चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७

Date : 31 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मेक इन इंडिया : लालफितशाहीत अडकले संरक्षण दलांचे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प -
  • नवी दिल्ली - ज्या 'मेक इन इंडिया' योजनेची सरकारने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती, त्याला अपयश येताना दिसत आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणा-या शस्त्रं आणि गरजू साहित्याचं उत्पादनच होऊ शकलेलं नाही.

  • यामागे अनेक कारणं आहेत. लालफितशाही, रटाळ आणि कंटाळवाणी सरकारी प्रक्रिया तसंच तांत्रिक अडचणी यांचा फटका भारतीय सैन्याला बसला असून, याशिवाय एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव.

  • 'मेक इन इंडिया' अंतर्गत अडकलेल्या या अर्धा डझनहून जास्त प्रोजेक्ट्सची किंमत जवळपास 3.5 लाख कोटी आहे.

  • या प्रोजेक्ट्समध्ये फ्युचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हिइकल्स (एफआयसीव्ही), लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स, नेव्हल मल्टी-रोल चॉपर्स, जनरल स्टेल्थ सबमरीन, फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट, माईन काऊंटर मेजर व्हेसल्स (एमसीएमव्ही) यांचा समावेश आहे. (source : lokmat)

जगातील सर्वात लांब बोगदा खोदण्यासाठी चीनची खटपट, ब्रह्मपुत्रचे पाणी पळवण्यासाठी कारस्थान :
  • नवी दिल्ली - डोकलाम प्रश्नी कुटनीतीमध्ये भारताकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर आता चीनने भारताला विविध आघाड्यांवर अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने सुरू केली आहेत.

  • त्याचाच एक भाग म्हणून चीनने जगातील सर्वात लांब बोगदा खोदण्याचा घाट घातला आहे. या बोगद्याद्वारे ब्रह्मपुत्रचे पाणी शिनजिंयांग प्रांतातील वाळवंटी प्रदेशात नेण्याचा चीनचा कुटील डाव आहे. 

  • एकूण एक हजार किमी लांबीचा बोगदा खोदण्याचा चीनचा प्रयत्न असून, हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा असेल असे जाणकारांचे मत आहे. मात्र या प्रकल्पावर अद्याप काम सुरू झालेले नाही.

  • साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, "सध्या चीन हा सर्वात मोठा बोगदा खोदण्यासाठीच्या आपल्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी एक छोटा बोगदा खोदण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.

  • चीनने ऑगस्ट महिन्यात युन्नान प्रांताच्या मध्यभागात या बोगद्याचे काम सुरू केले आहे. हा बोगदा 600 किमीपेक्षा जास्त लांबीचा असेल. (source : lokmat)

एकाच मोसमात चार सुपरसीरिज खिशात, किदंबी श्रीकांतचं घवघवीत यश :
  • इंडोनेशियन ओपन…  ऑस्ट्रेलियन ओपन… डेन्मार्क ओपन…  आणि आता फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या या विजेतेपदानं किदम्बी श्रीकांतला थोरामोठ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे.

  • एकाच मोसमात एकदोन नाही, तर चार-चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत हा जगातला केवळ चौथा बॅडमिंटनवीर ठरला आहे.

  • जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.

  • भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटनवीर या नात्यानं एकाच मोसमात सर्वाधिक सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम श्रीकांतच्या नावावर जमा झाला. (source : abpmajha)

जीएसटी विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, अधिसूचना लवकरच जारी होणार :
  • नवी दिल्ली : जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

  • जीएसटीआर-२ विवरणपत्र भरणा-या व्यावसायिकांची संख्या सुमारे ३०.८१ लाख आहे. हे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.

  • यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीआर-१ विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख १० आॅक्टोबर होती.

  • केपीएमजी इंडियाचे भागीदार प्रियजीत घोष यांनी सांगितले की, जीएसटीआर-२ विवरणपत्र भरताना करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

  • ‘जीएसटीआर-२ ए’कडून स्वीकारलेल्या क्रेडिट जीएसटी पोर्टलवर शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नव्हते. त्यामुळे या विवरणपत्रास मुदतवाढ मिळणे अटळच होते. जीएसटीआर-३ विवरणपत्र भरण्यासाठी ‘जीएसटीआर-२’चे क्रेडिट आवश्यक आहे. (source : lokmat)

अनिल अंबानींकडून जाणार ‘आरकॉम’ची सूत्रे, वायरलेस व्यवसाय एअरसेलमध्ये विलिन करण्याचे प्रयत्न फोल :
  • मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) असलेल्या थकित कर्जांपैकी सात कोटी रुपयांच्या कर्जाची फेड कंपनीचे भागभांडवल घेऊन करण्याचे धनको बँकांनी ठरविल्याने रिलायन्स उद्योगसमुहातील या महत्वाच्या कंपनीचे नियंत्रण अनिल अंबानींच्या हातून जाईल.

  • वायरलेस व्यवसाय एअरसेलमध्ये विलिन करण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर ही वेळ येणार आहे. सध्या ‘आरकॉम’चे ५९ टक्के भागभांडवल प्रवर्तक या नात्याने अनिल अंबानी यांच्याकडे आहे व त्या नात्याने कंपनीचे नियंत्रण त्यांच्या हाती आहे.

  • देशी व विदेशी धनको बँकांनी थकित कर्जाच्या बदल्यात भागभांडवल घेतल्यावर अंबानी यांच्याकडे कंपनीचे केवळ २६ टक्के भांडवल शिल्लक उरेल.

  • कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकानुसार रिझर्व्ह बँकेच्या ‘एसडीआर’ मार्गदर्शिकेनुसार सात हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज कंपनीच्या ५१ टक्के भागभांडवलात परिवर्तित करण्याचा प्रस्ताव आहे. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक बचत दिन / राष्ट्रीय एकता दिन

महत्त्वाच्या घटना

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

  • १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

  • १९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

जन्म दिवस

  • १३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

  • १८७५: भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

  • १८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

  • १९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्य दिन

  • १९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)

  • १९८४: भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

  • १९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)

  • २००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट१९१९)

  • २००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.