्हणणे होते. ते अमान्य करून न्यायालयाने त्यांच्यावर भादवि कलम १२०(बी) अन्वये बाबरी विध्वंस कटाचा आरोप निश्चित केला.

  • याच घटनेशी संबंधित दुसऱ्या खटल्यात आरोपी असलेल्या रामविलास वेदांती, वैकुंठ लाल शर्मा, चंपट राय बन्सल, महंत नृत्य गोपाल दास, धर्मदास आणि सतीस प्रधान या नेत्यांवरही कटाखेरीज अन्य आरोप निश्चित केले.

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना :
  • राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून सौर कृषी फीडरची योजना सरकारच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले,

  • कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

  • राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३० टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागते.

  • कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल.

जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील बंदीला हायकोर्टाची तात्पुरती स्थगिती :
  • आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टाने स्थगिती दिली असून केंद्र आणि राज्य सरकारनं यावर चार आठवड्यात कोर्टासमोर भूमिका मांडावी, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

  • पशुबाजारात पशुंची विक्री केवळ नांगरणी आणि दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीशी संबंधित कामांसाठीच करता येईल, असा आदेश केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात काढला होता. त्यानुसार म्हशी, गायी आणि उंट यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली होती.

  • केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कम्यूनिस्ट पक्ष आणि करुणानिधींच्या द्रमुकनेही आघाडी घेतली आहे. त्यामुळे सध्या दक्षिण भारतात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

  • कम्यूनिस्ट पक्षाने तर केरळमध्ये २०० गावात बीफ पार्टीचं आयोजन केलं आहे. तर दुसरीकडे आयआयटी मद्रासमध्ये रविवारी बीफ पार्टीचं आयोजन करणाऱ्या एसएफआय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना अभाविप संघटनेच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी सुलेखा कुंभारे :
  • राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत लोकनायक भवनात पदभार स्वीकारला.

  • यावेळी कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्य समाजाच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी मी मनापासून काम करेन.

  • राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी समाजांना विविध क्षेत्रांत न्याय मिळवून देण्याचे काम करतो. अध्यक्ष रिझवी यांच्याव्यतिरिक्त आयोगाचे चार सदस्य आहेत.

आता शिक्षकांची भरती केंद्रीय पद्धतीने होणार :
  • अनुदानित, अनुदानपात्र शाळांमधील शिक्षकांची भरती आता केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणीव्दारे होईल.

  • शिक्षक भरतीबाबत शाळा व्यवस्थापनांच्या अधिकारावर गदा आली आहे. या निर्णयाने खासगी व सरकारी अनुदानित शाळांमधील भरतीतील गैरप्रकारांना आळा बसेल व भरती गुणवत्तेच्या आधारावर होईल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

  • भरतीतील गैरप्रकारांना आळा घालण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. उच्च न्यायालयानेही गुणवत्तेच्या आधारे भरतीचे आदेश दिले होते. त्यामुळे शासनाकडून ज्यांना वेतन मिळते, अशा शाळांतील भरती केंद्रीय पद्धतीने होईल.

  • तसेच या परीक्षेत उत्तीर्ण शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पारदर्शी पद्धतीने हे करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे व वृत्तपत्रांतून शिक्षकांच्या रिक्त जागा नमूद करण्यात येतील. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील.

'द स्क्वेअर' ठरला कान्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपट :
  • सत्तराव्या कांन्स महोत्सवात सर्वोकृष्ट चित्रपटाचा पाम डि ओर पुरस्कार रूबेन ओस्टलंड यांच्या 'द स्क्वेअर' या चित्रपटाला जाहीर झाला आहे.

  • तर या महोत्सवाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा पुरस्कार अभिनेत्री निकोल कीडमन हिने पटकावला आहे.

इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे -

  • कॅम डिओर पुरस्कार - जेन फेमी.

  • उत्कृष्ट लघुपट - अ जेन्टल नाइट.

  • परीक्षकांचा पुरस्कार - लव्हलेस.

  • उत्कृष्ट अभिनेत्री - डायनी क्रुगर.

  • उत्कृष्ट अभिनेता - जोआक्विन फिनिक्स.

  • उत्कृष्ट दिग्दर्शक - सोफिया कोपोला.

  • ग्रँड प्रिंक्स पुरस्कार - १२० बीट्स पर मिनीट.

  • वर्धापन दिन पुरस्कार - निकोल कीडमन.

  • पाम डिओर पुरस्कार - द स्क्वेअर (रूबेन ओस्टलंड).

भारताकडे विजेतेपद राखण्याची क्षमता : श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा
  • भारताचा संघ हा समतोल असून, त्यांचा वेगवान मारा समृद्ध असा आहे. त्यामुळेच यंदा भारताकडे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेचे विजेतेपद राखण्याची क्षमता आहे, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले आहे.

  • ‘‘यंदा चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत चार आशियाई संघांचा समावेश आहे. यात भारतीय संघ सर्वात बलवान आहे. २०१३मध्ये ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधणारा भारतीय संघ यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू शकतो,’’ असे संगकाराने म्हटले आहे.

  • ‘‘अंतिम फेरीत कोणते दोन संघ असतील, हे सांगणे आव्हानात्मक आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील,’’ असे मत संगकाराने व्यक्त केले. संगकाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकंदर २८,०१६ धावा केल्या आहेत.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : दक्षिण आफ्रिका.

  • जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.

जन्म, वाढदिवस

  • पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू : ३१ मे १९२८

ठळक घटना

  • फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या : ३१ मे १९२७

  • दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले : ३१ मे १९६१

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक : ३१ मे १८७४

  • सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे : ३१ मे २००२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.