चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१८

Date : 31 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं आज लोकार्पण :
  • गांधीनगर : भारताचा अभिमान ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पुतळ्याचं आज अनावरण होणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातल्या या सर्वात उंच पुतळ्याचं लोकार्पण होईल. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

  • आज अनावरण झाल्यानंतर उद्यापासून म्हणजे 1 नोव्हेंबरपासून स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुलं होईल. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया भागात हा जगातला सर्वात मोठा पुतळा उभा राहिला आहे.

  • संपूर्ण 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहायची असेल तर त्याचा तिकीट दर 500 रुपये आहे. इथे गेल्यानंतर पर्यटकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून 3 किमी लांब अंतरावर वाहनं पार्क करावी लागतील. तिथून एका बसद्वारे स्मारकापर्यंत पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.

एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून; प्रवास भाड्यात १० टक्क्यांनी वाढ :
  • पुणे : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.

  • दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी ची सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. १ ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याचकाळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल.

  • पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.

  • एसटीने दिवाळीनिमित्त १० टक्के प्रवासभाडे वाढविले आहे. ही भाडेवाढ दि. १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. पण काही बुकिंग आधीच्या दरानुसारच झाले आहे. बहुतेक जण दीड पट प्रवास भाडे आकारत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी एसटीच्या दीडपटच भाडे आकारावे. - बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रीक लक्झरी बस असोसिएशन.

छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी अशोक मोडक यांची नियुक्ती :
  • कल्याण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय विश्वविद्यालय छत्तीसगडच्या कुलाधिपतीपदी डॉ. अशोक मोडक यांची नियुक्ती केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधनासाठी डॉ. मोडक हे परिचित आहेत. ते मूळचे डोंबिवलीकर आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे डोंबिवलीतीलव्यक्तीला कुलाधिपतीचा मान मिळाल्याने मानाचा तुरा डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला गेला आहे.

  • डॉ. मोडक यांनी १९६३ पासून प्राध्यापक म्हणून काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत. १९९४ ते २००६ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार होते. या कारकिर्दीत त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राज्य सरकारने दिला होता. प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका सरकार दरबारी व विधिमंडळात मांडली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा होणार आहे.

  • डॉ. मोडक म्हणाले, मला नॅशनल रिसर्च प्रोफेसरपद याआधी मिळाल्याने माझा सन्मान याआधीच झाला. त्या पश्चात राष्ट्रपतींनी पाच वर्षांसाठी कुलाधिपतीपदी केलेली नियुक्ती ही निश्चित आनंदाचा विषय आहे. घटनात्मकदृष्ट्या या पदाला काही अधिकार नसले तरी त्यात जीव ओतून काम करणार आहे. जग झपाट्याने बदलत आहे. भारतीय त्यादृष्टीने सक्षम होत आहेत.

  • कला व वाणिज्य शाखेतून रोजगाराच्या संधी कमी तर, विज्ञान शाखेत त्या संधी अधिक आहे.. त्यामुळे शिक्षण रोजगाराभिमुख करण्यावर भर देण्याचा मानस आहे.

फडणवीस सरकारच्या कामगिरीला ८१% जनतेची पसंती :
  • मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने चार वर्षात शहरी व निमशहरी भागात राबविलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, परडवणारी घरे, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, कौशल्य विकासअंतर्गत रोजगार क्षमता निर्माण करणे आदी विविध सामाजिक कल्याण आणि रोजगार उपक्रमाच्या अंमलबजावणीवर सुमारे ८१ टक्के जनता ही समाधानी असल्याचे हंसा रिसर्च व न्यूज 18- लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

  • शहरी व ग्रामीण भागातील सर्वात जास्त लोकांनी पायाभूतसुविधांबद्दल सर्वात जास्त समाधान व्यक्त केल्याचे दिसते. ग्रामीण, शहरी व निम भागातील जनतेला मेट्रो, विमानतळ, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, परवडणारी घरे, मुंबई गोवा महामार्गाचे काम, मुंबई, लहान शहरांमधील हवाई वाहतूक सुविधा, वांद्रे ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल एलिव्हेटेड कॉरिडॉर, न्हावा शेवा सागरी मार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, मिहान, नवी मुंबई विमानतळाची मंजुरी, वीज उत्पादन वाढविणे व वीज भारनियमन कमी करणे, घर खरेदीदारांसाठी महारेरा आदी पायाभूत सुविधांसाठी केलेल्या विविध योजनांबद्दल या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.

  • शेतकरी ते ग्राहक बाजार, शेतमाल विक्रीतील मध्यस्थ काढणे, किमत ठरविण्याची शेतकऱ्यांना मुभा या बाबत ८१ टक्के ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले. त्यातील ६२ टक्के अत्यंत समाधानी होते. पीक विम्याबद्दल ७८ शेतकरी समाधानी होते. शहरी व निम शहरी भागातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास वर्गाच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांबद्दल ७८ ते ७९ टक्के जनतेचा कौल युती शासनाकडे आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरकारला पसंती देण्याचा टक्का वाढला आहे.

आधार पुन्हा बनणार सरकारसाठी डोकेदुखी :
  • नवी दिल्ली : आधार पुन्हा एकदा सरकारला प्रशासन आणि राजकीय पातळीवर नवी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. हा संघर्ष आधार प्राधिकरण आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) यांच्यात होणार असे दिसते. सीएससीची प्रशंसा स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली होती.

  • आधार खेड्यापाड्यांत सरकारी सेवा, योजना पोहोचवण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सीएससी आणि आधार प्राधिकरण दोन्ही माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत मोडतात. संघर्षाचे मुख्य कारण स्वदेशी विरुद्ध बहुराष्ट्रीय कंपनी, असे वळण घेत आहे.

  • सीएससी चालवणारे उत्तर प्रदेशचे महेश म्हणाले की, डाटा लीकचा मुद्दा हे निमित्त आहे. आधार प्राधिकरणच्या प्रमाणनानंतरच आधारचे यंत्र विकत घेतले जाते. देशात २२ हजार सीएससीवर जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त आधार यंत्रे आहेत. त्यांची संख्या वाढत आहे. सीएससी संचालक आपली आयुष्याची कमाई गुंतवून ही यंत्रे विकत घेतात.

  • आम्ही ही यंत्रे खरेदी केली ती ते एक रोजगाराचे साधन आहे म्हणून. जेव्हा कोणी अद्ययावत नोंदी करण्यासाठी येतो तेव्हा दहा ते २० रुपये देतो. त्याचा सगळा डाटा आधार प्राधिकरणकडून तपासला जातो तर मग डाटा कुठे लीक होतो? मोठ्या कंपन्यांना काम देण्याचा हा सरळसरळ प्रयत्न आहे. यासाठी आधार केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या उलाढालीची अट घालण्यात आली आहे. याविरोधात आम्ही आधार प्राधिकरणला घेराव घालण्याच्या तयारीत आहोत.

आता रोबोच तयार करणार औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त रोबो :
  • शांघाय : स्वीस बहुराष्ट्रीय कंपनी एबीबीकडून चीनमधील शांघाय येथे १५0 दशलक्ष डॉलर खर्चून एक भव्य प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पात रोबो बनविण्याचे काम रोबोकडूनच करून घेण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त रोबो बनविणारा चीनमधील हा सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. एबीबी समूहाच्या चायना रोबोटिक कॅम्पसच्या जवळच हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प २0२0 च्या अखेरपर्यंत सुरू होईल. येथे चीनसाठी तसेच आशियात निर्यात करण्यासाठी रोबो बनविले जातील. चीन ही एबीबीची अमेरिकेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे.

  • एबीबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ७५ हजार चौरस फूट भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात मनुष्य आणि रोबो यांना एकत्रितरीत्या सुरक्षित काम करता येईल, असे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे. कंपनीचे युमी नावाचे रोबो मनुष्यासोबत काम करण्यास सक्षम आहेत. रोबो तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जुळणीचे (असेम्ब्ली) कामही युमी रोबो करू शकतात. एबीबी समूहाचे मुख्य कार्यकारी उलरिच स्पायशोफर यांनी सांगितले आहे की, ‘शांघाय हे एबीबी आणि जगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाचे प्रमुख केंद्र बनले आहे.

  • ’अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनमधील इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांचे सुटे भाग आणि अन्य उत्पादनाच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही उत्पादने उत्पादित करणाºया कारखान्यांत मोठ्या प्रमाणात रोबोचा वापर केला जातो.

  • त्यामुळे रोबोच्या विक्रीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तरीही एबीबीने हा प्रकल्प उभारण्याची जोखीम उचलली आहे. चिनी रोबोची विक्री या संकटावर मात करील, असा विश्वास एबीबीला वाटतो. त्यानुषंगाने कंपनीने आपले विस्तारकार्य हाती घेतले आहे.

जागतिक कीर्तीचे बौद्धविद्वान उर्गेन संघरक्षित यांचे निधन :
  • लंडन : जागतिक कीर्तीचे बौद्ध विद्वान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुबंधू आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक उर्गेन संघरक्षित यांचे मंगळवारी सकाळी १० वाजता लंडनच्या हेरेफोर्ड रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

  • गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना रविवारी रुणालयात दाखल करण्यात आले होते. लंडनजवळच्या कॉडिंग्टन कोर्ट येथील ‘अधिष्ठान’मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

  • मूळचे ब्रिटिश असलेले संघरक्षित (डेनिस लिंगहूड) यांचा जन्म २६ आॅगस्ट १९२५ रोजी लंडन येथे झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिक म्हणून भारतात आले होते. युद्ध संपल्यानंतर ते बौद्धधम्माचा अभ्यास करण्यासाठी २० वर्षांपर्यंत भारतातच राहिले.

  • उ. चंद्रमणी आणि भिक्खू जगदीश काश्यप यांच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली. ‘सर्व्हे आॅफ बुद्धिझम’, ‘रिव्हॉल्यूशन आॅफ डॉ. आंबेडकर’ आणि ‘नो युवर मार्इंड’ यासारख्या जवळपास १२५ पुस्तकांचे लेखक संघरक्षित यांनी डॉ. आंबेडकरांशी तीनवेळा भेट घेऊन धम्म चळवळीवर चर्चा केली होती. 

एसबीआय ग्राहकांसाठी नियम बदलला, एका दिवसात ‘एवढे’ पैसे काढता येणार :
  • स्टेट बँक ऑफ इंडियाने ऐन दिवाळीच्या काळात नवीन नियम लागू केले आहेत. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांनुसार आता एसबीआय एटीएम धारकांना एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत.

  • आधी ही मर्यादा ४० हजार रुपये एवढी होती. एसबीआयच्या क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डधारकांसाठी हा नियम असणार आहे. बँकेकडून सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

  • एसबीआयने जवळपास एक महिन्यापूर्वी क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डधारकांसाठी 31 ऑक्टोबरपासून एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती दिली होती. जर तुम्हाला एका दिवसात २० हजाराहून जास्त पैसे काढायचे असतील तर उच्च श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

  • ‘ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड’ आणि ‘प्लॅटिनम कार्ड’च्या मर्यादेत बदल करण्यात आलेला नाही. ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड धारकांना दिवसाला ५० हजार आणि प्लॅटिनम कार्ड धारकांना १ लाखापर्यंतची रक्कम काढण्याची मुभा आहे.

दिनविशेष :

  • जागतिक बचत दिन / राष्ट्रीय एकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.

  • १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.

  • १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.

  • १९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.

  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.

जन्म 

  • १३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)

  • १८७५: भारतरत्‍न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)

  • १८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)

  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)

  • १९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)

  • १९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्यू 

  • १९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)

  • १९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)

  • १९८४: भारताच्या ३र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)

  • १९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)

  • २००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)

  • २००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.