चालू घडामोडी - ३१ मे २०१८

Date : 31 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला आजपासून सुरुवात :
  • पुणे : राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होताच शहरातील काही महाविद्यालयांच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरुवारपासूनच सुरुवात होणार आहे. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्यानंतर प्रवेश दिले जाणार आहेत. त्या त्या महाविद्यालयांमध्ये बारावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी प्राधान्य असणार आहे.

  • शहरातील प्रमुख वरिष्ठ महाविद्यालयांमधील बीए, बीकॉम, बीएस्सी व इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला लगेचच सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्या त्या महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवेशाबाबतची सविस्तर माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहे. बारावीचा निकाल आॅनलाइन जाहीर करण्यात आला असून, त्यांना येत्या १२ जून रोजी गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेसह इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती महाविद्यालयामध्ये जमा कराव्या लागतील.

  • फर्ग्युसन महाविद्यालयांच्या विविध शाखांसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर पहिल्यांदा एक जनरल लिस्ट लावली जाईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांचे काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याची संधी त्यांना दिली जाईल. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

अहिल्यादेवी : गंगाजल निर्मल तत्त्वज्ञानी राज्यकर्ती :
  • ग्रीक विचारवंत प्लेटो याने तत्त्वज्ञानी राज्यकर्ता या विषयाची चर्चा सुरू केली. युरोपात नागरिकशास्त्रात या संकल्पनेचा समावेश झाला. पण युरोपीय विचारवंतांना तत्त्वज्ञानी राजाचे उदाहरण युरोपच्याच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सापडेना. अशी उदाहरणे हिंदुस्थानच्या पुराणकाळात सापडली. जनकराजा, राम, कृष्ण, युधिष्ठिर, नल हे तत्त्वज्ञानी राजे सापडले. हिंदुस्थानच्या अलीकडच्या इतिहासात त्यांना राजा सापडेना. पण तत्त्वज्ञानी महाराणी मात्र सापडली. ती महाराणी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

  • अहिल्यादेवींचा जन्म दि. ३१ मे, १७२५ रोजी चोंडी (ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर) येथे झाला. मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील. मल्हारराव होळकरांनी बाल अहिल्येचे गुण ओळखले. सून म्हणून त्यांनी अहिल्येला होळकरांच्या घरात नेले. अहिल्यादेवीचे पती खंडेराव यांना कुंभेरीच्या युध्दात लढताना वीरमरण आले आणि अहिल्यादेवींवर माळवा प्रांताच्या राज्यकारभाराची जबाबदारी पडली. १ डिसेंबर, १७६७ रोजी त्यांनी राज्यकारभार हातात घेतला. मृत्यू येईपर्यंत (१३ आॅगस्ट, १७९५) त्या राज्य करीत होत्या.

  • मध्य प्रदेशातल्या महेश्वर या नर्मदा नदीच्या काठी त्यांनी माळवा राज्याची राजधानी नेली. इंदूर या छोट्या गावाचे रूपांतर सुंदर, समृध्द शहरात केले. महेश्वर हे राजधानीचे शहर आधुनिक बनवले. कापड उद्योग भरभराटीला आणला.

  • ३० वर्षांच्या अहिल्यादेवींच्या राज्यात महेश्वर हे शहर उद्योगाचे केंद्र होते. साहित्य, मूर्तिकला, संगीत आणि इतर कलांना अहिल्यादेवींनी राजाश्रय दिला. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी आणि संस्कृत पंडित खलासीराम या त्यावेळच्या प्रभृतींना अहिल्यादेवींनी प्रोत्साहन दिले.

जागतिक शांततेसाठी ७० वर्षांत भारतीयांचे सर्वाधिक बलिदान :
  • संयुक्त राष्ट्रे : गेल्या सत्तर वर्षांत जगभरातील शांती मोहिमांमध्ये कर्तव्य बजावत असताना सर्वाधिक बलिदान भारतीय शांतीसैैनिकांनी दिले आहे. त्यांची संख्या १६३ असून त्यात लष्करी जवान, पोलिस व नागरिकांचा समावेश आहे.

  • संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे की, १९४८ सालापासून ते आजवर जगभरातील शांती मोहिमांत ३७३७ शांतीरक्षकांनी बलिदान दिले. त्यात भारतातील शांतीरक्षकांची संख्या सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांनी हाती घेतलेल्या शांती मोहिमांमध्ये मोठ्या संख्येने आपले पोलीस व लष्करी जवान पाठविणाऱ्या अग्रणी देशांत भारत तिसºया क्रमांकावर आहे.

  • अ‍ॅबेई, सायप्रस, काँगो, हैती, लेबनॉन, मध्य पूर्वेतील देश, दक्षिण सुदान, पश्चिम सहारा भाग येथे सध्या सुरु असलेल्या शांती मोहिमांत भारताचे ६६९३ शांतीरक्षक सहभागी झाले आहेत. या शांतीरक्षकांना शस्त्रसज्ज करण्यासाठी तसेच अन्य तयारीपोटी गेल्या ३० एप्रिलपर्यंतची मुदत लक्षात घेतल्यास संयुक्त राष्ट्रांकडून भारताला ९ कोटी २० लाख डॉलर इतकी रक्कम येणे आहे.

  • संयुक्त राष्ट्रांनी शांती मोहिमा सुरु केल्याच्या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण झाली तसेच शांतीरक्षक दिनानिमित्त मंगळवारी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात शांतीरक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सध्या जगभरात सुरु असलेल्या चौदा शांती मोहिमांमध्ये विविध देशांतील पोलिस व लष्करातील ९६००० हजार जवान सहभागी झाले असून १५ हजार नागरिक या मोहिमांतील कर्मचारी व १६०० जण कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत.

  • संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या वेळी बोलताना सांगितले की, जगभरातील शांती मोहिमांमध्ये गेल्या सत्तर वर्षांत १० लाख पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. त्यांनी अनेक निरपराधी लोकांचे जीव वाचविले आहेत. २०१७ साली शांती मोहिमांत विविध देशांतील १३७ शांतीरक्षकांना आपला जीव गमावावा लागला होता.

राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळला पहिला दयेचा अर्ज :
  • नवी दिल्ली : सहा जणांना ठार मारल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला. राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर दयेसाठी आलेला हा पहिला अर्ज होता.

  • जगत राय याने आपली म्हैस चोरल्याची तक्रार बिहारमध्ये राहणारे विजेंद्र महोता यांनी पोलिसांत दिली होती. ती तक्रार मागे घ्यावी, अशी मागणी जगतने केली. मात्र, विजेंद्र यांनी तक्रार मागे घेतली नाही. त्या रागातून जगतने २००६ साली विजेंद्रचे कुटुंबच संपवून टाकले. जगतने विजेंद्र यांची पत्नी आणि त्यांची ५ अपत्ये असे ६ जण झोपेत असताना त्यांचे घर पेटवून दिले होते. त्यात सर्व जणांचा मृत्यू झाला होता.

  • विजेंद्र यांचाही त्यात भाजून मृत्यू झाला होता. या कृत्याबद्दल जगतला पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा रद्द करावी, म्हणून जगतने राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन :
  • मुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते.

  • हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

  • पहाटे चार वाजता उलटी - अस्वस्थ होत असल्याने  पांडुरंग फुंडकर पहाटे चार वाजता उठले. त्यानंतर त्यांना उलटी झाल्याने, त्यांनी सुरक्षारक्षकांना उठवलं. त्यांच्या घरी कोणीही नव्हतं. त्यामुळे सुरक्षारक्षकांनीच त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र वाटेतच त्यांना हार्टअटॅक आल्याचं सांगण्यात येत आहे.

  • फुंडकरांच्या अकाली निधनाने धक्का - पांडुरंग फुंडकर यांच्या अकाली निधनाने भाजपसह सर्वांनाच धक्का बसला. फुंडकर हे काही आजारी नव्हते. मात्र हृदयविकाराने त्यांना अवचित गाठल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा चेहरा हरपला आहे.

  • महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी पांडुरंग फुंडकर यांचं मोठं योगदान आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनी महाराष्ट्रात भाजपचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण आणि शेती प्रश्नाची जाण असल्याचा नेता म्हणून फुंडकर परिचीत होते.

  • फुंडकर यांनी भाजपचं प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं होतं.  महाराष्ट्रात भाजपचं अस्तित्व नव्हतं, तेव्हापासून भाजप वाढवण्यासाठी ज्या काही नेत्यांनी काम केलं, त्यापैकी एक म्हणजे पांडुरंग फुंडकर होय.सध्या ते बुलडाण्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होते.

MPSC च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर :

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 2017 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षाचा निकाल असून, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सेल्स टॅक्स आणि इतर पदासाठी परीक्षा झाल्या होत्या. रोहितकुमार राजपूत हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला आहे.

MPSC मधील टॉप-5 उत्तीर्ण :

  • पहिला - रोहितकुमार राजपूत

  • दुसरा - सुधीर पाटील

  • तिसरा - सोपान टोंपे

  • चौथा - अजयकुमार नष्टे

  • पाचवा - दत्तू शेवाळे

दिनविशेष :
  • जागतिक तंबाखूविरोधी दिन

महत्वाच्या घटना

  • १९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.

  • १९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.

  • १९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

  • १९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.

जन्म

१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.

१९३०: अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांचा जन्म.

१९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.

मृत्यू

१८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर१८२२ - मांजरे, पेडणे, गोवा)

१९१०: वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी१८२१)

१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.